गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (15:26 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 51 ते 60

nivruttinath maharaj
खुंटले वेदांत हरपले सिद्धांत । बोलणें धादांत तेंही नाहीं ॥१॥
तें रूप पहातां नंदाघरीं पूर्ण । यशोदा जीवन कॄष्णबाळ ॥२॥
साधितां साधन न पविजे खूण । तो बाळरूपें कृष्ण नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा । गयनीच्या द्विपा तारूं गेलें ॥४॥
 
तेथें नाहीं मोल मायाचि गणना । आपण येसणा ब्रह्मघडु ॥१॥
तें रूप साजिरें निर्गुण साकार । देवकीबिढार सेवियेले ॥२॥
नसंपडे ध्याना मना अगोचर । तो गोपवेषधर गोकुळीं रया ॥३॥
निवृत्ति धर्मपाठ गयनी विनट । कृष्ण नामें पाठ नित्य वाचा ॥४॥
 
नाहीं छाया माया प्रकृतीच्या आया । मनाच्या उपाया न चले कांही ॥१॥
तें रूप स्वरूप अपार अमूप । यशोदे समीप खेळतसे ॥२॥
विश्वाचा विश्वास विश्वरूपाधीश । सर्वत्र महेश एकरूपें ॥३॥
निवृत्ति सर्वज्ञ नाममंत्रयज्ञ । सर्व हाचि पूर्ण आत्माराम ॥४॥
 
प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा नेम । सर्वज्ञता तम गिळीतसे ॥१॥
तें रूप सकुमार गोपवेषधर । सर्वज्ञ साचार नंदाघरीं ॥२॥
त्रिपुर उदार सर्वज्ञता सूत्र । नाम रूप पात्र भक्तिलागीं ॥३॥
निवृत्ति संपदा सर्वज्ञ गोविंदा । सूत्रमणी सदा तेथें निमो ॥४॥
 
ज्ञानेंसि विज्ञास रूपेंसि सज्ञान । ध्यानेंसि धारणा हारपली ॥१॥
तें रूप संपूर्ण वोळलें हें खुण । नंदासी चिद्धन वर्षलासे ॥२॥
अरूप सरूप लक्षिता पै माप । नंदा दिव्य दीप उजळला ॥३॥
निवृत्ति संपूर्ण नामनारायण । सच्चिदानन्दघन सर्व सुखी ॥४॥
 
आदिरूप समूळ प्रकृति नेम वैकुंठ उत्तम सर्वत्र असे ॥१॥
तें रूप संपूर्ण वोळलें परींपूर्ण । सर्व नारायण गोपवेष ॥२॥
आधारीं धरिता निर्धारीं । सर्वत्र पुरता एकरूपें ॥३॥
निवृत्ति साधन सर्वरूपें जाण । एकरूपें श्रीकृष्ण सेवितसे ॥४॥
 
वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश । आकश‍अवकाश धरी आम्हा ॥१॥
तें रूप सुघड प्रत्यक्ष उघड । गौळियासी कोड कृष्णरूप ॥२॥
न दिसे निवासा आपरूपें दिशा । सर्वत्र महेशा आपरूपें ॥३॥
तारक प्रसिद्ध तीर्थ पै आगाध । नामाचा उद्धोध नंदाघरीं ॥४॥
प्रकाशपूर्णता आदिमध्य सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥५॥
निवृत्तिसाधन कृष्णरूपें खुण । विश्वीं विश्वपूर्ण हरि माझा ॥६॥
 
निरशून्य गगनीं अर्क उगवला । कृष्णरूपें भला कोंभ सरळु ॥१॥
तें रूप सुंदर गौळियांचे दृष्टी । आनंदाचि वृष्ट्सी नंदाघरीं ॥२॥
रजतमा गाळी दृश्याकार होळी । तदाकार कळी कृष्णबिंबें ॥३॥
निवृत्ति साकार शुन्य परात्पर । ब्रह्म हें आकार आकारलें ॥४॥
 
निरालंब सार निर्गुण विचार । सगुण आकार प्रगटला ॥१॥
तें रूप सुंदर शंखचक्रांकित । शोभे अनंत यमुनातटीं ॥२॥
अपार उपाय आपणचि होय । सिद्धीचा न साहे रोळु सदा ॥३॥
सर्व हें घडलें कृष्णाचें सानुलें । घटमठ बुडाले इये रूपीं ॥४॥
सर्वसुखमेळे नामाकृती वोळे । सिद्धिचे सोहळे कृष्णनामीं ॥५॥
 
ज्या नामें अनंत न कळे संकेत । वेदाचाही हेत हारपला ॥१॥
तें रूप सानुलें यशोदे तान्हुलें । भोगिती निमोले भक्तजन ॥२॥
अनंत अनिवार नकळे ज्याचा पार । जेथें चराचर होतें जातें ॥३॥
निवृत्तिसंकेत अनंताअनंत । कृष्णनामें पंथ मार्ग सोपा ॥४॥