शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 13 जून 2022 (12:40 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 11 ते 20

nivruttinath maharaj
प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत । कुळीं उगवत भाग्ययोगें ॥ १ ॥
तें रूप पंढरी उभें असे सानें । त्रिभुवनध्यान वेधियेले ॥ २ ॥
उगवली ज्योति प्रभा पैं फाकती । नाहीं दीनराती पंढरीये ॥ ३ ॥
प्रभात हरपे सायंकाळ लोपे । दिननिशी लोपे विठ्ठलप्रभा ॥ ४ ॥
पृथ्वी हे ढिसाळ वायु व्योमफळ । सेविती अढळ जोडती रया ॥ ५ ॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ । पंढरी ये राम विश्रामले ॥ ६ ॥
*****
सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण । पतीतपावन हरि एक ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिका वोळलें । आणूनि ठेविलें भीमातीरीं ॥ २ ॥
नलगती त्या सिद्धि करणें उपाधी । नित्य चित्तशुद्धि विठ्ठलनामें ॥ ३ ॥
कळिकालासि त्रास चित्तीं ह्रषिकेश । उगवला दिवस सोनियाचा ॥ ४ ॥
त्रिभुवनीं थोर क्षेत्र पैं सार । विठ्ठल उच्चार भीमातीरीं ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर । नित्यता आचार विष्णुमय ॥ ६ ॥
*****
उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥
तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥
रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥
भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥
विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥
निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥
*****
पंढरीये चोख रूपडें अशेख । भीमातीरीं देख पुण्यभूमी ॥ १ ॥
आदिपीठ देव ब्रह्म हें स्वयमेव । पुंडलिक भाव प्रगटला ॥ २ ॥
जन हें कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ । कीर्तनीं कळीकाळ दूरी ठाये ॥ ३ ॥
नाम हें विठ्ठल नलगे पैं मोल । नित्यता सकळ पांडुरंग ॥ ४ ॥
त्रिविधताप पाप तें जिंतील अमूप । मुरतील संकल्प एक्या नामें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी । सर्वत्र चराचरीं बोलियेलें ॥ ६ ॥
*****
जनासी तारक विठ्ठलचि एक । केलासे विवेक सनकादिकीं ॥ १ ॥
तें रूप वोळले पंढरीस देखा । द्वैताची पै शाखा तोडीयेली ॥ २ ॥
उगवलें बिंब अद्वैत स्वयंभ । नाम हें सुलभ विठ्ठलराज ॥ ३ ॥
निवृत्तीचें गूज विठ्ठल सहज । गयनीराजें मज सांगितलें ॥ ४ ॥
*****
पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी । विष्णु चराचरीं ग्रंथीं पाहे ॥ १ ॥
तें रूप विठ्ठ्ल ब्रह्माकार दिसे । पंढरी सौरस भींमातीरीं ॥ २ ॥
जगाचे तारक पूण्य पूज्य लोका । तृप्त सनकादिक नामें होती ॥ ३ ॥
पतीतपावन नाम हे जीवन । योगीयाचें ध्यान हरि आम्हां ॥ ४ ॥
वेणुनादीं काला पिंडावती जाला । भाग्य भोगियला दृष्टी पूढें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे ते रूपडें अनंत । विठ्ठल संकेत तरुणोपेव ॥ ६ ॥
*****
हरिविण व्यर्थ आचार समर्थ । हरि हेंचि हेत अरे जना ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिकसंगे । एका नामें पांग पाश तोडी ॥ २ ॥
सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण । वेदमत्तें खुण ऐसी असे ॥ ३ ॥
निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद । नाहीं भिन्न भेद विश्वीं इये ॥ ४ ॥
*****
भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें । तें पुंडलिका संगें भीमातटीं ॥ १ ॥
ध्यान मनन एक करितां सम्यक । होय एकाएक एक तत्त्व ॥ २ ॥
उदोअस्तुमेळें ब्रह्म न मैळें । भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत विठ्ठल सतत । नघे दुजी मात हरिविण ॥ ४ ॥
*****
ध्येय ध्यान मनीं उन्मनीं साधनीं । लाविता निशाणी ध्यानमार्गे ॥ १ ॥
तें रूप सघन गुणागुणसंपन्न । ब्रह्म सनातन नांदे इटे ॥ २ ॥
विठ्ठलनामसार ऐसाचि निर्धार । मुक्ति पारावार तीं अक्षरीं ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत राहिला निश्चित । केलेंसे मथीत पुंडलिकें ॥ ४ ॥
*****
काळवेष दुरी काळचक्र करीं । बाह्य अभ्यंअती हरि नांदे ॥ १ ॥
सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरीं जाला । कृष्णें काला केला गोपवेषें ॥ २ ॥
गोपाळ संवगडे खेळे लाडेकोडे । यशोदेमाये पुढें छंदलग ॥ ३ ॥
निवृत्तिम्हणे तो स्वामी सकळांचा । दिनकाळ वाचा कृष्ण जपों ॥ ४ ॥
*****