सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय १०

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरुक्मिणीकांताय नमः ॥    ॥
आजि दैवदशेसी जाहला उदय ॥ जे श्रवणीं ऐकिला भक्तविजय ॥ हा आनंद वाचेसी बोलतां नये ॥ संगूं काय निजमुखें ॥१॥
कल्पतरु उगवला अंगणीं ॥ तया फळें आलीं चिंतामणी ॥ कीं सुधारस वर्षला घनीं ॥ मेदिनीवरी अपार ॥२॥
कीं द्वादश तरणी एक वेळे ॥ शीतळ होऊनि उदया आले ॥ कीं सकळ सरिता अमृतजळें ॥ वाहूं लागल्या पृथ्वीवरी ॥३॥
कीं हिरे रत्नें चिंतामणी ॥ एकसरें उघडली खाणी ॥ लुटावी हे सभाग्य नरांनीं ॥ आळस समूळ दवडोनियां ॥४॥
कीं हिरेरत्नांसारिखी जाण ॥ वाळूची जाहली न लागतां क्षण ॥ कीम बरडगोटे चिंतामण ॥ अभंग जाहले कीं ॥५॥
संकल्प विकल्प नाना परी ॥ तें दरिद्र पळोनि गेलें दूरी ॥ म्हणोनि प्रेमामृतलहरी ॥ प्राप्त जाहली श्रोतयां ॥६॥
अमृताहूनि विशेष जाण ॥ प्रेमामृत वाटे मजकारण ॥ जे अमर करिती अमृतपान ॥ ते वांच्छिती प्रेमामृत ॥७॥
अमृतपान देव करिती ॥ तेही कल्पांतीं नाश पावती ॥ परमामृत जे सेविती ॥ ते अक्षयी होती चिरंजीव ॥८॥
म्हणूनि अवधान करूनि प्रबळ ॥ कथा ऐका भक्त प्रेमळ ॥ श्रवणीं पडतां दोष सकळ ॥ विलया जाती क्षणार्धें ॥९॥
तंव कोणे एके दिवशीं ॥ ज्ञानदेव आले पंढरीसी ॥ इच्छा धरिली निजमानसीं ॥ नामदेवासी भेटावें ॥१०॥
मंदिरीं प्रवेशतांचि जाण ॥ दुरून देखिलें नामयान ॥ साष्टांग घातलें लोटांगण ॥ प्रेमेंकरून भेटले ॥११॥
यथोपचारें करून पूजा ॥ म्हणे भाग्योदय आजि जाहला माझा ॥ म्हणोन ज्ञानियांचा राजा ॥ आश्रमा आला निजकृपें ॥१२॥
कीं पूर्वपुण्य फळासी आलें ॥ साक्षात पांडुरंग भेटले ॥ संसारकर्मीं जे गुंतले ॥ मोहें मातले जड जीव ॥१३॥
त्यांचा करावया उद्धार ॥ स्वामींनीं घेतला अवतार ॥ ऐसें म्हणूनि नमस्कार ॥ पुनः साष्टांग घातला ॥१४॥
ज्ञानदेव म्हणे नामयास ॥ तुझें भाग्य असे विशेष ॥ अखंड सन्निध हृषीकेश ॥ पार भाग्यासी न देखों ॥१५॥
प्रेमसुखगोडी तुज फावली ॥ आशा तृष्ना हे मावळली ॥ तूं जन्मलासी ज्यांचें कुळीं ॥ वंशावळी पवित्र ते ॥१६॥
कांहींएक जीवींचें गुज ॥ ऐकसील तरी सांगेन तुज ॥ नामयासी हातीं धरून सहज ॥ अंतरमंदिरीं पैं नेलें ॥१७॥
म्हणे जीवन्मुक्त जाहलिया पावन ॥ न सांडिजे गुरु देव तीर्थभजन ॥ भूतळींचीं तीर्थें संपूर्ण ॥ तुझिया संगतीनें पहावीं ॥१८॥
ऐसा हेत धरून चित्तीं ॥ तुझे भेटीस आलों प्रीतीं ॥ माझे मनोरथ पूर्ण होती ॥ किंवा न होती मज सांग ॥१९॥
ऐसें वचन ऐकूनी ॥ नाम उद्विग्न जाहला मनीं ॥ म्हणे पंढरीक्षेत्र टाकूनी ॥ तीर्थाटनीं कां जावें ॥२०॥
सुधारस लवंडोनि दूरी ॥ कांजी मागावी घरोघरीं ॥ कीं अमूल्य टाकूनि कस्तूरी ॥ राख पदरीं कां घ्यावी ॥२१॥
कल्पतरुछाया टाकून ॥ कासया पाहावें शिंदीवन ॥ पात्रींचें सांडोनि पक्वान्न ॥ गळित पत्रें कां खावीं ॥२२॥
राजहंस दवडोनियां दूरी ॥ कासया काग आणावें धरीं ॥ हिरे रत्नें टाकूनि पदरीं ॥ वाळू कासया भरावी ॥२३॥
टाकूनियां सामगायन ॥ कासया ऐकावें डफगाण ॥ कामधेनूसी दवडून ॥ अजा कासया आणावी ॥२४॥
ऐसा निश्चय मनें करून ॥ मग ज्ञानदेवासी बोले वचन ॥ मी नाहीं आपुल्या स्वाधीन ॥ म्हणूनि चरण वंदिले ॥२५॥
पाळिलो पोशिलों जयाचा ॥ कासावया म्हणवितों त्याचा ॥ जो प्राणवल्लभ रुक्मिनीचा ॥ पुंडलीकाचा वरदानी ॥२६॥
मी सर्वभावें तया आधीन ॥ तुम्हीं पुसावें त्यासी जाऊन ॥ आज्ञा दिधल्या मजलागून ॥ मानीन वचन तयाचें ॥२७॥
ज्ञानदेव म्हणे नामयासी ॥ तुझा भाव कळला मजसी ॥ चतुर सर्वज्ञ उदार होसी ॥ भक्तिज्ञानाचा आगरू ॥२८॥
मग आलिंगन देऊनि सत्वर ॥ नामयाचा हातीं धरिला कर ॥ म्हणे राउळासी जाऊनि सत्वर ॥ आज्ञा मागूं उभयतां ॥२९॥
नामयासी घेऊनि ते अवसरीं ॥ ज्ञानदेव आले महाद्वारीं ॥ लोटांगण गरुडपारीं ॥ प्रेमभावें घातलें ॥३०॥
मग अंतरगाभारां येऊन ॥ विटेवरी देखिले नारायण ॥ देवासी देऊनि आलिंगन ॥ वंदिले चरण सद्भावें ॥३१॥
मनींचा भाव होता पोटीं ॥ तो देवासीं सांगे गुजगोष्टी ॥ वचन ऐकूनि जगजेठ ॥ हांसों लागले तेधवां ॥३२॥
ज्ञानदेवासी म्हणे घननीळ ॥ तूं चिद्रूप आहेस केवळ ॥ स्फटिकाऐसा होसी निर्मळ ॥ सर्वसंगांसीं अलिप्त ॥३३॥
तूं आत्मस्वरूप साक्षात जाण ॥ तुज कासया तीर्थाटन ॥ सूर्याचें अंगासी उटेन ॥ कासयासी लावावें ॥३४॥
चंद्रासी शीतल उपचार ॥ कासया करावें वारंवार ॥ क्षीरसागरासी पाहुणेर ॥ कवण्या अर्थें करावा ॥३५॥
हिमकरासी विंझणवारा ॥ कासया पाहिजे सुकुमारा ॥ चंदनासी कोणत्या उपचारा ॥ चर्चूनियां निववावें ॥३६॥
गजवदनासी विद्याभ्यास ॥ करणें न लगेचि सायास ॥ चौसष्टी कळा सरस्वतीस ॥ शिकवणें नलगे सर्वथा ॥३७॥
तेवीं ज्ञानदेवा तुजकारणें ॥ कासया पाहिजे तीर्थाटनें ॥ वायां विचार करूनियां मनें ॥ व्यर्थ कासया हिंडसी ॥३८॥
येरू म्हणे जी सत्य सत्य ॥ तुम्ही सांगतसां यथार्थ ॥ परी नामयाऐसा प्रेमळ भक्त ॥ धडावी संगत मज याची ॥३९॥
याचे संगतीचें घेऊनि सुख ॥ देहाचें करावें सार्थक ॥ ऐसें म्हणोनि चरणीं मस्तक ॥ ठेविला देख निजप्रीतीं ॥४०॥
मग हांसोनियां पंढरीनाथ ॥ नामयाकडे पाहूनि बोलत ॥ ज्ञानदेव परब्रह्म मूर्तिमंत ॥ तुझी संगत इच्छीतसे ॥४१॥
तरी यासवें जाऊनि त्वरित ॥ मागुती यावें शीघ्रवत ॥ जैसा चित्तीं असेल हेत ॥ तैसें सार्थक करावें ॥४२॥
तरी आसनीं शयनीं चालस्सी जेव्हां ॥ माझा विसर तुज न पडावा ॥ नामया जीवींचिया जीवा ॥ मजवरी लोभ असों दे ॥४३॥
ऐसें म्हणोनि जगजेठी ॥ सद्गदित जाहला निजकंठीं ॥ मग ज्ञानदेवाकडे दृष्टी करूनियां बोलत ॥४४॥
तूं सर्वज्ञ सुखमूर्ती ॥ एक मागणें आहे तुजप्रती ॥ ते आठवण असों द्यावी चित्तीं ॥ ऐसें श्रीपति बोलिले ॥४५॥
निजकृपेनें वाढला नामा ॥ यावरी माझा नित्य प्रेमा ॥ एक वेळ परती होय रमा ॥ परी याचा वियोग न करीं मी ॥४६॥
परी तुवां संकट घातलें जाण ॥ मज न मोडवे तुझें वचन ॥ नामयापरतें कांहींच जाण ॥ प्रिय मज असेना ॥४७॥
नामयाचा हात धरूनि श्रीपती ॥ घातला ज्ञानदेवाचे हातीं ॥ यासीं न विसंबें अहोरातीं ॥ सांभाळ प्रीतीं करावा ॥४८॥
माझे कंठींचें रत्न चोखडें ॥ मागसी तूं घालून सांकडें ॥ आरुष साबडें नामा वेडें ॥ तरी मागें पुढें सांभाळीं ॥४९॥
यावज्जन्मपर्यंत कांहीं ॥ नाम्यासी वेगळा केला नाहीं ॥ तुझिये भिडेस्तव पाहीं ॥ आज लवलाहीं पाठवितों ॥५०॥
ऐसें बोलतां रमाकांत ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ डोळ्यांमाजी अश्रुपात ॥ भरूनि आले तेधवां ॥५१॥
मग मस्तक ठेवूनि चरणांवरी ॥ ज्ञानदेव चालिले झडकरी ॥ नामयासी धरूनि करीं ॥ आले तीरीं चंद्रभागेच्या ॥५२॥
उभयतांहीं करून स्नाना ॥ पुंडलीकासी केली प्रदक्षिणा ॥ नमस्कारूनियां चरणा ॥ पैलतीरा उतरले ॥५३॥
नामयासी बोळवूनि सत्वर ॥ राउळा आले शारंगधर ॥ तों रुक्मिणी घेऊन कनकपात्र ॥ चरण धुवायासी पातली ॥५४॥
श्रीमुख पाहे न्याहाळून ॥ तों अश्रुपातें भरले नयन ॥ घर्में सर्वांग भिजलें जाण ॥ जगन्माता विस्मित ॥५५॥
मस्तक ठेवूनि चरणांवरी ॥ रुक्मिणी पुसे ते अवसरीं ॥ आजि अवस्था विपरीत भारी ॥ नवल अंतरीं मज वाटे ॥५६॥
ऐकूनि रुक्मिणीचें वचन ॥ काय बोलत जगज्जीवन ॥ नामयाचे वियोगबाणें जाण ॥ हृदय दुखंड जाहलें ॥५७॥
त्याची मजला बहु प्रीती ॥ म्हणून उद्वेग वाटला चित्तीं ॥ कवणें सुखें माझी मती ॥ स्थिर नव्हेचि सर्वथा ॥५८॥
इष्ट मित्र सोयरे सज्जन ॥ नामयासी नाहीं मजवांचून ॥ तो कैसा राखील आपुला प्राण ॥ ते चिंता दारुण मज वाटे ॥५९॥
मज कृपणाचे गांठींचें धन ॥ प्रेमळ नामा भक्तनिधान ॥ ज्ञानदेवा याचक येऊन ॥ दान घेऊन गेला हो ॥६०॥
नामा वृद्धापर्णाचें बाळ ॥ मज आवडे सर्व काळ ॥ ज्ञानदेवें ओढोनि तत्काळ ॥ बळेंचि नेलें तीर्थाटना ॥६१॥
मी जगदाकार वृक्ष जाण ॥ नामा माझें मूळींचें जीवन ॥ ज्ञानदेव जळद्वैत येऊन ॥ तेणें आकर्षोनि नेलें हो ॥६२॥
मज सुकतिया वृक्षाकारण ॥ नामा ओळला आनंदघन ॥ ज्ञानदेव येऊन प्रभंजन ॥ दूर घेऊन गेला हो ॥६३॥
ऐकूनि रुक्मिणी बोले वचन ॥ ज्याचें मुखीं तुकचें नामोच्चारण ॥ शोक दुःख मोह जाण ॥ त्याकारणें न बाधिती ॥६४॥
ऐकूनि म्हणे जगज्जीवन ॥ तूं सत्यचि बोललीस वचन ॥ परी भक्तांवांचून एक क्षण ॥ मजकारणें कंठेना ॥६५॥
मी अव्यक्त निराकार जाण ॥ भक्तांलागीं जाहलों सगुण ॥ माझे भक्तांस वैकुठस्थान ॥ बैसावया निर्मिलें ॥६६॥
माझिया भाग्याचे वांटेकरी ॥ निजभक्तचि जाण अधिकारी ॥ त्यांचिया जीवींचें झडकरी ॥ मीच एक जाणतों ॥६७॥
माझे जीवेंचिया खुणा ॥ भक्तांवांचूनि न कळती जाणा ॥ ऐसें रुक्मिणीसी वैकुंठराणा ॥ सद्गद होऊनी सांगतसे ॥६८॥
अहंता टाकूनि सर्वस्वें ॥ मजसीं मीनले समरसें ॥ जेवीं दीपक आणि प्रकाश ॥ अभिन्नपणें असती कीं ॥६९॥
कीं किरण आणि गभस्ती ॥ एकत्रपणें सदा असती । कीं कनक आणि कांती ॥ एकत्र असती सर्वदा ॥७०॥
ऐसे विज्ञानी जे भक्तराज ॥ नामा तयांचा असे चरणरज ॥ त्याचा वियोग जाहला आज ॥ म्हणूनि मज दुःख वाटे ॥७१॥
ऐसें म्हणूनि तये क्षणीं ॥ देव मूर्च्छित पडिले धरणीं ॥ विव्हल जाहली विश्वजननी ॥ माता रुक्मिणी तेधवां ॥७२॥
सवेंचि धीर धरूनि मना ॥ सावध करी देवासी जाणा ॥ मग पाचारूनि भक्तजनां ॥ त्यांकारणें सांगतसे ॥७३॥
एकाएकीं उमसा येऊनी ॥ मूर्च्चित पडिले चक्रपाणी ॥ तुम्ही कांहीं उपचार करूनी ॥ पुसा येऊनी सन्निध ॥७४॥
मग पल्लवें घालोनि वारा ॥ भक्त पुसती त्या अवसरा ॥ आजि कां व्याकुळ कृपासागरा॥ जगदुद्धारा झालेती ॥७५॥
ऐकूनि निजभक्तांचें वचन ॥ धैर्यबळें सांवरूनि प्राण ॥ सावध होऊनि जगज्जीवन ॥ सद्गद होऊन बोलत ॥७६॥
म्हणे नामयावांचूनि मज कांहीं ॥ आन पदार्थ नावडे पाहीं ॥ आलिंगन देऊनि हृदयीं ॥ धरावा ऐसें वाटतें ॥७७॥
मी अखंड करितों भक्तकाज ॥ हेंही म्हणतां वाटे लाज ॥ नामयानें कधीं संकट मज ॥ घातलें नाहीं सर्वथा ॥७८॥
धर्मार्थकाममोक्ष जाण ॥ नाहीं दिधले त्यालागून ॥ जन्मोनियां सेवाऋण ॥ गेला बांधून मजलागीं ॥७९॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे वैरी मारूनि दुर्धर ॥ आपुलेनि पुरुषार्थें संसार ॥ जिंकिला जाण तयानें ॥८०॥
लोभ दंभ धरूनि दूरी ॥ माया मोह सांडिले वैरी ॥ नाना दैवतांची थोरी ॥ जयाच्या चित्तीं नावडे ॥८१॥
आणिकां देवांसी नमन ॥ नामा न करी मजवांचून ॥ त्याच्या जीवासी विश्रांति एक क्षण ॥ आन न दिसेचि सर्वथा ॥८२॥
मार्गीं चालतां त्याजकारण ॥ आला असेल भागशीण ॥ कोण पुसेल भूक तहान ॥ चिंता दारुण मज वाटे ॥८३॥
ऐसें बोलतां शारंगधर ॥ भक्त गर्जती जयजयकार ॥ सप्रेमें लोटले चरणावर ॥ आनंदें निर्भर होऊनि ॥८४॥
तेथूनि आले गरुडपारीं ॥ आनंदें नाचती ते अवसरीं ॥ पुनः लोटांगण घालूनि सत्वरीं ॥ नमन करिती साष्टांगें ॥८५॥
ऐसें देखोनि जगज्जीवन ॥ किंचित झाले सावधान ॥ तों इकडे नामा क्षणक्षण ॥ मागें परतोन पाहातसे ॥८६॥
म्हणे देवा मोकलिलें मातें ॥ न येसी बोळवीत सांगातें ॥ ऐसें म्हणूनि तयातें ॥ मूर्च्छना आली ते वेळे ॥८७॥
मातेचा वियोग होतां जाण ॥ बाळ आक्रोशें करी रुदन ॥ कीं हरिणीसी पाडसे चुकोन ॥ दाही दिशा धुंडीतसे ॥८८॥
कीं क्षुधातुर तळमळे अन्नेंविण ॥ कीं तृषाक्रांत धुंडी जीवन ॥ कीं चातकासी लागे तहान ॥ पाहे वाट मेघाची ॥८९॥
नातरी अमावास्येचे राती ॥ चकोर धुंडी निशापती ॥ कीं जळावांचूनि तळमळती ॥ मीन जैसे उष्णकाळीं ॥९०॥
कांसवीचे बाळांसी लागतां भूक ॥ माता दृष्टीसी न पडे सन्मुख ॥ तेवीं पांडुरंगवियोगें नामा देख ॥ जाहला विव्हल ते समयी ॥९१॥
म्हणे चिंताक्रांत पडिलों वनीं ॥ न दिसे माझें जिवलग कोणी ॥ तूंचि माझी जनकजननी ॥ चक्रपाणी धांव आतां ॥९२॥
इष्ट मित्र बंधु चुलता ॥ तूंचि होसी पंढरीनाथा ॥ तूंचि माझी कुळदेवता ॥ अनाथानाथा श्रीविठ्ठला ॥९३॥
तूंचि माझें मोक्षसाधन ॥ अंतरसाक्ष तूं चैतन्यघन ॥ साच कीं लटिकें वचन ॥ तूंचि जाणसी श्रीविठ्ठला ॥९४॥
कृपासागरा जगजेठी ॥ नामा तुजविण होतसे कष्टी ॥ त्यावर करूनि कृपादृष्टी ॥ हृदयसंपुटीं असावें ॥९५॥
ऐसा नामा विव्हल होऊन ॥ करुणाशब्दें बोलतां वचन ॥ मग ज्ञानदेवें संबोधून ॥ बोलते जाहले तें ऐका ॥९६॥
प्रेमजिव्हाळा तुझे पोटीं ॥ असतां कां होसी हिंपुटी ॥ तुझ्या हृदयीं असोन जगजेठी ॥ वांयांचि कष्टी न व्हावें ॥९७॥
विचारून पाहें भक्तराजा ॥ तुझ्याच हृदयीं आनंद तुझा ॥ सगुण साक्षात देव ओजा ॥ तूंचि होसी निर्धारें ॥९८॥
मृगनाभींत सुगंध असोन ॥ वायां धुंडीत फिरे वन ॥ तेवीं तूं आत्मस्वरूप नेणोन ॥ वियोगदुःखें शिणतोसी ॥९९॥
कीं निर्दैवाच्या मंदिरांत ॥ द्रव्य पुरिलें असे अगणित ॥ तें न देखतां उपवास करित ॥ तैसेंचि तुज जाहलें कीं ॥१००॥
ऐकूनि नामा बोले वचन ॥ विटेवरी जोडिले सम चरण ॥ तें परब्रह्म साक्षात सगुण ॥ मजकारणें दाखवा ॥१॥
कांसे वेष्टिला पीतांबर ॥ जघनीं ठेविले दोनी कर ॥ तो भक्तकैवारी जगदुद्धार ॥ मजकारणें दाखवा ॥२॥
जें सनकादिकांचें निजध्यान ॥ नीलग्रीवाचें प्रियभूषण ॥ तो रुक्मिणीकांत जगज्जीवन ॥ मजकारणें दाखवा ॥३॥
नारद तुंबरु ज्यालागूनी ॥ सप्रेम गाती दिवसयामिनी ॥ तो पुंडलिकाचा वरदानी ॥ मज आतांचि दाखवा ॥४॥
मी नेणें योगयुक्तिसाधन ॥ माझी विश्रांति जगज्जीवन ॥ तो न भेटतां माझे प्राण ॥ जाऊं पाहती ज्ञानदेवा ॥५॥
येरू म्हणे रे प्रेमळभक्ता ॥ त्याविण ठावचि न दिसे रिता ॥ भेदभाव सांडूनी आतां ॥ हृदयीं अद्वैता ओळखावें ॥६॥
ऐकूनि नामा बोले उत्तर ॥ चातक न घेती नदीचें नीर ॥ आकाशांतूनि वर्षे धार ॥ तेंच सेविती निजप्रीतीं ॥७॥
तेवीं विश्वीं भरला चक्रपाणी ॥ हे लटकीच वाटे मज काहाणी ॥ जेवीं पतिव्रता न ऐकती कानीं ॥ पतीवांचुनी येर कथा ॥८॥
यावरी ज्ञानदेव बोलत ॥ जो का अक्षर अद्वैत ॥ ज्ञानी ज्यासी उपासित ॥ तोचि हृदयस्थ तुझ्या कीं ॥९॥
यावरी नामा बोले वचन ॥ मज आगडे रूप सगुण ॥ दृष्टीं पाहतां निवती लोचन ॥ श्रवणीं कीर्तन ऐकावें ॥११०॥
निर्धार देखोनि ज्ञानदेवो ॥ म्हणे धन्य धन्य तुझा शुद्धभावो ॥ ऐसा नित्यानित्य पहा हो ॥ सांगती अनुभव एकमेकां ॥११॥
प्रेमसुखाचिया गोष्टी ॥ लाविती अनुभवकसवटी ॥ अनिवार होय सुखवृष्टी ॥ आनंद पोटीं न समाये ॥१२॥
ज्ञानदेव म्हणे नामयासी ॥ तुवां स्वाधीन केला हृषीकेशी ॥ तो भक्तिमार्ग मजपासीं ॥ विस्तारेंसीं सांगावा ॥१३॥
कवणें रीतीं करावें भजन ॥ कैसें करावें श्रवण मनन ॥ कैसें आहे निदिध्यासन ॥ धृतिधारण कोणतें तें ॥१४॥
कासया म्हणावी विश्रांती ॥ हें सविस्तर सांगावें मजप्रती ॥ बहुत दिवस उत्कंठा पोटीं ॥ जे तुजसीं गोष्टी पुसावी ॥१५॥
तुज जो लाधला अनुभव ॥ तो सांगावा साधनउपाव ॥ नामयाप्रती ज्ञानदेव ॥ कर जोडूनि विनवीत ॥१६॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ नामयानें धरिले दृढ चरण ॥ कंठ सद्गदित होऊन ॥ काय वचन बोलत ॥१७॥
मी नेणेंचि बहु व्युत्पत्ती ॥ म्हणोनि निरविलें तुम्हांप्रती ॥ माझा कर रुक्मिणीपती ॥ तुमचे हातीं देतसे ॥१८॥
मी नेणता बहु अज्ञान ॥ आणि तुम्ही पुसतां अध्यात्मज्ञान ॥ कल्पतरु याचक होऊन ॥ कृपणमंदिरा पातला ॥१९॥
हिमालयासी झाला उबारा ॥ म्हणे मज पालवीं घाला वारा ॥ कीं भास्कर म्हणे माझिया घरा ॥ दीप लावूनि मागतसे ॥२१॥
कीं इच्छित अपांपतीचें मन ॥ थिल्लरीं जाऊनि करावें स्नान ॥ कीं कामधेनु पयःपान ॥ बरडगायीस मागतसे ॥२२॥
तेवीं तुम्ही घेऊनि लहानपण ॥ मजला पुसतां अध्यात्मज्ञान ॥ ऐसें बोलूनि नामयानें ॥ धरिले चरण ते वेळे ॥२३॥
ज्ञानदेव बोलिले वचनोक्ती ॥ कांहीं शंका न धरीं चित्तीं ॥ सांडोनि द्वैतभावरीती ॥ अनुभवमती वदावी ॥२४॥
नामा तुझे सरळ बोल ॥ सिंधूहूनि भासती खोल ॥ स्वानंदजळाची सांचली ओल ॥ सुशीतळ नित्य नवी ॥२५॥
ते आतांचि ऐकावी सत्वर ॥ श्रवण जाहले क्षुधातुर ॥ तरी ज्ञानामृत साचार ॥ वर्षोंदे सत्वर यावरी ॥२६॥
तूं विश्रांतीचें विसावतें अंग ॥ म्हणूनि केला तुझा संग ॥ नामया तूं भक्त अंतरंग ॥ केला श्रीरंग आधीन ॥२७॥
एक प्रेमरसावांचून ॥ कासया पाहिजे उदंड ज्ञान ॥ जैसीं नक्षत्रपदींचीं थोरसान ॥ अहोरात्र हिंडती ॥२८॥
ध्रुव नक्षत्र दिसे लहान ॥ परी अढळ अक्षयी बैसलें जाण ॥ तेवीं नामया तुझें अल्प ज्ञान ॥ म्हणूं न येचि सर्वथा ॥२९॥
कृशानु थोर वाढला जरी ॥ तरी निर्मळ प्रकाश नव्हेचि मंदिरीं ॥ दीपक तेजाचिये बरोबरी ॥ तो कैसा करी सांग पां ॥१३०॥
शार्दूळाचें अंग दिसतें सान ॥ परी तयाचे दृष्टीसी न टिकती वारण ॥ तेवीं नामया तुझें ज्ञान ॥ शौर्यतेजें वरिष्ठ कीं ॥३१॥
औषधी बहुत आणिल्या भारी ॥ तयांसी अमृताची न ये सरी ॥ तेवीं तुझिया ज्ञानाची बरोबरी ॥ शास्त्राधिकारी न करिती ॥३२॥
पल्हाटीचें पुष्प सुवासहीन ॥ परी राया रंका तेंचि भूषण ॥ तेवीं नामया तुझें ज्ञान विश्वोद्धारक दिसताहे ॥३३॥
तें ऐकावया प्रेमभरित ॥ उत्कंठित जाहलें माझे चित्त ॥ आतां मौन सोडूनि त्वरित ॥ माझें आर्त पुरवावें ॥३४॥
ऐसें बोलतां ज्ञानेश्वर ॥ नामदेव देत प्रत्युत्तर ॥ म्हणे माझा अनुभव साचार ॥ परिसा सादर स्वामिया ॥३५॥
अंगीं असावें वैराग्यबळ ॥ सर्वां भूतीं दया अढळ ॥ मीतूंपणाची खळखळ ॥ प्रपंचतळमळ नसावी ॥३६॥
ऐसी स्थिति होतांचि जाण ॥ तयासी म्हणावें शुद्ध भजन ॥ अंगींजरी हें नसेल चिन्ह ॥ तरी व्यर्थ साधन कासया ॥३७॥
बाह्यात्कारें केलें नमन ॥ अंतरीं आठविले दोष गुण ॥ जेवीं मक्षिकासमवेत पक्वान्न ॥ अति आदरें जेविला ॥३८॥
उत्तम मध्यम नाठवे जाण ॥ तेंचि जाणावें अखंड नमन ॥ अंतरीं स्वानंदाचें जीवन ॥ नाहीं खंडन तयासी ॥३९॥
विश्वीं विश्वंभर व्यापला जाण ॥ निश्चल बोधें स्थिरावें मन ॥ याचि नांवें म्हणिजे ध्यान ॥ आनंदघन अक्षयी ॥१४०॥
आतां कैसें करावें श्रवण ॥ स्वामींनीं पुसिलें मजकारण ॥ जेवीं नादलुब्ध होऊनि हरिण ॥ जाय विसरून देहभान ॥४१॥
तया रीतीं तल्लीन मन ॥ करूनि ऐकावें हरिकीर्तन ॥ श्रवणभक्ति याजकारण ॥ म्हणती सज्ञान अनुभवी ॥४२॥
व्यवहारीं ठेवूनियां चित्त ॥ कृपण जैसा द्रव्य सांचित ॥ त्याच रीतीं विचारी स्वहित ॥ मनन निश्चित या नांव ॥४३॥
आतां निदिध्यास तो कैशा रीतीं ॥ जेवीं परपुरुषीं लावून प्रीती ॥ जारिणी मंदिरीं राहाटती ॥ लौकिकस्थितीसारिख्या ॥४४॥
चातक वसे भूमंडळीं ॥ परी त्याचें लक्ष मेघमंडळीं ॥ कमळिणी राहिल्या सरोवरीं ॥ परी भास्करावरी मन त्यांचें ॥४५॥
कीं धेनु चरत असतां डोंगरीं ॥ परी चित्त ठेविलें वत्सावरी ॥ कीं मन ठेवूनि द्रव्यावरी ॥ कृपण बाजारी हिंडतसे ॥४६॥
नातरी चित्त ठेवूनि चोरीवर ॥ सोनार घडिती अलंकार ॥ कीं दूरी असोन चकोर ॥ रोहिणीवर लक्षिती ॥४७॥
कीं कुंभ घेऊनि शिरावरी ॥ मोकळ्या हातें चालती नारी ॥ लक्ष ठेवूनि दुडियेवरी ॥ लोकाचारीं बोलत ॥४८॥
कीं चित्त ठेवूनि पुष्पांवर ॥ मिलिंद्फ़ आकाशीं देत गुंजार ॥ तेवीं बाह्यात्कारें करूनि संसार ॥ अंतरीं श्रीधर आसावा ॥४९॥
सर्वभावें विठ्ठल चित्तीं ॥ रूप पाहावें सर्वा भूतीं ॥ रज तम टाकून निश्चितीं ॥ सप्रेम चित्तीं असावें ॥१५०॥
असंग होऊनि एकट ॥ सत्वशील ज्ञानी सुभट ॥ सप्रेम भक्ती एकनिष्ठ ॥ तेचि श्रेष्ठ म्हणावे ॥५१॥
एकांतीं बैसोनि नित्य नेमानें ॥ करावें श्रीहरीचें कीर्तन ॥ याविरहित केलीं जीं साधनें ॥ तीं बंधनें जाणावीं ॥५२॥
काया वाचा मनोभाव ॥ म्यां सांगीतला आपला अनुभव ॥ हेंही वदविता पंढरीराव ॥ रुक्मिणीनाहो श्रीविठ्ठल ॥५३॥
ऐसी ऐकूनि वचनोक्ती ॥ ज्ञानदेव जाहला विस्मित चित्तीं ॥ म्हणे विष्णुभक्त उदंड असती ॥ पुढेंही होती अपार ॥५४॥
परी नामयाचे बोल अघटित ॥ हे वाउगे न म्हणावे किंचित ॥ आजि अमृतवर्षाव निश्चित ॥ जाहला त्वरित आम्हांवरी ॥५५॥
हे अपार सुखविश्रांती ॥ कोणासी न घडेचि कल्पांतीं ॥ मनांत विचारून संतीं ॥ उपपत्ती चित्तीं असों द्या ॥५६॥
होती शास्त्रवक्ते व्युत्पन्न बहुत ॥ होती बुद्धिमंत बहुश्रुत ॥ होती कर्मनिष्ठ विद्यावंत ॥ होती सर्वश्रेष्ठ पूज्य लोकीं ॥५७॥
जाणता कवित्व कुशळ कळा ॥ चपळ वाचाळ जरी जाहला ॥ पाठक साधक जरी असला ॥ परी नामयाऐसा न देखों ॥५८॥
आत्मज्ञानीही योगयुक्त ॥ कोणी असेल जीवन्मुक्त ॥ ध्यानीं बैसती निष्ठावंत ॥ परी नामयाऐसा न देखों ॥५९॥
योगी बैसले वज्रासनीं ॥ विरक्तपणेंही वर्तोत जनीं ॥ परी नामयाऐसा पाहतां नयनीं ॥ त्रिभुवनींही दिसेना ॥१६०॥
नामयाच्या भक्तीच्या खुणा ॥ कदा न कळती इतरा जनां ॥ विटेवरी ठाकला पंढरीराणा ॥ त्या रुक्मिणीरमणावांचूनियां ॥६१॥
यापरी संवाद नित्यानित्य ॥ मार्गीं करिती स्वानंदभरित ॥ तों हस्तनापुरा अकस्मात ॥ तीर्थें करीत पातले ॥६२॥
नामदेव प्रेमेंकरून ॥ गात असे श्रीहरीचे गुण ॥ नगरासमीप येतां जाण ॥ पाहती जन सकळिक ॥६३॥
अद्भुत प्रेमा ऐकूनि कानीं ॥ नामयासीं येतीं लोटांगणीं ॥ टाळ विणे मृदंग घेऊनी ॥ संकीर्तनीं नाचती ॥६४॥
नामयाचें कीर्तन ऐकून ॥ अमित मिळाले विश्वजन ॥ दिंड्या पताका घेऊन ॥ समारंभ मांडिला ॥६५॥
गरुडटके निशाण भेरी ॥ वाद्यें वाजती अति गजरीं ॥ आनंद मांडला हस्तनापुरीं ॥ जयजयकारीं नामघोषें ॥६६॥
तों अविंधराजा नगरांत ॥ तेणें ऐकिला वृत्तांत ॥ पंढरीहूनि नामा भक्त ॥ तीर्थें करीत पातला ॥६७॥
तो नगरामाजी कीर्तन करी ॥ तेणें वेधिल्या नरनारी ॥ मात ऐकूनि ते अवसरीं ॥ राजा अंतरीं क्रोधावला ॥६८॥
जैसा उदयासी येतां रोहिणीवर ॥ मनीं जल्पती उगेचि राजयाचें अंतःकरणीं ॥ द्वेष बहुत उपजला ॥१७०॥
मग म्हणे नामयाची हरिकथा ॥ सत्वर जाऊनि पाहावी आतां ॥ प्रचीत न ये तरी तत्त्वतां ॥ पाखंड मता म्हणावें ॥७१॥
ऐसें म्हणोनि दुराचारी ॥ कीर्तनामाजी आला सत्वरी ॥ जैसा ब्रह्मसभेमाझारी ॥ मातंग झडकरी पातला ॥७२॥
नातरी स्पर्शावया ब्राह्मणाचें अन्न ॥ पाकशाळेंत पातलें श्वान ॥ कीं तारुण्यदशेंत दारुण ॥ महारोग उद्भवला ॥७३॥
तैसाचि दुर्बुद्धि अकस्मात ॥ येऊनि ठाकला कीर्तनांत ॥ तंव नामा श्रीहरीचे गुण वर्णीत ॥ प्रेमभरित तेधवां ॥७४॥
टाळ मृदंग विणे सुस्वर ॥ नादें दुमदुमलें अंबर ॥ त्यांतही टाळियांचा गजर ॥ रंग अपार ओढावला ॥७५॥
तंव तेथें अविंधें केलें काय ॥ कीर्तनरंगीं वधिली गाय ॥ नामदेवासी बोलिला काय ॥ गातोसी काय कुफराणा ॥७६॥
धेनु उठविशील येथ ॥ तरी तुझें गायन मानूं सत्य ॥ नाहीं तरी तुजही येथ ॥ आपुले हातें वधीन ॥७७॥
ऐसें बोलतां दुराचारी ॥ चिंताक्रांत नरनारी ॥ विक्षेप पावले निजअंतरीं ॥ प्रेमरंग वितळला ॥७८॥
जैसें पक्वान्न पात्रीं वाढिलें ॥ त्यांत अकस्मात विष पडिलें ॥ कीं पुस्तक वाचितां विझविलें ॥ दीपकासी जैसें पतंगें ॥७९॥
कीं दरिद्रियासी सांपडलें निधान ॥ त्यांत विवसी झाली निर्माण ॥ कीं सुस्वर गातां आलाप जाण ॥ तों कंठांत कफ दाटला ॥१८०॥
कीं लक्षगुणित क्षेत्र पिकलें ॥ त्यावरी घाला घातला टोळें ॥ कीं गृहीं मंगलकृत्य मांडलें ॥ तों क्षय तत्काळ पातला ॥८१॥
चकोर लक्षितां रोहिणीवर ॥ तों आडवा राहु आला सत्वर ॥ कीं अगस्तीनें प्राशितां सागर ॥ सकळ जलचरें तळमळती ॥८२॥
ऐशा रीतीं विशेष पाहीं ॥ श्रोतयांसी वाटला ते समयीं ॥ उगेचि निवांत बैसले ठायीं ॥ न चले कांहीं त्यापुढें ॥८३॥
अविंध म्हणे नामयासी ॥ कधीं ही गाय तूं उठविस्सी ॥ कांहीं प्रमाण करूनि मजसी ॥ मग आपुल्या हरीसी आळवीं ॥८४॥
ऐसें ऐकूनि वैष्णववीर ॥ तयासी देत प्रत्युत्तर ॥ आजपासूनि दिवस चार ॥ लागती साचार नृपनाथा ॥८५॥
ऐसें ऐकूनि ते अवसरीं ॥ राजा गेला आपुल्या घरीं ॥ नामदेवें अंतरीं आठवूनि श्रीहरी ॥ धांवा करी अट्टाहासें ॥८६॥
जय दीनदयाळा पतितपावना ॥ भक्तवत्सला करुणाघना ॥ अंतरसाक्षिया गुणनिधाना ॥ भक्तभूषणा गोविंदा ॥८७॥
जय विधिजनका पयोब्धिवासा ॥ सगुणस्वरूपा हृषीकेशा ॥ पुंडलीकवरदा पंढरीशा ॥ जय अविनाशा जगद्गुरो ॥८८॥
जय राघवेशा रावणांतका ॥ नंदनंदना कौरवअभिमाननिर्दाळका ॥ पांडवरक्षका श्रीकृष्णा ॥८९॥
जय गुणसमुद्रा आनंदघना ॥ द्रौपदीलज्जानिवारणा ॥ रुक्मिणीकांता कमललोचना ॥ भक्तभूषणा पांडुरंगा ॥१९०॥
ऐसा नामा प्रेमभरित ॥ कीर्तनामाजी शोक करित ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ पडती अश्रुपात नेत्रांतुनी ॥९१॥
श्रवणासी आले विश्वजन ॥ तेही तैसेंच करिती रुदन ॥ एक दिवसपर्यंत जान ॥ बैसले होते ते ठायीं ॥९२॥
दिनकर येतां उदयासी ॥ उठोनि गेले निजगृहासी ॥ जैसे दुर्भिक्षकाळीं याचकांसी ॥ दांभिक दाते मोकलिती ॥९३॥
नातरी इंद्रियें होतांचि विकळ ॥ विषय टाकिती विलासी नर ॥ कीं तोटा देखोनि विजारदार ॥ देश परगणा टाकिती ॥९४॥
कीं सीतकाळ येतांचि जाण ॥ मेघ पळती गगनांतून ॥ कीं लागतां सूर्यकिरण ॥ पतंगीं रंग उडतसे ॥९५॥
कीं राजा रणांत पडतां जाणा ॥ टाकूनि पळे जेवीं सेना ॥ कीं आयुष्य सरतां प्राणां ॥ कुडी सांडूनि जाणें लागे ॥९६॥
कीं दरिद्र येतां गृहस्थांप्रती ॥ पिशुन सोयरे मोकलिती ॥ कीं वृद्धपण येतांचि निश्चितीं ॥ इंद्रियें मोकलिती नरातें ॥९७॥
तेवीं नामदेवाचें कीर्तन ॥ श्रवण करीत होते जन ॥ अरिष्ट देखोनि अति दारुण ॥ गेले उठोनि सकळिक ॥९८॥
गौतमीमस्तक मांडीवरी ॥ घेऊनि नामा रुदन करी ॥ म्हणे पंढरीनाथा श्रीहरी ॥ पाव सत्वरी मज आतां ॥९९॥
कीं रुक्मिणीजवळी जाहलासी निद्रित ॥ म्हणत उशीर लागला बहुत ॥ कीं प्रेमळ भक्तांच्या कीर्तनांत ॥ श्रवण करीत बैसलासी ॥२००॥
कीं योगियांचे ध्यानीं ॥ गुंतलासी चक्रपाणी ॥ कीं आणिक संकट घातलें कोणीं ॥ तेथें गुंतोनि राहिलासी ॥१॥
कीं सगुणउपासकपूजा ॥ घेत बैसलासी अधोक्षजा ॥ कीं अमृतपानासी इंद्रराजा ॥ घेऊनि गेला तुजलागीं ॥२॥
कीं यात्रा मिलाली पंढरीसी ॥ निजभक्त आले दर्शनासी ॥ म्हणूनियां हृषीकेशी ॥ उशीर फार लाविला ॥३॥
नाना अलंकार वस्त्रभूषणेंकरून ॥ पूजा करिती श्रीमंत जन ॥ तेथेंचि होऊन तल्लीन ॥ माझा विसर पडला कीं ॥४॥
ऐसा चार दिवसपर्यंत ॥ अहोरात्र धांव करीत ॥ धरणी शिंपिली समस्त ॥ अश्रुपातेंकरूनी ॥५॥
म्हणे देवा धांव सत्वर ॥ नाम्यासी ग्रासूं पातला काळ ॥ जैसें मीनासी नसतां जळ ॥ होऊनि व्याकुळ तळमळी ॥६॥
ऐसे करुणाशब्द ऐकूनि कानीं ॥ तत्काळ पावला चक्रपाणी ॥ नामयाचें हृदयभुवनीं ॥ प्रगट जाहले तेधवां ॥७॥
तत्काळ उठविली गाय ॥ नामदेवासी म्हणे सावध होय ॥ तेणें धरून दृढ पाय ॥ बोलिला काय तें ऐका ॥८॥
म्हणे बा कवणिया काजा ॥ गुंतलासी अधोक्षजा ॥ चार दिवस गरुडध्वजा ॥ अंत माझा पाहिला कीं ॥९॥
देव म्हणे रे नामया ॥ तुवांचि प्रतिज्ञा केली वायां ॥ चार दिवस लागती म्हणूनियां ॥ व्यर्थ कासया बोलिलासी ॥२१०॥
येच समयीं सत्वर ॥ उठवीन ऐसें वदतास जर ॥ तेव्हांच धांवून साचार ॥ आलों असतों तुजपासीं ॥११॥
तुझाचि संकल्प फळला तुज ॥ व्यर्थ कां शब्द ठेविसी मज ॥ तुम्हांआधीन मी अधोक्षज ॥ वर्तें सहज निजप्रीतीं ॥१२॥
भक्तमुखींचें निजवचन ॥ तों यथार्थ लागे मजकारण ॥ वाल्मीकें भविष्य कथिलें जाण ॥ तैसेंचि वर्तणें मज लागे ॥१३॥
आरशांत पाहाती पाहणार ॥ तों तैसेंचि दिसे त्यां समोर ॥ तेवीं मज जैसें भाविती नर ॥ मी जगदुद्धार तैसा तयां ॥१४॥
कीं काश्मीराचें जैसें लिंग ॥ त्यावरी ठेविजे तैसाचि रंग ॥ तेवीं भक्ताधीन मी श्रीरंग ॥ आवडीसारिखा होतसें ॥१५॥
ऐसें बोलोनि तये क्षणीं ॥ अदृश्य जाहला चक्रपाणी ॥ नामा पाहे नेत्र उघडोनी ॥ तों गाय उठोनि बैसली ॥१६॥
ऐसें कौतुक देखोनि त्वरित ॥ रायासी लोक सांगती मात ॥ नवल ऐकूनि अति अद्भुत ॥ अविंध तेथें पातला ॥१७॥
कापूनि टाकिलें गाईचें शिर ॥ ती उठविली देखोनि नृपवर ॥ नामदेवासी नमस्कार ॥ घाली साचार ते समयीं ॥१८॥
आनंद वाटला सकळ जनां ॥ म्हणती धन्य नामा वैष्णव जाणा ॥ ब्रह्मादिक देवगणां ॥ जयाचा प्रेमा न वर्णवे ॥१९॥
जयजयकारें पिटिली टाळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ नाना उठोनि ते वेळीं ॥ भावें वनमाळीं ओंवाळिला ॥२२०॥
आरती होतांचि सत्वर ॥ सकळ करिती जयजयकार ॥ म्हणती धन्य हा वैष्णववीर ॥ शारंगधर वश केला ॥२१॥
पुढें श्रोतीं देऊनि चित्त ॥ कथासंगमीं व्हावें रत ॥ जैसी गंगा सागरांत ॥ समरस होत निजप्रीतीं ॥२२॥
किंवा मानससरोवरीं येऊनी ॥ राजहंस निवडिती दुग्धपाणी ॥ तेवीं विकल्पनीर टाकूनि ॥ प्रेमामृत पय सेविजे ॥२३॥
तुम्हीं अवधान दिधलें सांग ॥ तरी कथेसी येईल अद्भुत रंग ॥ मग प्रसन्न होऊनि पांडुरंग ॥ करील भवसंग दासांचा ॥२४॥
जो दीनदयाळ रुक्मिणीकांत ॥ पुढें वदवील ग्रंथार्थ ॥ महीपति त्याचा मुद्रांकित ॥ निरोप सांगे श्रोतयां ॥२५॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ दशमाध्याय रसाळ हा ॥२२६॥    ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीभक्तविजय दशमाध्याय समाप्त ॥