Narasimha Jayanti 2023 puja vidhi नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असल्याची आख्यायिका प्रचलित आहे. भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत. अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नरसिंह कठोर शिक्षा देतात. नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. आपला भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण करून राक्षसांचा राजा हिरण्यकशिपू याचा वध केला होता. म्हणूनच या दिवशी नरसिंह जयंती साजरी केली जाते.
यंदा नरसिंह जयंती 4 मे 2023 गुरुवारी साजरी होणार आहे.
नृसिंह जयंती पूजा विधी Narasimha Jayanti 2023 Puja Vidhi
या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठावे.
संपूर्ण घराची स्वच्छता करावी.
नंतर गंगा जल किंवा गोमूत्र शिंपडावे आणि घर पवित्र करावे.
तत्पश्चात निम्न मंत्र उच्चारण करावे :-
भगवान नृसिंह पूजन मंत्र -
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे।
उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जितः॥
या मंत्रासह दुपारी क्रमशः तीळ, गोमूत्र, मृत्तिका आणि आवळा मिसळून पृथक-पृथक चारवेळा स्नान करावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे.
पूजा स्थळी शेणाने सारवून कळश्यात तांबा व इतर वस्तू घालून त्यात अष्टदल कमळ तयार करावे.
अष्टदल कमळावर सिंह, भगवान नृसिंह आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. तत्पश्चात वेदमंत्रांनी प्राण-प्रतिष्ठा करुन षोडशोपचार पूजन करावे.
भगवान नरसिंहाच्या पूजेमध्ये पंचामृत, फळे, फुले, पंचमेव, कुमकुम केसर, नारळ, अक्षत आणि पितांबर यांचा वापर करा.
भगवान नृसिंह मंत्र ऊं नरसिंहाय वरप्रदाय नम: मंत्राचा जप करावा.
देवाला गार पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
रात्री गायन, वादन, पुराण श्रवण किंवा हरि संकीर्तनने जागरण करावे. दुसर्या दिवशी पुन्हा पूजन करुन ब्राह्मणांना भोजन घालावे.
या दिवशी व्रत करावे.
सामर्थ्यनुसार भू, गौ, तीळ, स्वर्ण व वस्त्रादि दान करावे.
क्रोध, लोभ, मोह, झूठ, कुसंग आणि पापाचाराचा त्याग करावा.
या दिवशी व्रताने ब्रह्मचर्य पाळावे.
व्रत पाळणारा व्यक्ती सांसारिक दु:खापासून मुक्त होतो.
भगवान नरसिंह आपल्या भक्ताचे रक्षण करतात.
व्रतीला त्याच्या इच्छेनुसार धन-धान्य मिळते.
नृसिंहाची आरती Narasimha Jayanti 2023 Aarti
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।
अवनी होत आहे कंपायमान।
तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।
उग्ररूपें प्रगटे तो सिंहवदन।। 1 ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या ।
जय देव जय देव ।।
एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी।
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी।
चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं।
कैलासीं शंकर दचके मानसीं।। 2 ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित।
तीक्ष्ण नखांनीं ऐसा दैत्य तो विदारीत।
अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित।
माधवदासा स्वामी नरहरि शोभत।। 3 ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
नृसिंह अवतार का घेतला? Narasimha Jayanti 2023 Katha
कश्यप ऋषींच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव हिरण्यकश्यप होते. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले होते आणि देव, देवी, पुरुष, स्त्री, असुर, यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी त्यांना मारू शकणार नाही असे वरदान प्राप्त केले होते. ना दिवसा, ना रात्री, ना दुपारी, ना घरात, ना बाहेर, ना आकाशात, ना पाताळात, ना अस्त्राने, ना शस्त्राने कोणीही त्याचा वध करु शकतं नव्हतं. हे वरदान प्राप्त करून तो स्वतःला देव समजू लागला.
हिरण्यकश्यप आपल्या प्रजेला त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला, जे त्याची पूजा करत नाहीत, त्यांचा तो विविध प्रकारे छळ करत असे. भगवान विष्णूच्या भक्तांवर त्यांचा राग यायचा. हिरण्यकश्यपला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. तो भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता.
हिरण्यकश्यपला ही गोष्ट कळताच त्याने प्रल्हादला समजावले. त्याने आपल्या मुलाला सांगितले की मीच देव आहे, त्याने फक्त त्याचीच पूजा करावी. परंतु हिरण्यकश्यपने वारंवार ताकीद दिल्यानंतरही प्रल्हादने भगवान विष्णूंवरील आपली भक्ती सोडली नाही.
हिरण्यकश्यपने प्रल्हादला आपला अपमान समजून मारण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु श्री हरी विष्णूच्या कृपेने तो वाचला. शेवटी हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला हातात घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले. होलिकाला आशीर्वाद मिळाला होता की अग्नी तिला जाळू शकत नाही. पण जेव्हा होलिका प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली तेव्हा श्रीहरीच्या कृपेने ती स्वतः त्या आगीत जळून गेली आणि प्रल्हाद वाचला.
शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपने आपला मुलगा प्रल्हाद याला एका खांबाला बांधले आणि त्याला मारण्यासाठी तलवार काढली आणि म्हणाला, मला सांग तुझा देव कुठे आहे, प्रल्हाद म्हणाला की या खांबात देखील देव आहे. हे ऐकून रागाच्या भरात हिरण्यकश्यप प्रल्हादचा वध करणार तेवढ्यात खांबातून नृसिंह बाहेर पडले हिरण्यकश्यपचा वध केला.
फळ- शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा केली पाहिजे. पद्म पुराणानुसार भगवान विष्णूच्या या उग्र रूपाची पूजा केल्याने पाप नष्ट होते आणि संकटेही दूर होतात.
ज्याप्रमाणे विष्णुजींनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले, त्याचप्रमाणे कोणत्याही संकटाच्या वेळी भगवान नरसिंहाचे स्मरण केल्यास भक्तांना संकटातून त्वरित मुक्ती मिळते. जे भक्त नृसिंह जयंतीच्या दिवशी भगवान नृसिंहाची पूजा करतात त्यांना शत्रूंवर विजय प्राप्त होतो. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होते.
भगवान नरसिंहाची उपासना केल्याने मनोबल वाढते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता दूर होते आणि शौर्य, गती आणि शक्ती मिळते.