रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (19:13 IST)

Jambuvant in Tirupati temple तिरुपती मंदिरात जांबुवंत

jumbawat
भारताचा इतिहास आणि संस्कृती अतिप्राचीन आहे. त्यामुळे कित्येक ऐतिहासिक व्यक्ती आणि घटना वादग्रस्त आहेत. त्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. उदा. राम, कृष्ण, कौरव, पांडव, सुग्रीव, वाली, जांबुवंत यासारख्या अनेक व्यक्ती व त्यांच्याशी संबंधित असलेल्या घटना. गेल्या दोन-अडीचशे वर्षापासून असे अनेक वाद चालू आहेत. अशा वादांना मुख्त: ब्रिटिशांनी खतपाणी घातले. पण तरीही कित्येक एतद्देशी विद्वानांनी वस्तुनिष्ठ पुरावंच्या आधारे त्यांना समर्पक उत्तरे दिली.  
 
रामायण आणि महाभारत ही आर्ष महाकाव्ये प्राचीन असून ती भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा मानबिंदू आहेत. समस्त समाजाच्या मनामध्ये आजही या महाकाव्यांविषयी अत्यंत आदर व पूज्यबुद्धीची भावना आहे. आद्य शंकराचार्यांच्या मते वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणे हा सत्य इतिहासच आहे. तरीही पुरातत्त्वशास्त्राच्या नियमाप्रमाणे पाहता हा ‘इतिहासपूर्वकाळ’ ठरतो. याचे कारण संस्कृत भाषेतील लिखित साधनांमधून या काळाविषयी वेगवेगळ्या प्रकारची बरीच माहिती मिळत असली तरी या काळातील मानवाने बनविलेल्या निरनिराळ्या वस्तू आणि त्याने निर्मिलेल्या वास्तू उत्खननांमधून दिसत नाहीत. अर्थात ‘वाल्मीकीरामायण’ या वाल्मीकीऋषीरचित ग्रंथावर भाष्य करणारे ग्रंथ अनेक विद्वान संशोधकांनी लिहून प्रसिद्ध केले आहेत. त्याचमाणे महाभारतावरही विपुल ग्रंथलेखन झाले आहे. या महाकाव्यांमधून उल्लेख केलेल्या व्यक्ती व घटना खरोखरच ऐतिहासिक आहेत की त्या निव्वळ दंतकथा आहेत, याविषयी विस्तृत चर्चा केली आहे. त्यासाठी या संशोधकांनी पुरातत्त्वशास्त्राबरोबरच जेतिषशास्त्र, खगोलशास्त्र, गणित इत्यादी काही शास्त्रांची मदत घेतली आहे. 
 
रामायणातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे जांबुवंत किंवा जांबुवान. वाल्मीकी रामायणाच्या युद्धकांडामध्ये जांबुवंताबद्दल माहिती आलेली आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध प्रकांडपंडित सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी त्यांच्या ‘प्राचीन चरित्र कोश’ या ग्रंथात त्याबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर ब्रह्मंड, वायू आणि वराहपुराणातही त्याच्याबद्दल माहिती आली आहे. ‘वानर’ या शब्दाचा अर्थ वनात राहणारे नर. हे वानर म्हणजे माकड नसून मानवच होते. या जमातीचे वास्तव्य आजच्या कर्नाटकातील हंपी परिसरात (प्राचीन पंपा सरोवर) होते. जांबुवंत हा या जमातीतील सर्वश्रेष्ठ नरपुंगव होता. तत्कालीन समाजात त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. तो एक पराक्रमी ऋक्षराज होता. तो सुग्रीवाचा सेनापती असून राम-रावण युद्धात एक ज्येष्ठ आणि वयोवृद्ध वानरसेनापती या नात्याने त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. जांबुवंताचा जन्म ब्रह्मदेवाच्या जांभईपासून झाला होता. हा धूम्र नामक वानराचा ज्येष्ठ बंधू पुत्र होता. ब्रह्मंडपुराणाच्या मते हा प्रजापती व रक्षा यांचा पुत्र असून त्याच्या पत्नीचे नाव वघ्री आणि कन्येचे नाव जांबवंती असे होते. जांबुवंत-जांबवती नामाचा विशेष उल्लेख ब्रह्मंडपुराणाव्यतिरिक्त श्रीब्रह्मंडपुराणोक्त, व्यंकटाचलमाहात्म्य आणि वेंकटेशसहस्त्रनाम स्तोत्रात केलेला आहे. जांबुवंत हा प्रखर शिवभक्त होता. त्याने ‘दशांग’ नावाच्या पर्वतावर एका शिवलिंगाची स्थापना केली होती. पुढे त्याच्याच नावावरून हे लिंग ‘जांबवंत लिंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आंध्र प्रदेशातील तिरुपती-तिरुमल येथील व्यंकटेश्वराच्या मंदिराला सात द्वारे (आवरण) आहेत. प्रत्येक द्वारात देवदेवतांच्या, ऋषिमुनींच्या आणि गंधर्वांच्या मूर्तिशिल्पांची स्थापना करण्यात आली आहे. त्यात जांबुवंताचही मूर्तिशिल्पाचा समावेश आहे. त्याचे शिल्प सहाव्या द्वारात आहे. भगवान व्यंकटेश्वरांनी आपल्या विवाह (कल्याण) सोहळप्रसंगी सर्व देवदेवता, ऋषिमुनी, यक्ष, गंधर्व आणि किन्नरांना निमंत्रण दिले होते. श्री व्यंकटेश्वरांनी सर्वाचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार केला होता. यावेळच्या निमंत्रितांमध्ये जांबुवंताचाही समावेश होता. 
 
वाल्मीकीरामाणानुसार सीतेचा शोध घेण्यासाठी जांबुवंत अंगदाबरोबर दक्षिण दिशेला गेला होता. वयोवृद्ध असूनही सीतेच्या शोधासाठी 90 योजनेर्पत उड्डाण करून जाण्याची तयारी त्याने दर्शविली होती. त्याच्याच सूचनेवरून अंगदाने हनुमानास सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेस पाठविले होते. 
 
राम-रावण युद्धात आपल्या एक कोटी सैनिकांसह जांबुवंत रामाच्या बाजूने सहभागी झाला होता. रामाने आपल्या वानरसेनेचा पार्श्वरक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली होती. महानाद, इंद्रजित आणि महापार्श्व या रावणपक्षी राक्षसांशी त्याने युद्ध केले होते. वानरसेनेला पुनरूज्जीवित करण्यासाठी औषधीयुक्त द्रोणागिरी घेऊन येण्याची आज्ञा त्यानेच हनुमानाला केली होती. रावणवधानंतर रामपक्षाचा विजय  झाल्याची आनंदवार्ता नगारे पिटून यानेच समस्त वानरसेनेला कळविली होती. 
 
पुढे रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी जांबुवंत 500 नद्यांचे जल घेऊन अयोध्येत उपस्थित होता. त्याच्या युद्धातील कामगिरीबद्दल रामाने त्याचा यथोचित गौरव केला होता आणि त्याला ‘दीर्घायुषी हो’ असा आशीर्वाद दिला होता. रामाच्या राज्याभिषेकानंतरच अश्वमेध दिग्विजात शत्रुघ्नाबरोबर जांबुवंतही गेला होता. एवढय़ा माहितीवरून आपणास जांबुवंताची महती व स्थान लक्षात येते. जांबुवंताचे रामायणकालीन समाजात असलेले उच्च स्थान लक्षात येते. तो आदरणीय आणि वंदनीय होता. वानरजमातीतील सर्वश्रेष्ठ नरपुंगव तर तो होताच पण भगवान श्रीरामासारख्या थोर विभूतीने दिलेल्या सन्मानामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिकच उजळून निघाले आहे. पण लेखाच्या सुरूवातीलाच म्हटलप्रमाणे राम-कृष्ण आदींचे ऐतिहासिकत्व अजूनही वादाच्या भोवर्‍यात अडकले आहे. त्याबरोबर जांबुवंत ही ऐतिहासिक व्यक्ती होती की केवळ एक दंतकथा अथवा वाल्मीकी ऋषींनी आपल्या प्रतिभेने निर्माण केलेली पात्रे होती, असा वाद गेली शे-दोनशे वर्षे चालूच आहे. जांबुवंताचे ऐतिहासिकत्व सिद्ध करायचे असेल तर त्यापूर्वी रामायण खरोखरच घडले की नाही आणि जर घडले असेल तर त्याचा काळ निश्चित ठरविता आला पाहिजे. अंत:स्थ आणि बहि:स्थ प्रमाणे पाहता रामायणाचा काळ महाभारताच्याही पूर्वीचा असला पाहिजे. हे निश्चित आहे. महाभारताचा काळ हा इ.स. पूर्व 3032 असा ठरविण्यात आला आहे. त्यामुळे रामायणात वर्णन केलेल्या घटना साधारणपणे इ.स. पूर्व 3032 पूर्वी घडल असल्या पाहिजेत. पण रामायण-महाभारताची रचना एखाद्या विशिष्ट काळात झालेली नाही. 
 
त्यामध्ये बराच काळ भर पडत गेली आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती, घटना, कथा यांची सरमिसळ त्यामध्ये झाली आहे. अर्थात वाल्मीकी ऋषींनी लिहिलेल्या मूळ रामायणाचा विस्तार किती आहे, तसेच त्यामध्ये कोणत्या कथा वा घटनांची भर घातली गेली आहे, हे नीरक्षीरविवेकाने लक्षात येते. कारण ही रचना इ.स. च्या दुसर्‍या शतकापर्यंत चालू होती. थोडक्यात सांगायचे म्हणजे जांबुवंत ही राम-कृष्णाप्रमाणेच एक ऐतिहासिक व्यक्ती होती आणि तो रामाचा समकालीन होता हे निर्विवाद आहे.
 
jambuwant 2ग्रीक महाकवी होमर याने इलिड आणि ओडेसी अशी दोन अमर महाकाव्ये रचली. खरे तर हाही इतिहासच आहे. ग्रीक समाजासहित संपूर्ण युरोपमध्ये या कलाकृतींना मोठय़ा प्रेमादराचे व आपुलकीचे स्थान आहे. पण 19 व शतकाच उत्तरार्धात ब्रिटिशांनी ‘रामायण म्हणजे होमरच्या इलियडची भ्रष्ट नक्कल आहे.’ असा प्रचार करावयास सुरूवात केली. ‘रामायण’ व ‘इलियड’मधील काही साम्स्थळेसुद्धा त्यांनी दाखविली. म्हणून तवेळी त्यांना उत्तर देण्यासाठी तत्कालीन विद्वान संशोधक न. काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे उभे राहिले. रामायणाचा सखोल अभ्यास  व संशोधन करून त्यांनी ‘वाल्मीकीचे रामायण हे होमरवरून उतरले आहे का?’ अशा शीर्षकाचा एक प्रदीर्घ संशोधनात्मक निबंध लिहिला. तो त्या काळी जगभर गाजला. या शोधनिबंधामुळे न. तेलंग यांची प्रखर बुद्धिमत्ताच केवळ जगाला दिसली नाही तर त्यातील वस्तुनिष्ठ व ठोस पुरावमुळे जांबुवंत या वानर जमातीतील श्रेष्ठ व्यकितमत्त्वाच्या ऐतिहासिकतेवर शिक्कामोर्तब झाले. आजही जांबुवंताचा वारसा सांगणारा ‘जांबमुनी मोची समाज’ सोलापूर, उर्वरित महाराष्ट्र आणि महाराष्ट्रबाहेरही विद्यमान आहे. 
 
युरोपातील संशोधनपरंपरेचे एक ठळक उदाहरण सांगतो. हाईनरिश श्लीमान या उद्योगपतीच्या वाचनात एकदा ग्रीक महाकवी होमर याची ‘इलियड’ आणि ‘ओडेसी’ ही महाकाव्ये आली. तो जर्मनीहून ग्रीसमध्ये आला आणि होमरने आपल्या महाकाव्यात उल्लेखिलेली ठिकाणे प्रत्यक्षात अस्तित्वात होती की नाही, तसेच महाकाव्यात उल्लेख केलेल्या घटना प्रत्यक्षात घडल्या की नाही याचा शोध घेण्याचे त्याने   ठरविले. तोपर्यंत होमर आणि त्याची महाकाव्ये म्हणजे केवळ दंतकथाच आहेत असा समज संपूर्ण युरोपभर होता. श्लीमान हा ट्रॉय  (हिस्सारलिक) या ठिकाणी आला आणि त्याने पुरातत्त्वज्ञाच्या भूमिकेत शिरून तेथे उत्खननास सुरूवात केली. जवळजवळ 20 वर्षे उत्खनन केल्यानंतर श्लीमानने तेथील वसाहतींचे अभ्यासांती नऊ कालखंड पाडले आणि त्यातला सहावा कालखंड होमरचा आहे हे सिद्ध केले. 1891 च्या सुमाराला त्याचे निधन झाले. पण त्याच्या ग्रीक पत्नीने त्याचे हे काम पूर्ण केले. अशी संशोधनाची चिकाटी भारताच्या इतिहासातील समस्या सोडविण्याबाबत आपण दाखविली पाहिजे.
 
 प्रा. डॉ. सत्यव्रत नुलकर