शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

santoshi mata
जगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे असा पुराणात उल्लेख आहे. समस्त विश्वाला संतोष देणारी आणि भक्तांची श्रद्धाभक्ती पाहून त्यांच्या अल्पसेवेने संतुष्ट होणारी म्हणूनच तिला संतोषी माता असे म्हणतात. ती भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहे. ती परम मंगल करणारी, सर्व प्रकारचे सौभाग्य देणारी, कल्याण करणारी, संकटात रक्षण करणारी, सद्‌बुद्धी देणारी व जीवांना भवसागरातून तारून नेणारी आहे. आपल्या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेणारी व सर्वार्थाने साह्यकर्ती अशी तिची महत्कीर्ती आहे.
 
संतोषी मातेची दृढ श्रद्धेने व शुद्ध अंतःकरणाने सेवा, भक्ती व उपासना केल्याने दुःख व दारिद्र्य नष्ट होते, सर्व प्रकारचा क्लेशांचे व संकटांचे निवारण होते, ऐश्वर्य लाभते, वैभव मिळते, लक्ष्मी स्थिर होते, प्रपंचात सौख्य लाभते, समृद्धी येते, यश व कीर्ती वाढते, मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होते, विद्याभ्यासात प्रगती होते, गृहकलह नाहीसे होतात, घरात आनंदी, प्रसन्न व खेळकर वातावरण निर्माण होते, कुटुंबीयांमधील परस्पर प्रेम, स्नेह व विश्वास वृद्धिंगत होतो, चिंता दूर होऊन मनःस्वास्थ्य लाभते, धंदाव्यवसायात प्रगती होते, संतोषी माता ही, भक्ताच्यां इष्टकामना पुरवून त्यांचे कल्याण करणारी, शाश्वत कामधेनूच आहे. तिची व्रतोपासना केल्याने आपले इष्टकार्य लवकर सिद्ध होते.
 
पथ्ये, नियम व सूचना
दिनशुद्धी पाहून कोणत्याही शुक्रवारपासून हे व्रत सुरू करावे.
हे व्रत क्रमाने सोळा शुक्रवार करावयाचे आहे.
'व्रतसंकल्प' पहिल्या शुक्रवारी करावा.
संकल्पित व्रत पूर्ण झाल्यावर सतराव्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन करावे.
हे व्रत बारा वर्षावरील कोणतीही व्यक्ति, कुमार, कुमारी, प्रौढ स्त्रिया व पुरुष, पतिपत्‍नी उभयतांनी वा दोघांपैकी कोणीही एकाने, तसेच वृद्ध माणसे यांनी करावे.
या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी भोजन करावे.
या दिवशी संतोषी मातेची पंचोपचार पूजा करावी. पूजेनंतर संतोषी मातेचे माहात्म्य सांगणारी व्रतकथा वाचावी. प्रसाद म्हणून भाजलेले चणे व गूळ वाटावे. सायंकाळी देवीसमोर दिवा लावून नमस्कार करावा.
भाजलेले चणे व गूळ एका केळीच्या पानावर घेऊन ते या दिवशी गायीला खाऊ घालावे.
व्रतकालावधीत क्रमाने तीन शुक्रवार झाल्यावर येणार्‍या प्रत्येक चवथ्या शुक्रवारी एका ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमपूर्वक भोजन घालून संतुष्ट करावे आणि आशीर्वाद घ्यावेत.
या दिवशी घर स्वच्छ व पवित्र ठेवावे. घरातील वातावरण प्रसन्न आनंदी व मंगलमय असावे. भांडणतंटा वा वादविवाद करू नयेत. घरातील मंडळींनी व्रतकर्त्यास सर्वतोपरी साह्य करावे.
या दिवशी व्रतकर्त्याने व त्याच्या घरातील मंडळीपैकी कोणीही दही, ताक, लिंबू, कोकम, चिंच अशा कोणत्याही आंबट पदार्थाचे सेवन अजिबात करू नये. घरातील जेवणात त्याचा वापर करू नये व बाहेरही खाऊ नये.
इतर व्रतांप्रमाणे या व्रतातही व्रतदिनी परनिंदा करणे, खोटे बोलणे व्यर्थ वादविदाद करणे, भांडणतंटा करणे, अधर्माने वागणे आदी गोष्टी वर्ज्य कोणतेही व्यसन करू नये. मांसाहारही करू नये.
हे व्रताचरण करण्यामागील आपला संकल्प शुभ व कल्याणकारी असावा.
स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना मासिक अडचण आल्यास नियमानुसार उपवास व सायंकाळी भोजन करावे. अन्य नियमांचेही पालन करावे. पण तो शुक्रवार गृहीत धरू नये. जेवढे शुक्रवार आड येतील तेवढे शुक्रवार अधिक करून 16 ही संख्या पूर्ण करावी. व्रतोद्यापन त्यानंतरच्या शुक्रवारी करावे.
स्त्रियांच्या मासिक अडचणीच्या काळात शिवाशिवही पाळली जात नसेल तर घरातील कर्त्या स्त्रीस अडचण आल्यास पुरुष व्रतकर्त्यानेही तो शुक्रवार गृहीत धरू नये. अशा प्रकारे जेवढे शुक्रवार आड येतील तेवढे अधिक करून 16 ही संख्या पूर्ण करावी.
शुक्रवारचे उपवास जे नित्य करताता त्यांनी या सोळा शुक्रवारच्या व्रताबद्दल इष्ट कामनेचा उच्चार करून सकाम उपासना म्हणून त्या उपवासांचा विनियोग कराव. 17 व्या शुक्रवारी उद्यापन करून नेहमीचे शुक्रवाराचे उपवास चालू ठेवावे.
व्रतदिनी एकादिशी, महाशिवरात्री यांसारखे पूर्ण उपवासाचे दिवस आल्यास संतोषी मातेच्या पूजेत प्रसाद म्हणून फक्त गुळाचाच उपयोग करावा. उपवास करावा. तो शुक्रवार गृहीत धरु नये. एक शुक्रवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे.
सोहेर, सुतक, घरावर अचानक आलेली संकटे, स्वतःचे आजारपण, प्रवास, महापूर व भुकंपासारखे नैसर्गिक आपत्ती, व्रतकर्त्या स्त्रीच्या बाबतीत तिच्या मुलांचा आजार, तिच्या स्वतःच्या बाळंतपणानंतरचे तीन महिने अशा अनेक कारणांनी व्रताचरणात खंड पडण्याची शक्यता असते. अशा वेळी तेवढे शुक्रवार करू नयेत. उपवासही करू नयेत. अशा प्रसंगी जेवढे शुक्रवार झालेले असतील त्याचें पुण्य फुकट जात नाही, परिस्थिती अनुकूल होताच उरलेले शुक्रवार करून यथाविधि उद्यापन करावे.
 
व्रत संकल्प
कोणतेही व्रत संकल्पाशिवाय करू नये. संकल्पामध्ये आपण आपले नाव, संपूर्ण तिथी व ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी उपासनारूपाने ज्या व्रतदेवतेची ज्या प्रकारे सेवा करणार आहोत त्याचे उच्चारण करून ती व्रतोपासना निर्विघ्न पार पाडावी व इष्ट मनोरथपूर्ती व्हावी म्हणून त्या देवतेची प्रार्थना करावयाची असते. संकल्पाने व्रतात दृढपणा येतो व उपासना निर्विघ्न पार पडून त्या देवतेच्या कृपाशीर्वादाने इच्छित कार्य लवकर सफल होते. श्रीसंतोषी मातेचे ' सोळा शुक्रवारचे व्रत ' करतानाही त्या व्रताचा संकल्प पहिल्या शुक्रवारी करावयाचा आहे.
या दिवशी स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून कपाळास अष्टगंध वा कुंकुमतिलक लावावा.
श्रीगणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, दत्तात्रेय व संतोषी मातेचे स्मरण करावे, घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करावा. त्यानंतर घरातील देवांची नित्यपूजा करावी.
 
पूजा झाल्यावर देव्हार्‍यासन्मुख उभे राहून देव्हार्‍यातील सर्व देवांना हात जोडून नमस्कार करावा. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. श्रीगणपतीचे व श्रीसंतोषीमातेचे स्मरण करून पुढीलप्रमाणे संकल्प करावा- 
'श्रीगणेशाय नमः । हे गणपती, गजानना आणि हे संतोषी माते ! तुम्ही भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहात. भाविकांचे रक्षणकर्ते व प्रतिपालक आहात. संतसज्जनांचे साहाय्यकर्ते व दीनाअर्तांचे दुःख निवारण करणारे आहात. तुम्ही करूणासागर व कृपासिंधू आहात. तुम्हांला शरण आलेल्यांची तुम्ही कधीही उपेक्षा करीत नाही. म्हणूनच मी (आपले संपूर्ण नाव) आज शके तारीख, वार, महिना, पक्ष, तिथीस शुक्रवारी (मनःकामना सांगावी) हे कार्य सिद्धीस जावे म्हणून 'सोळा शुक्रवाराचे व्रत' करण्याचा संकल्प करीत आहे. या व्रताचे नियमानुसार आचरण करून मी श्रीसंतोषी मातेप्रीत्यर्थ पूजन, माहात्म्य वाचन, नमनाष्टकादी स्तोत्रवाचन, उपोषण व शुद्धाचरणादिकांनी यथाशक्ति सेवा करणार आहे. व्रतसाङ्गतेप्रीत्यर्थ यथाविधि उद्यापनही करणार आहे. हे व्रताचरण आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो. तसेच या व्रतसेवेने प्रसन्न होऊन आपण माझी मनःकामना पूर्ण करा अशी मी आपणास नम्र विनंती करतो.
 
श्रीगणेशाय नमः । श्रीसंतोषी मातायै नमः । मम कार्यं निर्विघ्नमस्तु।'
असे म्हणून तळहातावरील संकल्पयुक्त जल ताम्हनात सोडावे. गणपतीला व देव्हार्‍यातील देवीच्या मूर्तीला वा फोटोला एकेक फूल वाहून नमस्कार करावा. त्यानंतर ताम्हनातील जल तुळशीस घालावे. अशा प्रकारे विधिवतं संकल्प केल्यावरच या पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे व्रताचरणास प्रारंभ करावा. श्रीसंतोषी मातेची पूजाअर्चा करावी.
 
व्रतोपासना
व्रतकर्त्याने प्रत्येक शुक्रवारी सकाळी लवकर उठावे आणि सर्वप्रथम श्रीसंतोषी मातेचे भक्तिपूर्वक स्मरण करावे.
प्रातर्विधी आटोपून स्नान करावे. शुद्ध वस्त्रे नेसावी. कपाळास अष्टगंध वा कुंकुमतिलक लावावा. पिवळ्या रंगाचा एक हातरूमाल आपल्या उजव्या हाताच्या मनगटात बांधावा.
श्रीसंतोषी मातेची पूजा, आरती, महानैवेद्य झाल्यावर तो काढून ठेवावा.
श्रीगणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता व श्रीगुरुदेवांचे स्मरण करून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करावा.
घरातील देवांची नित्यपूजा करावी.
त्यानंतर श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीची पंचोपचार पूजा करावी.
संतोषी मातेचे पूजन करताना ती आपल्या सन्मुख साक्षात बसलेली आहे भाव असावा.
त्यानंतर व्रतकर्त्याने आपल्या उद्योगास लागावे. त्या दिवशी जमल्यास जवळपास असलेल्या संतोषी मातेच्या देवळात जाऊन तिचे दर्शन करून यावे.
 
सायंकाळी घरी परतल्यावर स्नान करून श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीची गंधाक्षता, पुष्पादिकांनी पूजा करावी. मातेला पूर्णान्नाचा नैवेद्य दाखवावा. मातेला दाखविलेले हे भोजनाचे ताट व्रतकर्त्याने स्वतः ग्रहण करावे. आधी गोग्रास द्यावा व मगच भोजन करावे. या भोजनात चण्याची डाळ घातलेला एखादा पदार्थ तसेच गूळ किंवा गूळ घातलेला एखादा पदार्थ असावा.
 
पंचोपचार पूजा
पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे.
जेथे पूजनासाठी चौरंग मांडायचा आहे त्या जागी रांगोळीने एक स्वस्तिक काढावे. मग चौरंग मांडून त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी.
चौरंगावर पिवळे कोरे वस्त्र घालावे.
त्या वस्त्राच्छादित चौरंगावर श्रीसंतोषी मातेची तसबीर ठेवावी.
चौरंगावर आपल्या उजव्या बाजुस थोड्या पिवळ्या अक्षता ठेवून त्यावर गणपतीपूजनासाठी (गणपतीचे प्रतीक म्हणून) एक सुपारी ठेवावी.
देवीच्या तसबिरीची पूजा करता येईल. अशा प्रकारे चौरंगावर थोडे तांदूळ पसरून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवावा. त्यात अष्टगंध, हळद-कुंकू, अक्षता व फूल घालावे. त्याच्या मुखावर आंब्याच्या पानांच्या एक डहाळ ठेवावा. मग त्या तांब्यावर एक ताम्हन ठेवावे. त्या ताम्हनात गुळाचा एक खडा चणे ठेवावा. चौरंगावर मातेसमोर एक नारळ ठेवावा.
चौरंगावर डाव्या बाजूस एक घंटा ठेवावी. चौरंगावर उदबत्ती, निरांजन, नैवेद्य, विडा व दक्षिणा ठेवण्यास पुरेशी जागा असावी. पूजेचे साहित्य तबकात आपल्या उजव्या हातास ठेवावे.
समई प्रदीप्त करून चौरंगाच्या शेजारी आपल्या डाव्या बाजूस थोडी मागे ठेवावी.
स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे.
 
पूजा प्रारंभ
पूजनाला बसण्यापूर्वी आपल्या इष्टदेवांना हळदकुंकू वाहून देवांपुढे एक विडा (विड्याची दोन पाने, एक नाणे व एक सुपारी) ठेवावा व नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍यांना वंदन करून आसनावर बसावे व पूजेस सुरुवात करावी. प्रथम
 
'वक्रतुण्ड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥'
असे म्हणून श्रीगणपतीला नमस्कार करावा. त्यानंतर
 
'ॐ नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥'
हा देवी - मंत्र म्हणून श्रीसंतोषी मातेला नमस्कार करावा. मग पूजेचा संकल्प करून एक फूल गंधाक्षतांसहित सुपारीरूप गणपतीवर वाहावे. नमस्कार करावा. त्यानंतर श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीची पुढील प्रमाणे पंचोपचारांनी पूजा करावी.

पंचोपचार पूजाविधी
सर्वप्रथम मातेचे थोडा वेळ ध्यान करावे. पूजा करताना आधी ' श्रीसंतोषी मातार्यै नमः ।' हा मंत्र म्हणून मगच उपचार अर्पण करावेत.
श्रीसंतोषी मातार्यै नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
श्रीसंतोषी मातेचे चरण व मस्तकास आधी गंध वा अष्टगंध लावून त्यावर कुंकुम तिलक लावावा.
 
श्रीसंतोषी मातायै नमः । पूजार्थे पुष्पं समर्ययामि ।
श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीला फुलांची माळ घालावी, वेणी अर्पण करावी व तिच्या चरणांशी एक फूल ठेवावे.
 
श्रीसंतोषी मातायै नमः । सुवासार्थे धूपं समर्पयामि ।
श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीसमोर उदबत्ती पेटवून किंवा धुपाटण्यात धूप पेटवून उजव्या हाताने देवीला ओवाळून ती उदबत्ती वा धुपाटणे चौरंगावर ठेवावे. या वेळी डाव्या हातात घंटा घेऊन ती वाजवावी व पुन्हा चौरंगावर आपल्या डाव्या बाजूस ठेवावी.
 
श्रीसंतोषी मातायै नमः । दीपार्थे नीरांजनदीपं समर्पयामि ।
नीरांजनात तूप व फुलवात घातलेली असावी. ते प्रदीप्त करून व डाव्या हातात घंटा घेऊन घंटानाद करीत श्रीसंतोषी मातेला ओवाळावे. चौरंगावर घंटा आपल्या डाव्या बाजूस तर निरांजन उजव्या बाजूस ठेवावे.
 
श्रीसंतोषी मातायै नमः । नैवेद्यार्थे मिष्टान्न - नैवेद्यं समर्पयामि ।
चौरंगावर मातेच्या समोर आधी पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर भाजलेले चणे व गुळाचे पात्र व फळे ठेवावीत. त्या नैवेद्याभोवती डावीकडून उजवीकडे पाणी हातात घेऊन परिसिंचन करावे. मातेला दाखविलेला हा गूळ - चण्यांचा नैवेद्य नंतर ताम्हनातील गूळ - चण्यांमध्ये मिसळून सर्वाना प्रसाद म्हणून वाटावा.
 
' श्रीसंतोषी मातायै नमः । यथाशक्ति द्रव्यात्मकां दक्षिणां समर्पयामि।'
असे म्हणुन मातेसमोर एक वा दोन रुपयांचे एक नाणे ठेवून त्यावर उजव्या हातावरुन पळीभर पाणी सोडावे व नमस्कार करावा.
 
त्यानंतर मातेसमोर ठेवलेल्या नारळास कुंकू लावावे.
मातेच्या पोथीवर गंधाक्षता व फुले वाहून तिला नमस्कार करावा.
मग 'श्रीसंतोषी माता नमनाष्टक' म्हणून 'श्रीसंतोषी माता माहात्म्य ' अर्थात सोळा शुक्रवार व्रताची कथा वाचावी.

त्यानंतर मातेची मनोभावे आरती करावी, मंत्रपुष्पांजली म्हणून पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी-
"माते! तुझे माहात्म्य अत्यंत श्रेष्ठ असून ते तुझी कृपा, तुझे आशीर्वाद व तुझे सामिप्य प्राप्त करून देणारे आहे. तुझे परमपावन असे माहात्म्य श्रवण केल्यानेही भाविकांचे कल्याण होते. मी तुझी हळद-कुंकू, गंधाक्षता, फुले, पुष्पमाला, धूप, दीप, नैवेद्य व दक्षिणा या पंचोपचारांसह जी मनोभावे पूजा केली आहे त्या पूजेचा तू स्वीकार कर. मी केलेल्या आरतीचा स्वीकार कर. माझे सर्व अपराध पोटात घालून मी, ही जी तुझी पूजनरूपी अल्प सेवा केली आहे तिचा स्वीकार कर. या पूजेत काही न्यून राहिले असेल वा माझे काही चुकले असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा कर. 
 
माते! तू सर्वसमर्थ असून आपल्या भक्तांना इष्टफल देणारी आहेस. तू मज बालकावर प्रसन्न हो! मला सुखी ठेव, मला दीर्घायुषी कर, माझे सर्व मनोरथ पूर्ण कर आणि माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेव. 
 
माझ्या हृदयरूपी मंदिरात तुझा नित्य वास राहो, माझ्या मुखात सतत तुझेच नाम राहो, मी तुझ्या परमपावन चरणांना मनोभावे नम्र नमस्कार करतो" त्यानंतर ताम्हनातील चणे आणि गूळ प्रसाद म्हणून सर्वांना वाटावेत. तांब्याच्या कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडून उरलेले पाणी तुळशीस घालावे.
 
पूजा विसर्जन
दुसर्‍या दिवशी आंघोळ केल्यावर श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीला गंधाक्षता व हळद-कुंकू वाहावे, अगरबत्तीने ओवाळावे व नमस्कार करावा. या उत्तरपूजेनंतर देवीच्या तसबिरीवर व गणपतीच्या प्रतीकस्वरूप सुपारीवर तुलसीपत्राने पाणी शिंपडून 'पुनरागमनायच' । असे म्हणून ती तिथल्या तिथे हलवावी. हे विसर्जन होय. त्यानंतर सर्व वस्तु नीट उचलून, स्वच्छ करून त्यांच्या जागी ठेवाव्यात. गणपती म्हणून पुजलेली सुपारी देव्हार्‍यात ठेवावी व तीच सुपारी पुढील प्रत्येक शुक्रवारी पूजेसाठी घ्यावी. व्रतोद्यापन झाल्यावर ती दक्षिणेसह ब्राह्मणास दान द्यावी. श्रीसंतोषी मातेला दक्षिणा म्हणून ठेवलेली नाणी काळजीपूर्वक एकत्र जमवून ठेवावीत. उद्यापनानंतर ती सर्व दक्षिणा संतोषीमातेच्या वा देवीच्या मंदिरातील दानपेटीत टाकावी. पूजेचे निर्माल्य वेळेवर विसर्जित करावे. ते साठवून ठेवू नये.
 
व्रत उद्यापन
कोणत्याही व्रताचे उद्यापन हे संकल्प केल्याप्रमाणे तितक्या संख्येतील वारांइतके व्रताचरण झाल्यानंतर पुढील आठवड्यात त्याच वारी करावयाचे असते. या व्रताचे उद्यापनही संकल्पानुसार सोळा शुक्रवारांपर्यंत व्रताचरण करून सतराव्या शुक्रवारी करावे.
या दिवशी नेहमीप्रमाणे श्रीसंतोषी मातेची पंचोपचार पूजा करावी, व्रतकथा वाचावी व आरती करावी.
या दिवशी सव्वा पटीतील किंमतीचे भाजलेले चणे व गूळ आणून त्याचा प्रसाद करावा.
या दिवशी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करावा. त्यात खीर व पुरी यांचा समावेश असावा. कांदा, लसूण वर्ज्य. आंबट पदार्थांचा वापर करू नये.
या दिवशी संतोषी मातेला महानैवेद्य दाखवावा. तिला विडा व दक्षिणा अर्पण करावी. एक पान गायीसाठी काढून ते गायीला खाऊ घालावे. भोजनाच्या वेळी मातेला दाखविलेला महानैवेद्य व्रतकर्त्याने ग्रहण करावा.
उद्यापनास 1 कुमारिका, 8 लहान मुले व 5 ब्राह्मण यांना घरी भोजनास बोलवावे. त्या सर्वांना आदराने पोटभर जेवू घालावे. भोजनानंतर कुमारिकेला (संतोषी माता समजून) हळद - कुंकू लावावे. तिला खण अथवा वस्त्र व श्रीफळ देऊन नमस्कार करावा. आठ लहना मुलांना गंधाक्षता लावून एकेक फळ द्यावे. ब्राह्मणांना गंधाक्षता लावून वस्त्र व यथाशक्ति दक्षिणा द्यावी. नमस्कार करावा.
 
पाच सुवासिनींना प्रसादासाठी आमंत्रित करून त्यांना हळद-कुंकू लावावे. चणे व गुळाचा प्रसाद द्यावा. त्यांना एक फळ व या व्रताची एकेक पुस्तिका देऊन नमस्कार करावा.
उद्यापनाच्या दिवशी श्रीसंतोषी मातेची पूजा करताना या व्रतपुस्तिकांचीही हळदकुंकू, गंधाक्षता व फुले वाहून पूजा करावी व नंतरच ती 'संतोषी मातेच्या भक्तीची प्रचार व प्रसार व्हावा, इतरांनाही तिच्या कृपेचा प्रसाद प्राप्त व्हावा' या सद्‌भावनेने भेट द्यावीत.
 
सायंकाळी संतोषी मातेच्या तसबिरीसमोर तुपाचा दिवा व सुगंधी अगरबत्ती लावून हात जोडून पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी-
"हे कल्याणकारिणी संतोषी माते! हे सर्वार्थसाधिके शुभदे अनंते! मी तुला नमस्कार करतो. आज तुझ्याच परम कृपेने तुझे सोळा शुक्रवारचे हे पावन व्रत उद्यापनासहित यथाविधि पूर्ण कृपेने तुझे सोळा शुक्रवारचे हे पावन व्रत उद्यापनासहित यथाविधि पूर्ण झाले आहे. ही सेवा तू गोड मानुन घे. यातील न्यून पुरते करून घे आणि माझे इष्ट मनोरथ पूर्ण करण्याची कृपा कर. माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेव."
 
या दिवशी शक्य असल्यास जवळच असलेल्या संतोषी मातेच्या देवळात जाऊन देवीचे दर्शन करून यावे.
रात्री संतोषी मातेचे भजन व नामस्मरण करावे. पुजाविसर्जन दुसर्‍या दिवशी करावे.
विशेष सूचना- सोळा शुक्रवारचें व्रताचरण पूर्ण झाल्यावर सतराव्या शुक्रवारी उद्यापन करण्यास काही अडचण संभवत असल्यास श्रीसंतोषी मातेला आपली अडचणी सांगून उद्यापनाचा संकल्प करून ठेवावा व लवकरात लवकर उद्यापन करावे.