सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (14:06 IST)

श्री मार्तंड भैरव अवतार कथा

दक्षिण प्रदेशात मनीचुल नावाचा पर्वत प्रदेश होता. येथे मणिपुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता. तो आणि त्याचा भाऊ मणि पराक्रमी होते, त्यांना देवराज इंद्र ही घाबरत असे. आपल्या शौर्याचा त्यांना गर्व झाला होता. एकदा शिकारीसाठी जंगलात जात असताना सप्तऋषींचे आश्रम दृष्टीस पडल्यास त्यांनी हे आश्रम उद्ध्वस्त केले. त्यांच्या सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले, तेथे लूट केली, आश्रम जाळून दिले. तेव्हा नारदांच्या म्हणण्यानुसार उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पीडित एकत्र येऊन ऋषीमुनी आपले गाऱ्हाणे घेऊन इंद्राकडे गेले पण इंद्राने असमर्थता दाखवली व विष्णूंकडे जाण्यास सांगितले. विष्णूकडे गेल्यावर त्यांनी शंकरच आपली मदत करु शकतील असे सांगितले कारण मणि मल्ल यांना ब्रह्मदेवाने वरदान दिले होते. नंतर ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे व आपली पीडा शंकरांना कथन केली. हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्यांनी चैत्र पौर्णिमेस मार्तंड भैरव अवतार धारण केला.
 
मार्तंड भैरव व मल्ल यांच्या सैन्यात लढाई सुरू झाली. त्यांचे मोठमोठाले दैत्य परास्त होत असलेले बघून क्रोधित झालेल्या मल्लासुर स्वतः युद्धास निघाला पण मणिने आपल्या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला. मार्तंड भैरव देखील रणात उतरले दोघांमध्ये भीषण युद्धात सुरुवात झाली. शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशुळ सोडला तो मणिच्या छातीवर आदळला व तो कोसळला. मार्तंड भैरव आणि त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला तेव्हा त्याची सद विवेकबुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली. त्यावर मार्तंड संतुष्ट झाले आणि त्यांनी मणिस वर मागण्यास सांगितले. मणीने मार्तंड भैरवाचा पाय सदैव मस्तकी असावा असा वर मागितला. मार्तंड भैरवाने तथास्तु म्हटले. त्याने आपला प्राण सोडला.
 
ही वार्ता कळल्यावर मल्ल युद्दास निघाला. त्यावरही शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूल सोडला मल्ल सुराने अनेक अस्त्रांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्रिशूल छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला. मार्तंड भैरवांनी आपला पाय त्यावर ठेवला. त्या स्पर्शाने पावन झालेल्या मल्लासूर मार्तंड भैरवांची स्तुती करू लागले व तुझे नाव आधी माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी काय असावे असे मागणे त्याने मागितले. मार्तंडानी त्याला वर दिले. याने सर्वत्र आनंद झाला व देवगणांनी पुष्पवृष्टी केली लोक भयमुक्त जीवन जगू लागले.