रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय ६

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
आजचि दिवाळी दसरा पातला सण ॥ सर्वेंद्रियां सौख्यकारण ॥ त्यांतही श्रोतयांचे श्रवण ॥ सभाग्य पूर्ण भासती ॥१॥
सर्वांसी समान निशापती ॥ परी चकोरें आधीं तृप्त होती ॥ तेवीं भक्तकथा वाचितां युक्तीं ॥ श्रवणीं दिसती सभाग्य ॥२॥
कीं वर्‍हाडी मिळाले अपार ॥ त्यांत वरमायेचा मान थोर ॥ कीं आकाशीं उगवतां दिनकर ॥ कमळिणी आधींच विकासती ॥३॥
नातरी अंबरीं मेघ ओळतां देख ॥ आधीं तृप्त होती चातक ॥ कीं पुष्पांचा मकरंद सुरेख ॥ भ्रमर आधींच सेविती ॥४॥
नातरी करितां पुण्याहवाचन ॥ आधीं गणपतीचें होय पूजन ॥ कीं शंकरें वांटितां चौदा रत्न ॥ आधीं दिधला मान विष्णूसी ॥५॥
तेवीं भक्तकथारसउत्पत्ती ॥ वाढितां सभाग्यांचे पंक्ती ॥ श्रवण आधींच तृप्त होती ॥ ऐसें मजप्रती वाटतें ॥६॥
श्रवण झालिया होय मनन ॥ मननापाठीं निदिध्यासन ॥ मग साक्षात्कारासी येऊन ॥ होय विज्ञान साधक ॥७॥
एवं ज्ञानेंद्रियांत वरिष्ठ श्रवण ॥ त्यासी करावें कर्णभूषण ॥ तरी भक्तकथा अमूल्य रत्न ॥ करूं कोंदण हेमतगटीं ॥८॥
सगुण साकार कुंडलें वळोनी ॥ लेववूं श्रोतयांचे कर्णीं ॥ जीं सिद्धांतज्ञानें अमूल्युपणीं ॥ ज्ञानप्रकाशें तळपती ॥९॥
मग संतुष्ट होऊनि रुक्मिणीरमण ॥ अक्षय देईल वरदान ॥ जे वर्णीन निजभक्तांचे गुण ॥ कामना मनीं हीच धरिली ॥१०॥
आतां ऐका भाविक प्रेमळ ॥ कथा पुढें ती बहु रसाळ ॥ कबीरासी भेटोनि घननीळ ॥ आले तत्काळ मंदिरा ॥११॥
मागें गांजिलें मातेन ॥ तेव्हां तीस होतें अज्ञान ॥ झालिया श्रीरामदर्शन ॥ समाधान झालें कीं ॥१२॥
करीत होती सासुरवास ॥ ती कांहींच न बोले तयास ॥ कृपा करितां जनन्निवास ॥ अरिष्टें निरसती सर्वही ॥१३॥
रायाची कृपा होतां जाण ॥ तयास मानिती प्रधानजन ॥ कीं सासूस आवडती असली सून ॥ जन हेळणा न करिती तिची ॥१४॥
श्रीगुरुकृपा होतांचि जाण ॥ तयासी न बाधे जन्ममरण ॥ कीं सरस्वती झालिया प्रसन्न ॥ पाखंडी वाद न घालिती ॥१५॥
जयासी सुधारस लाधला जाण ॥ रोग न बाधी त्याकारण ॥ कीं प्रसन्न असतां गजवदन ॥ नये विघ्न त्यापासीं ॥१६॥
तेवीं कृपा करितां अयोध्याधीश ॥ माता न करी सासुरवास ॥ दिव्यज्ञान होऊन तीस ॥ हरिभजनीं विनटली ॥१७॥
उदास होऊन असें अंतरीं ॥ संसारीं राहाटे लोकाचारीं ॥ नामस्मरण निरंतरीं ॥ प्रेमभरीं करीतसे ॥१८॥
अन्नवस्त्र घरीं नसतां ॥ मनांत कांहीं न वाटे चिंता ॥ कबीराची स्त्री पतिव्रता ॥ सती अनसूयेसारिखी ॥१९॥
दीप आणि प्रकाशज्योती ॥ अभिन्नपणें सदा असती ॥ कां अक्षर आणि अर्थ निश्चितीं ॥ द्वैत चित्तीं न घडे त्यां ॥२०॥
कीं चपळा आणि मेघ जाण ॥ दोनी नांदती ऐक्यपण ॥ तेवीं कबीर कांता दोघें जण ॥ एकचित्तें वर्तती ॥२१॥
कीं गोडी साखर जया रीतीं ॥ वेगळेपणें कदा न होती ॥ कीं शशी तुटतां वाढतां रीतीं ॥ कळा तैसीच होतसे ॥२२॥  
तेवीं कबीर येऊन संसारीं ॥ सुखदुःख मानी समसरी ॥ तैसीच कांता निर्धारीं ॥ निजमानसा आकळोनी ॥२३॥
तंव भक्तिज्ञानवैराग्य पुतळा ॥ तिचे उदरीं गर्भ संभवला ॥ नवमास होतांसि तिजला ॥ पुत्र झाला कबीरासी ॥२४॥
तो उपजतांचि वैराग्यशीळ ॥ शुचित्व पणें अति निर्मळ ॥ उदार ज्ञानी निश्चय अढळ ॥ नाहीं तळमळ चित्तासी ॥२५॥
बारा दिवस होतांचि जाण ॥ कमाल ठेविलें नामाभिधान ॥ ऐकूनि पित्याचें कीर्तन ॥ तैसेंचि भजन करीतसे ॥२६॥
सात वर्षें होतां जाण ॥ पित्यासी बोले नम्र वचन ॥ म्हणे द्वारके जावयाकारण ॥ आज्ञा द्यावी मजलागीं ॥२७॥
ऐकोनि पुत्राचें वचन ॥ कबीर बोलिला त्याकारण ॥ म्हणे तूं आपुले मनोरथ पूर्ण ॥ येईं करून सत्वर ॥२८॥
लहान वय असतां जाण ॥ करूं इच्छी तीर्थाटन ॥ हें देखोनि कबीराचें मन ॥ उल्हासयुक्त तेधवां ॥२९॥
जैसा राजयाचा निजबाळ ॥ जिंकूं इच्छितां भूमंडळ ॥ पित्यासी हर्ष वाटे तत्काळ ॥ तैसें वाटलें कबीरासी ॥३०॥
कीं चंद्रमा देखोनि कळायुक्त ॥ सागरासी भरतें दाटत ॥ तेवीं कमाल तीर्था जात ॥ कबी भक्त आनंदला ॥३१॥
कीं तांडव करितां गजानन ॥ आनंदें डोले पंचवदन ॥ कीं सरस्वतीचें ऐकोनि गायन ॥ कमलोद्भव संतोषे ॥३२॥
तेवीं पुत्र देखोनि वैराग्यभरित ॥ उभयतां जाहलीं हर्षयुक्त ॥ नमस्कार करूनि त्वरित ॥ कमाल भक्त चालिला ॥३३॥
मार्गीं चालतां सुपंथीं ॥ मुखीं गातसे नामकीर्ती ॥ लज्जायमान लौकिकस्थिती ॥ न येचि चित्तीं तयाच्या ॥३४॥
नावडे वस्त्रभूषण ॥ रसनेसी नावडे उत्तम अन्न ॥ नावडे दांभिक राजदर्शन ॥ श्रीरामभजनावांचोनी ॥३५॥
कबीरपुत्र कमाल भक्त ॥ ऐसें जाणती लोक समस्त ॥ नगरासी जातां सामोरे येत ॥ ऐकोनि मात निजकर्णीं ॥३६॥
जैसा ब्रह्मपुत्र नारदऋषी ॥ कीर्तननिष्ठ अहर्निशीं ॥ तैसाचि कमाल दिवसनिशीं ॥ रामभजनीं विनटला ॥३७॥
ग्रामवासी देखोनि जन ॥ गांवांत नेती सन्मानेंकरून ॥ एक रात्र तेथें राहून ॥ हरिकीर्तन करीतसे ॥३८॥
यापरी तो विज्ञानस्थिती ॥ द्वारकेसी गेला सत्वरगती ॥ तों पुढें देखिलें तीर्थ गोमती ॥ अनुताप चित्तीं जाहला ॥३९॥
अनुतापेंविण तीर्थाटण ॥ तरी व्यर्थचि येरझार केली जाण ॥ पोटीं नसतां पुत्रसंतान ॥ तरी कासया वतन साधावें ॥४०॥
द्रव्य नसतां काहीं पदरीं ॥ तरी वर्थ कां जावें बाजारीं ॥ चित्तीं प्रेम नसलें जरी ॥ तरी कासया कीर्तन करावें ॥४१॥
लवणाविण रांधिलें अन्न ॥ रुचि न ये त्याकारण ॥ कीं कृपणाचे गांठीचें धन ॥ सत्पात्रीं जाण न पडेचि ॥४२॥
शौर्यतेज क्षत्रियासी नसतां ॥ कासया शस्त्र वागवावें वृथा ॥ कीं कृपणाची मैत्री करितां ॥ सौख्य सर्वथा न पडेचि ॥४३॥
गायत्रीमंत्र नसतां जाण ॥ कासया म्हणावे ब्राह्मण ॥ कीं अलंकार घातले संपूर्ण ॥ परी मंगळसरीविण व्यर्थचि ॥४४॥
तर्कज्ञान नसतां पोटीं ॥ व्यर्थचि कळा चौसष्टी ॥ कीं भूतदयेविण ओंठीं ॥ ज्ञानवटवटी कासया ॥४५॥
कीं ईश्वरकृपा नसतां जाण ॥ वायांचि कवित्व केलें लेखन ॥ तेवीं अनुताप न होतां पूर्ण ॥ तीर्थाटन फळेना ॥४६॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे देहींचे दोष दुर्धर ॥ अनुताप नसतां साचार ॥ तीर्थीं न्हातां न जाती ॥४७॥
असो कबीरपुत्र ते अवसरीं ॥ उभा ठाकोनि गोमतीतीरीं ॥ नमस्कार घालोनि सत्वरी ॥ वंदन करी निजप्रेमें ॥४८॥
मग जळांत प्रवेशोन ॥ करिता जाहला सचैल स्नान ॥ म्हणे गंगे मम दोष निरसून ॥ जन्ममरण खंडावें ॥४९॥
यापरी करूनियां स्नान ॥ द्वादश टिळे गोपीचंदन ॥ लावूनि गळां तुळसीभूषण ॥ घालितां जाहला तेधवां ॥५०॥
ध्यानांत आणोनि द्वारकानाथ ॥ मानसपूजा केली त्वरित ॥ मग दर्शनासी राउळांत ॥ जातसे त्वरित निजप्रेमें ॥५१॥
मग महाद्वारीं येऊन ॥ सत्वर धातलें लोटांगण ॥ मग अंतरगाभारां रिघोन ॥ श्रीकृष्णचरण वंदिले ॥५२॥
नेत्र उघडोनि सप्रेमयुक्ती ॥ ध्यानांत आणिली श्रीकृष्णमूर्ती ॥ मुखीं गावोनि नामकीर्ती ॥ मंगल आरती पैं केली ॥५३॥
यापरी तो कमाल भक्त ॥ चार मास राहिला द्वारकेंत ॥ नित्य हरीचे गुण वर्णित ॥ करूनि कवित्व निजप्रेमें ॥५४॥
ज्ञानचर्चा सत्समागमेंकरून ॥ त्रिकाळ देवाचें दर्शन ॥ चार मास लोटतां पूर्ण ॥ निघे तेथूनि सत्वर ॥५५॥
नमस्कारूनि रणछोडमूर्ती ॥ लोटांगण घातलें निजप्रीतीं ॥ म्हणे देवा पुनः मागुती ॥ दर्शन मजप्रती देइजे ॥५६॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ तेथूनि निघाला झडकरीं ॥ मार्गीं जातां चित्रकूटनगरी ॥ देखोनि भीतरी प्रवेशला ॥५७॥
तेथें विष्णुदास सावकार ॥ परम भाविक होता उदार ॥ तेणें येऊनि नमस्कार ॥ घातला सत्वर निजप्रीतीं ॥५८॥
होऊनियां आर्तभूत ॥ घरासी नेला कमालभक्त ॥ चरण धुवोनि प्रेमयुक्त ॥ भोजन त्वरित घातलें ॥५९॥
रात्रीं मांडिलें हरिकीर्तन ॥ गांवींचे सर्व मिळाले जन ॥ प्रेमयुक्त करितां श्रवण ॥ तटस्थ होऊनि राहिले ॥६०॥
सावकार विचारी मानसीं ॥ म्हणे आतां काय द्यावें यासी ॥ पुढें ठेवितां द्रव्यराशी ॥ नये चित्तासी तयाच्या ॥६१॥
एक हिरा होतां भांडारगृहीं ॥ त्वरें आणोनि लवलाहीं ॥ कमालासी बैसवून ठायीं ॥ ठेविला पायीं तयाचे ॥६२॥
म्हणे हा लहान रत्नदीप्ती ॥ प्रकाशें लोपे दीपज्योती ॥ घरासी जाऊन सत्वरगतीं ॥ सदनाप्रती ठेवावा ॥६३॥
निशाकाळीं ठेवितां समोर ॥ तरी कदा न पडे अंधकार ॥ कमाल म्हणे मजवर ॥ कोपेल कबीर अनुतापें ॥६४॥
हिरा गार आम्हांलागुन ॥ दृष्टीस सारखीं दिसती जाण ॥ तुम्ही कासया आग्रह करून ॥ मजकारणें देतसां ॥६५॥
द्रव्य अर्पावें ब्राह्मणांसी ॥ हिरे रत्नें नृपवरासी ॥ अन्नदान भूतमात्रांसी ॥ तूं जाणसी विचक्षणा ॥६६॥
कोल्हाटी भांड नट नागर ॥ यांसी अंगावरी द्यावा उतार ॥ अनुष्ठानी जे पवित्र नर ॥ शिधासाहित्य त्यांसी द्यावें ॥६७॥
श्रीपादास मिष्टान्नभोजन ॥ काषायवस्त्र द्यावें कौपीन ॥ आम्ही उदास वैष्णवजन ॥ संतुष्ट मन सर्वदा ॥६८॥
कांहीं इच्छा नसतां मानसीं ॥ बळेंच हिरा कासया देसी ॥ पक्वान्न वाढावें धालियासी ॥ तें क्षुधार्थियासी कां न द्यावें ॥६९॥
सागरीं वर्षला महाघन ॥ परी चाड नाहीं त्याजकारण ॥ तेवीं तुवां व्यर्थ मजलागून ॥ हिरा आणोनि दिधला ॥७०॥
ऐसें बोलतां कमाल भक्त ॥ सावकार घाली दंडवत ॥ कौपीनीचे पदरीं त्वरित ॥ त्यासी नकळत बांधिला ॥७१॥
तेथोनि सत्वर उठोनी ॥ परतोनि आला आनंदवनीं ॥ निजमंदिरीं येऊनी ॥ लागला चरणीं कबीराचे ॥७२॥
पुढें ठेवोनि हिरा लाल ॥ वर्तमान सांगे पुत्र कमाल ॥ ऐकोनि कबीर जाहला व्याकुळ ॥ पडला तत्काळ मूर्च्छित ॥७३॥
चित्तीं अनुताप जाहला पूर्ण ॥ दीर्घस्वरें करी रुदन ॥ तों कांता बाहेरी येऊन ॥ धरिले चरण पतीचे ॥७४॥
कबीरासी म्हणे पतिव्रता ॥ आज कासया कष्टी होतां ॥ काय विपरीत देखोनि आतां ॥ अनुताप चित्ता वाटला ॥७५॥
पुत्राकडे पाठ करूनी ॥ कांतेसी सांगे तये क्षणीं ॥ आजि आपुला वंश बुडोनी ॥ गेला ऐसें मज वाटे ॥७६॥
कमाल आपुला पुत्र खरा ॥ नाम विकूनि आणिला हिरा ॥ म्हणोनि आज दुःखसागरा ॥ पडलों जाण निजकांते ॥७७॥
कस्तूरी विखरूनि बाजारीं ॥ राख बांधिली जैसी पदरीं ॥ कीं निपुण शास्त्रज्ञ दवडोनि दूरी ॥ मातंग घरीं आणिला ॥७८॥
कीं भागीरथीची कुपी लवंडोनी ॥ रजकसौंदणीचें घेतलें पाणी ॥ कीं तीर्थवासी दवडोनि मंदिरींहुनी ॥ तस्कर आणोनि बैसविला ॥७९॥
कीं सांडोनि विष्णुउपासन ॥ मसणी केलें वेताळसाधन ॥ वेदांताचें पुस्तक देऊन ॥ कोकशास्त्र आणिलें ॥८०॥
देऊनि मलयगिरीचंदन ॥ त्याचे पालटें घेतला हिंगण ॥ कीं कुटिलासी शेजार देऊन ॥ तपोधना दवडिले ॥८१॥
नातरी उच्चैःश्रवा देवोनि साचार ॥ रजकापासूनि घेतला खर ॥ कीं सुधारस देऊनि परिकर ॥ ताक पात्रीं घेतलें ॥८२॥
तेवीं निजपुत्रानें कामिनी ॥ विपरीत केलें वाटतें मनीं ॥ रामनामविक्रय करूनी ॥ हिरा घेऊनि आला हो ॥८३॥
म्हणोनि दुःख वाटतें मनीं ॥ मूर्च्छना येऊनि पडिलों धरणीं ॥ ऐकूनि तेव्हां पित्याची वाणी ॥ कमाल तेथोनि निघाला ॥८४॥
परतोनि आला सावकारापासीं ॥ हिरा दिधला जाऊनि तयासी ॥ मागुती येऊनि घरासी ॥ मातापित्यांसी वंदिलें ॥८५॥
सांतितला सकळ वृत्तांत ॥ ऐकोनि कबीर उल्हासयुक्त ॥ जेवीं शिष्य होतांचि विरक्त ॥ सद्गुरुनाथ संतोषती ॥८६॥
कीं आरोग्य बाळका देखोनि नयनीं ॥ हर्षें ओसंडे निजजननी ॥ कीं लवकुशांचा प्रताप ऐकोनि ॥ श्रीराम मनीं संतोषे ॥८७॥
तेवीं उपाधिरहित देखोनि ॥ कमाल आलिंगिला तेचि क्षणीं ॥ तेणें मिठी घालूनि चरणीं ॥ श्रीरामभजनीं विनटला ॥८८॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ मिळोनि संतमांदी बरी ॥ तीर्थवासी ते सत्वरी ॥ आले गह्रीं कबीराच्या ॥८९॥
प्रहर रात्र होतांचि जाण ॥ घरासी आले साधुजन ॥ उभयतां पुढें होऊन ॥ केलें नमन साष्टांगें ॥९०॥
बैसवयासी ते अवसरीं ॥ ऊर्णावस्त्र आणिलें सत्वरी ॥ कमाल संतांसी विनंती करी ॥ बैसा यावरी स्वामिया ॥९१॥
संत देखोनियां जाणा ॥ हर्ष वाटला तिघांजणां ॥ जेवीं सनकादिक देखोनि नयनां ॥ शचीरमणा आनंद ॥९२॥
कीं बहुत दिवस पडिलें अवर्षण ॥ मग वर्षला जैसा अपार घन ॥ सुखी झाले प्रजानन ॥ तैसें वाटलें कबीरासी ॥९३॥
रोगियासी पाजिला सुधारस ॥ कीं चंद्रामृत लाधलें चातकास ॥ कीं स्नेहसूत्र घालितां दीपकास ॥ सोज्ज्वळ दिसे निजतेजें ॥९४॥
कीं कीर्तन ऐकोनि स्वानंदभरित ॥ आनंदें डोलती प्रेमळ भक्त ॥ कीं अशोकवनीं भेटतां हनुमंत ॥ स्वानंदभरित जनकात्मजा ॥९५॥
तेवीं संत देखोनि निजदृष्टीसी ॥ हर्ष वाटला कबीरासी ॥ एकांतीं जाऊनि निजकांतेसी ॥ म्हणे भोजन संतांसी घालावें ॥९६॥
हे वैष्णव भक्त तीर्थवासी ॥ आले आपुल्या घरासी ॥ मंदिरीं निजतां उपवासी ॥ तरी हानि सत्वासी होईल ॥९७॥
घरीं तिळभरी नसे अन्न ॥ संकट पडलें अति दारुण ॥ ऐसें ऐकूनियां वचन ॥ कांता बोलिली तें ऐका ॥९८॥
कबीरासी म्हणे प्राणनाथा ॥ कांहीं उपाय न दिसे आतां ॥ शेजार्‍यापासीं उसण्यासी जातां ॥ तरी ते सर्वथा न देती ॥९९॥
अन्न विकत घ्यावें बाजारीं ॥ तरी द्रव्य नाहीं आपुले पदरीं ॥ पुत्रासी घेऊनि बरोबरी ॥ जावें चोरी करावया ॥१००॥
सामग्री असेल संपूर्ण ॥ वाणियाचें फोडावें दुकान ॥ चोरी करूनि आणावें अन्न ॥ घालावें भोजन संतांसी ॥१॥
अवश्य म्हणोनि कबीरभक्तें ॥ असिलता घेऊन सांगातें ॥ पाहार घेतली कमालभक्तें ॥ निघे त्वरित लगबगां ॥२॥
सत्वर बाजारीं येऊन ॥ वाणियाचें फोडिलें दुकान ॥ निजपुत्रासी आंत घालून ॥ आपण बाहेर राहिला ॥३॥
रात्र झाली दोन प्रहर ॥ वाणीयाची निद्रा लागली घोर ॥ बाहेरूनि पुत्रासी सांगे कबीर ॥ कार्य सत्वर साधावें ॥४॥
कमाल विलोकी दुकानासी ॥ तों दृष्टीं देखिल्या द्रव्यराशी ॥ वस्त्रें भूषणें निजनयनांसी ॥ देखोनि मानसीं कंटाळला ॥५॥
मग कणिक तांदूळ आणि गूळ ॥ डाळ घृत शर्करा घेऊनि सकळ ॥ बाह्रे दिधलें तत्काळ ॥ कबीरापासीं तेधवां ॥६॥
हळदी हिंग जिरें लवण ॥ शाका पत्रें सर्व घेऊन ॥ संतांसी पाहिजे जितुकें अन्न ॥ तितुकेंच दिधलें बाहेरी ॥७॥
गंगेचें उदक देखोनि बहुत ॥ जवळ गेला तृषाक्रांत ॥ तो ताहानेपुरतें पिऊनि त्वरित ॥ निघे सत्वर ज्या रीतीं ॥८॥
कीं पात्रीं अन्न वाढिलें बहुत ॥ परी क्षुधार्त पोटापुरतें खात ॥ कीं करतळभिक्षा संन्यासी करित ॥ ते ग्रासावांचूनि न घेती ॥९॥
कीं कीर्तन ऐकूनि वैष्णवभक्त ॥ दोष टाकूनि सद्गुण घेत ॥ कीं राजहंस बैसोनि पाणियांत ॥ क्षीर सेवित निवडोनी ॥११०॥
तेवीं वस्त्रें भूषणें तये क्षणीं ॥ द्रव्यराशी देखिल्या नयनीं ॥ तें सर्वही कमालें त्यागोनी ॥ सामग्री घेऊनि निघाला ॥११॥
बाहेर निघावें जों त्वरित ॥ तों विचार आठवला मनांत ॥ वाणि तो जाहला निद्रित ॥ सावध तरित करावा ॥१२॥
निश्चिंतपणें निजला वैरी ॥ त्यासी अकस्मात मारिलें जरी ॥ की मागें भलत्याची निंदा करी ॥ तरी नरकीं घोरीं पडेल तो ॥१३॥
रणीं पळत्यापाठीं लागतां ॥ कीं निश्चिंतपणें चोरी करितां ॥ नांदत्या घरासी अग्नि लावितां ॥ तरी नरकीं घोरीं पडेल तो ॥१४॥
तरी आपण सज्ञान वैष्णवभक्त ॥ पाप पुण्य मनासी सर्व कळत ॥ आतां वाणियासी सावध करूनि निश्चित ॥ जावें सत्वर पळोनी ॥१५॥
मग धैर्य धरोनियां पोटीं ॥ जवळी पातला उठाउठीं ॥ वाणियाची पाठी थापटी ॥ म्हणे सावध शेटी असावें ॥१६॥
आम्हीं तस्कर दोघे जण ॥ मागून फोडिलें दुकान ॥ जातों सामग्री घेऊन ॥ तुम्हांकारणें कळों द्या ॥१७॥
वाणी बैसला उठोनी ॥ कमाल पळे त्वरेंकरोनी ॥ छिद्रांतूनि निघतां तये क्षणीं ॥ तों चरण दोन्ही धरियेले ॥१८॥
नाभीपर्यंत बाहेर गेला ॥ तों अकस्मात सावकारें धरिला ॥ जैसा मृग उडतां फांसीं पडला ॥ पारधियाचे वनांत ॥१९॥
कीं मानससरोवरीं राजहंस गेला ॥ तों ससाण्यानें अवचितां धरिला ॥ कीं नळिकायंत्रीं सांपडला ॥ रावा जैसा निजभ्रांतीं ॥१२०॥
कीं चक्रव्यूह रची कौरवपाळ ॥ त्यांत सांपडला सुभद्रेचा बाळ ॥ कीं पुष्पवाटिकेंत हिंडितां कोकिळ ॥ धरिली जसी हिंसकें ॥२१॥
तेवीं कमाल पळतां लवलाहीं ॥ वाणीयानें ओढोनि धरिला पायीं ॥ मग कमाल बाळ त्या समयीं ॥ पित्यासी काय बोलत ॥२२॥
म्हणे रामकार्यासी वायुसुत ॥ नेतां द्रोणागिरी पर्वत ॥ वाटेसी विंधोनि पाडी भरत ॥ तैसेंचि जाहलें आपणांसी ॥२३॥
आतां वाणी बाहेर येऊनी ॥ बाजारीं करील शंखध्वनी ॥ नगरवासी लोक ऐकोनि ॥ येतील धांवोनि पहावया ॥२४॥
आपण गांवींचे तस्कर ॥ सर्व जाणती नारीनर ॥ तरी छेदूनियां माझें शीर ॥ जावें सत्वर मंदिरा ॥२५॥
माया ममता धराल मनीं ॥ तरी निजसत्त्वाची होईल हानी ॥ चोरीची मात ऐकतां कानीं ॥ संत सदनीं न बैसती ॥२६॥
जारिणीची कानीं ऐकोनि मात ॥ पतिव्रता जैशा उठोनि जात ॥ कीं मातंग येतां मंदिरांत ॥ शास्त्रज्ञ पंडित न राहती ॥२७॥
कीं सद्गुरुची निंदा ऐकोनि कानीं ॥ सज्ञान उठती तेथूनी ॥ तेवीं चोरीची मात ऐकोनी ॥ जाती उठोनि संतसाधु ॥२८॥
तरी आतां ऐक गा विष्णुभक्ता ॥ शांतिसागरा सद्गुण भरिता ॥ त्यजूनि सर्व माया ममता ॥ शिर छेदीं निजहस्तें ॥२९॥
ऐकोनि पुत्राची वचनोक्ती ॥ कबीर संतोषे स्वचित्तीं ॥ असिलता घेऊनि हातीं ॥ शिर कापूनि घेतलें ॥१३०॥
सामग्रीची मोट उचलोनी ॥ घरा गेला त्वरेंकरूनी ॥ कांतेपासीं जाऊनी ॥ वर्तमान सांगितलें ॥३१॥
कबीराचें धैर्य सांगतां प्रीतीं ॥ कुंठित जाहली सकळ मती ॥ दृष्टांत योजूनि महीपती ॥ श्रोतयांप्रती बोलत ॥३२॥
जेवीं श्रियाळाचे मंदिरासी ॥ पाहुणे आले कैलासवासी ॥ नरमांस मागतां भोजनासी ॥ निजपुत्रासी वधियेलें ॥३३॥
तैसेंचि केलें वैष्णववीरें ॥ हाही दृष्टांत येथें न पुरें ॥ श्रियाळासी छळिलें पार्वतीवरें ॥ म्हणोनि पुत्र वधियेला ॥३४॥
संतीं न मागतां भोजन ॥ निजबाळ वधिला कबीरानें ॥ म्हणऊनि उपमा दिसे ती गौण ॥ चतुर सर्वज्ञ जाणती ॥३५॥
पृथ्वींऐसें घनवट कोण ॥ कीं आकाशाची थोरीव पूर्ण ॥ अश्वत्था ऐसा पूज्यमान ॥ वृक्ष कोठोन पाहावा ॥३६॥
गरुडाऐसा पक्षी नसे तत्त्वतां ॥ भागीरथीहूनि नसे थोर सरिता ॥ सागराहूनि सखोलता ॥ अन्य सरोवरा असेना ॥३७॥
कल्पतरूऐसें फळ काय ॥ कीं कामधेनूवरिष्ठ कोण गाय ॥ अनसूयेऐसी न दिसे माय ॥ त्रिभुवनीं पाहें धुंडितां ॥३८॥
चंद्राऐसें प्रकाशमान ॥ गगनीं नक्षत्र दिसे कोण ॥ कीं दैत्यवंशी बळीहूनी ॥ दाता उदार नसे कीं ॥३९॥
कीं वाल्मीकाऐसा आत्मबुद्धीनें ॥ भविष्यकर्ता कवि कोण ॥ कीं मारुतीऐसा वानर जाण ॥ धुंडिता त्रिभुवनीं दिसेना ॥१४०॥
असो बहुत बोलोनि काय काज ॥ ज्याची उपमा त्यासीच साजे ॥ कबीराऐसा भक्तराज ॥ धुंडिता मज दिसेना ॥४१॥
सामग्री ठेवूनि धरणीसी ॥ शिर दिधलें कांतेपासीं ॥ मोह दाटोनि निजमायेसी ॥ अश्रु नयनीं लोटले ॥४२॥
म्हणे बा तूं दैवागळा ॥ संतकारणीं देह लाविला ॥ संसारी येऊन श्रीराम जोडिला ॥ उद्धार केला वंशाचा ॥४३॥
ऐसें म्हणोनि कबीरकांता ॥ धैर्यबळें आवरिलें चित्ता ॥ साहित्य घेऊन तत्त्वतां ॥ स्वयंपाकासी निघाली ॥४४॥
नवविधा रांधोन पक्वान्न ॥ संतांसी घातलें भोजन ॥ म्हणे धन्य आजिचा सुदिन ॥ देखिले चरण संतांचे ॥४५॥
तृणासनें घालोनि ते अवसरीं ॥ कबीर संतांची सेवा करी ॥ तों उदयासी पातला तमारी ॥ साधु झडकरी उठिले ॥४६॥
प्रातःस्मरण जाहलिया जाण ॥ स्नानासी गेले वैष्णवजन ॥ इकडे वाणी बाहेर येऊन ॥ शंखनाद करितसे ॥४७॥
बोंबा ऐकूनि सकळ लोक ॥ धांवूनि आले तात्कालिक ॥ तस्कराजवळी येऊन देख ॥ पाहते जाहले तेधवां ॥४८॥
म्हणती शिरचि नेलें कापून ॥ आतां यास ओळखील कोण ॥ वाणीयासी बोलती वचन ॥ तुझें प्राक्तन विचित्र ॥४९॥
तस्करीं मारूनि नेला चोर ॥ तुजला रक्षी सर्वेश्वर ॥ नाहीं तरी विघ्न साचार ॥ आलें होतें आजि हें ॥१५०॥
जवळी द्रव्य असतां पाहें ॥ एकटा निद्रा करूं नये ॥ द्रव्यापासीं महाभय ॥ अखंड राहे सर्वदा ॥५१॥
द्रव्यआशा धरिली जरी ॥ सखे बंधु होती वैरी ॥ द्रव्य तारी द्रव्य मारी ॥ दोनी परी असती कीं ॥५२॥
राजद्वारीं कोंडितां जाण ॥ द्रव्य सोडवी त्याकारण ॥ तस्कराचें शिरच्छेदन ॥ द्रव्याकरितां झालें कीं ॥५३॥
तुझें सुकृत होतें कांहीं ॥ म्हणोनि वांचलासि ये समयीं ॥ कीं ते तस्कर नसती पाहीं ॥ भले सज्जन असतील ॥५४॥
होत्या दुकानीं द्रव्यराशी ॥ वस्त्रें भूषणें टाकोनि कैसी ॥ सामग्रीच घेऊन थोडीसी ॥ गेले हें नवल वाटतें ॥५५॥
असो यापरी त्रिविध जन ॥ नानापरीचें बोलती वचन ॥ वाणियानें सत्वर जाऊन ॥ राजयापाशीं सांगितलें ॥५६॥
म्हणे दोघे तस्कर येऊन ॥ माझें फोडिलें दुकान ॥ अन्नसामग्री घेऊन ॥ पळोनि जातां धरिले म्यां ॥५७॥
दुसरा तस्कर होता जाण ॥ शिरचि कापूनि नेलें त्याणें ॥ ऐसें ऐकूनियां वचन ॥ सकळ जन हांसती ॥५८॥
राजा जाहला क्रोधायमान ॥ आज्ञा करी सेवकांकारण ॥ म्हणे तस्करासी शूलीं देऊन ॥ शिक्षा करणें ये वेळे ॥५९॥
ऐकोनिया सेवक पाहीं ॥ क्रोधें धांवले लावलाहीं ॥ कमालाचें धडे ते समयीं ॥ शूलावरी घातलें ॥१६०॥
मृत प्रेतासीं दंड करणें ॥ बुद्धिमंतासी वाद घालणें ॥ परदेशीं कलह करणें ॥ हें कुलक्षण सज्ञान ॥६१॥
इकडे गंगातीरीं साधुसंत ॥ स्नानास गेले होते त्वरित ॥ देवतार्चन करून निश्चित ॥ आले त्वरित आश्रमा ॥६२॥
कबीरासी पुसोनि त्वरेंसीं ॥ पुढें चालिले तीर्थवासी ॥ नमस्कार करूनि संतांसी ॥ बोळवावयसी चालिला ॥६३॥
कांता करीतसे रुदन ॥ संतांसी घालोनि लोटांगण ॥ म्हणे आतां स्वामींचे चरण ॥ कधीं दृष्टी पडतील ॥६४॥
संतांसी बोलोनि नम्र वचन ॥ बोळवीत चालिलीं दोघेंजण ॥ नगराबाहेर येतां जाण ॥ नवल वर्तलें अद्भुत ॥६५॥
मार्गीं चालतां अतित्वरित ॥ शूल देखिला अकस्मात ॥ त्यावरी शिराविण घातलें प्रेत ॥ देखती संत दुरूनी ॥६६॥
क्षण एक उभे राहूनि पाहात ॥ तों नवल वर्तलें अति अद्भुत ॥ कमालें दोनी जोडोनि हस्त ॥ साधुसंत नमस्कारिले ॥६७॥
विपरीत देखोनि ते अवसरीं ॥ नवल करिताती नरनारी ॥ शिराविण प्रेत नमस्कारी ॥ अद्भुत परी वाटतसे ॥६८॥
कबीरासी पुसती साधुसंत ॥ आम्हांसी नमस्कारी प्रेत ॥ शिर नसतां कुडीआंत ॥ प्राण कैसे ठेविले ॥६९॥
वृक्ष तोडितां सत्वरगती ॥ शाखा कैशा टवटवती ॥ पक्ष उपडितां कैशा रीतीं ॥ द्विज उडताती निराळी ॥१७०॥
तारा तुटोनि गेलिया जाणा ॥ कैसा वाजेल ब्रह्मवीणा ॥ तेवीं प्रेतासी देखोनि चेतना ॥ वाटे मना विपरीत ॥७१॥
हात जोडूनि ते अवसरीं ॥ कबीर संतांसी विनंति करी ॥ भीष्म पडला शरपंजरीं ॥ प्राण देहीं रक्षिला कीं ॥७२॥
दुःख सांगावया अर्जुनाजवळी ॥ अभिमन्यु पडला ॥ रनमंडळीं ॥ धैर्य धरूनि ते वेळीं ॥ प्राण देहीं रक्षिले ॥७३॥
नातरी जटायु गांजितां रावणें ॥ प्राण व्याकुळित यातनें ॥ परी घ्यावया श्रीरामदर्शन ॥ प्राण देहीं रक्षिले ॥७४॥
तैसाचि वैष्णव होता तस्कर ॥ तुमचें पायीं हेत थोर ॥ एकदां करावा नमस्कार ॥ म्हणूनि प्राण ठेविला ॥७५॥
तो मनोरथ पुरला संपूर्ण ॥ तुमचें जाहलें त्यासी दर्शन ॥ आतां नाशवंत देह टाकून ॥ अक्षयपदीं राहिला ॥७६॥
ऐकोनि संत बोलती वचन ॥ तो तस्कर होतां तरी कोण ॥ मग कबीरें सकळ वर्तमान ॥ सांगितलें संतांसी ॥७७॥
मग काय बोलती वैष्णवजन ॥ आम्हीं मागितलें नसतां भोजन ॥ कमाला ऐसा बाळ सगुण ॥ मारूनि कैसा टाकिला ॥७८॥
ऐकोनि बोले तो वैष्णववीर ॥ नाशवंत अवघा संसार ॥ जितुका दिसतो आकार ॥ तितुका जाणार शेवटीं ॥७९॥
कमाल जरी म्यां मारिला नसता ॥ तरी काय तो अमर होता ॥ ऐसी ऐकोनियां वार्ता ॥ कृपा संतां उपजली ॥१८०॥
कबीरकांतेसी बोलती संत ॥ शिर दाखवीं आणूनि त्वरित ॥ ऐसी ऐकोनियां मात ॥ गेली त्वरित मंदिरा ॥८१॥
निजपुत्राचें मस्तक घेत ॥ संतांपासीं आणिलें त्वरित ॥ देखोनि जाहले सद्गदित ॥ दयावंत संत ते समयीं ॥८२॥
धड काढोनि सत्वरी ॥ मस्तक ठेविलें त्यावरी ॥ कौतुक पाहती नरनारी ॥ नवल वर्तलें तें ऐका ॥८३॥
संतीं मस्तकीं ठेवितां कर ॥ सावध जाहला कबीरपुत्र ॥ कमाल उठोनि सत्वर ॥ घाली नमस्कार संतांसी ॥८४॥
वाराणसीचे सकळ जन ॥ कबीरासी घालिती लोटांगण ॥ म्हणती हा वैष्णव परम सज्ञान ॥ तारक पूर्ण जडजीवां ॥८५॥
संतीं देऊनि वरदान ॥ तीर्थांटनासी केलें गमन ॥ पुढील अध्यायीं निरूपण ॥ कथा सुरस अवधारा ॥८६॥
संतचरित्र ग्रंथ सार ॥ हेंचि पंढरी क्षेत्रींचें राऊळ सुंदर ॥ अवीट घननीळ विटेवर ॥ अक्षयीं उभा राहिला ॥८७॥
संत साधु वैष्णवजन ॥ प्रेमें करिती सत्कीर्तन ॥ तेथें मी पतित अज्ञान ॥ घ्यावया दर्शन आलों कीं ॥८८॥
प्रांजळ ओंव्या फुलें तुळसी ॥ करीं घेऊनि सद्भावेंसीं ॥ महीपति लागला चरणांसी ॥ प्रेम उचित मागावया ॥८९॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ षष्ठाध्याय रसाळ हा ॥१९०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥    ॥   
॥ इति भक्तविजय षष्ठाध्याय समाप्त ॥    ॥