शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय १

श्रीगणेशाय नमः ॥    ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्या नमः ॥    ॥
जय जय भीमातीरविहारा ॥ भक्तवत्सला कृपासागरा ॥ व्यापूनियां चराचरा ॥ अससी निराळा सर्वातीत ॥१॥
गणेशसरस्वतीरूपक ॥ तूं नटलासी अनेक ॥ म्हणऊनि शारदां विनायक ॥ ग्रंथारंभीं नमिलीं म्यां ॥२॥
नमूं सद्गुरु तुकाराम ॥ जेणें निरसिला भवभ्रम ॥ आपुले नामीं देऊनि प्रेम ॥ भवबंधन निरसिलें ॥३॥
आतां नमूं महाकवी ॥ व्यास वाल्मीकिमुनि भार्गवी ॥ शुक नारद उशनाकवी ॥ जैमिनि आदि नमियेले ॥४॥
आतां नमूं संतसज्जन ॥ जे हरीस आवडती जीवाहून ॥ कलियुगीं अवतार धरून ॥ ज्यांहीं जड मूढ अज्ञान तारिले ॥५॥
आरंभिला भक्तविजय ग्रंथ ॥ हा सिद्धि पाववा तुम्हीं समस्त ॥ जेवीं दुर्बळगृहीं मांडितां कृत्य ॥ साहित्य श्रीमंत करिताती ॥६॥
जेवीं डोळस असतां कृपाधन ॥ अंधासी हिंडवी तीर्थाटन ॥ तेवीं तुम्हीं आपले कृपादानेंकरून । सरंतीं वचनें करावीं ॥७॥
मंदमति मी अज्ञान ॥ मीं नाहीं केलें काव्यपठण ॥ नाहीं पाहिले ग्रंथ पुराण ॥ गीर्वाणभाषण नेणें मी ॥८॥
परंतु येथें एक असे परी ॥ जे भक्तचरित्रें आवडती हरी ॥ ऐसें बोलिला त्रिपुरारी ॥ भविष्योरपुराणीं ॥९॥
म्हणऊनि धिंवसा चित्तीं ॥ मज उपजला अति प्रीतीं ॥ चंचूनें टिटवी अपांपती ॥ कोरडा करीन म्हणतसे ॥१०॥
ज्या हरीचे वर्णितां गुण ॥ श्रुतीस पडलें अति मौन ॥ शेषाच्या जिव्हा चिरल्या जाण ॥ केलें आंथरूण अंगाचें ॥११॥
ब्रह्मा ईंद्र आणि हर ॥ हे नेणती ज्याचा पार ॥ तेथें मी काय पामर ॥ गुण वर्णूं तयाचे ॥१२॥
बाळकें अघटित घेतां आळ ॥ मासा पुरवी तत्काळ ॥ तैसा तो दीनदयाळ ॥ आळ माझी पुरवील कीं ॥१३॥
बैसावें पित्याचें मांडीवरु ॥ ऐसें इच्छिता बाळ धुरु ॥ अढळपदीं निरंतरु ॥ स्थापिला जैसा हरीनें ॥१४॥
कीं दुग्ध मागतां वाटीभर ॥ उपमन्यूसी दिधला क्षीरसागर ॥ तैसाचि तो दिनदयाळ उदार ॥ आळ माझी पुरवील कीं ॥१५॥
कृतीं त्रेतीं द्वापारीं ॥ जे भक्त अवतरले पृथ्वीवरी ॥ तेचि कलियुगामाझारी ॥ प्रकट झाले तारक ॥१६॥
त्यांचीं चरित्रें वर्णावयास ॥ मज वाटला बहु उल्हास ॥ आतां श्रोते हो सावकाश ॥ द्यावें अवधान मजलागीं ॥१७॥
नेणें मी कांहीं चातुर्य व्युत्पत्ती ॥ नव्हें मज बहुश्रुत अध्यात्मग्रंथीं ॥ नेणें संस्कृतवाणी निश्चितीं ॥ श्रीरुक्मिणीपति जाणतसे ॥१८॥
मागें संतवरदानीं ॥ एकनाथ बोलिले रामायणीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥१९॥
नामदेवमुक्तेश्वरांनीं ॥ भारतीं वर्णिला चक्रपाणी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२०॥
श्रीभागवतीं टीका वामनी ॥ हरिविजय केला श्रीधरांनीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२१॥
बोधराज रामदासांनीं ॥ गीतीं आळविला कैवल्यदानी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२२॥
गणेशनाथ केशवस्वामी ॥ साळ्या रसाळ प्रसिद्ध जनीं ॥ कबीर बोलिले हिंदुस्थानी ॥ देशभाषा आपुली ॥२३॥
ऐसे संत प्रेमळ जनीं ॥ ज्यांचे ग्रंथ ऐकतां श्रवणीं ॥ अज्ञानी होती अति ज्ञानी ॥ नवल करणी अद्भुत ॥२४॥
रेडियामुखें प्रतिष्ठानीं ॥ वेद बोलविले ज्ञानेश्वरांनीं ॥ ऐसे संत दयाळ गुणी ॥ ग्रंथारंभीं नमियेले ॥२५॥
जेवीं गंगेंत मिळतां समरस जाण ॥ ओहळांसी आले पवित्रपण ॥ कीं लोह परिसा लागतां जाण ॥ तें होय भूषण श्रीमंतां ॥२६॥
कीं राजपुत्राचे वर्णितां गुण ॥ यथार्थ मानिती प्रधानजन ॥ तेवीं भक्तचरित्रें वर्णितां जाण ॥ संतसज्जन तुष्टती ॥२७॥
नातरी पुराणप्रसिद्ध नसली सरिता ॥ परी सिंधुमिळणीं पावे मान्यता ॥ कीं कल्पतरूचे छायेसी बैसतां दरिद्र्या आपदा न बाधी ॥२८॥
तेवीं मी मतिमंद असतां जाण ॥ निजभक्तांचे वर्णितां गुण ॥ कृपा करील रुक्मिणीरमण ॥ भक्तभूषण कृपाळु ॥२९॥
उपजलों जयाचें गोत्रीं जाण ॥ तया वसिष्ठासी साष्टांग नमन ॥ तेणें आपुले कृपेंकरून ॥ ग्रंथ सिद्धी पाववावा ॥३०॥
आतां नमूं मातापिता ॥ ज्यांसी सकल तीर्थांहूनि वरिष्ठता ॥ ज्यांचेनि नरदेह तत्वतां ॥ लाधला अवचिता निजभाग्यें ॥३१॥
आमुचें कुळींचें दैवत ॥ उभयपक्षीं रुक्मिणीकांत ॥ तयासी नमितां विबुध समस्त ॥ तृप्त होती निर्धारें ॥३२॥
जैसें समुद्राचें करितां पूजन ॥ सकळ सरितांचें संतुष्ट मन ॥ कीं निशापतीचें घेतां दर्शन ॥ सकळ उडुगणें दिसती पैं ॥३३॥
कीं पृथ्वीप्रदक्षिणा करितां त्वरित ॥ सकळ क्षेत्रें आलीं त्यांत ॥ नातरी दृष्टीं देखिल्या विनतासुत ॥ पक्षी समस्त आराधिले ॥३४॥
तेवीं उपासितां पांडुरंगदैवत ॥ सकळ सुरवर होती तृप्त ॥ तो देवाधिदेव पंढरीनाथ ॥ आधार समस्त तयावरी ॥३५॥
तो बुद्धीचा दाता चक्रपाणी ॥ जैसी वदवील कवित्ववाणी ॥ ती सादर होऊनि संतसज्जनीं ॥ परिसावी श्रवणीं निजप्रेमें ॥३६॥
म्हणाल निजबुद्धीनें त्वरित ॥ आपुले मतीनें रचिला ग्रंथ ॥ तरी तैसें नव्हे जी निश्चि विकल्प चित्तीं न धरावा ॥३७॥
जो उत्तरदेशीं साचार ॥ नाभाजी विरिंचिअवतार ॥ तेणें संतचरित्र ग्रंथ थोर ॥ ग्वाल्हेरी भाषेंत लिहिला असे ॥३८॥
आणि मानदेशीं उद्धवचिद्धव ॥ त्यांहीं भक्तचरित्रें वर्णिलीं जाण ॥ दोहींचें संमत एक करून ॥ भक्तविजय आरंभिला ॥३९॥ श्रीभीमातीरवासी रुक्मिणीरमण ॥ तेणें दिधलें आश्वासन ॥ ग्रंथ प्राकृत वदविला गहन ॥ तो परिसा सज्जन हो प्रीतीनें ॥४०॥
बाळक बोबडे बोले वचन ॥ परी माता चोज करी ऐकोन ॥ तैसें माझें आर्ष बोलणें पूर्ण ॥ अंगीकाराल वाटतें ॥४१॥
कीं गंगेसी ओहळ मिळतां जाण ॥ तिनें केला आपुले समान ॥ तेवीं तुम्हांसीं सलगी करितां जाण ॥ सरतीं वचनें होतील कीं ॥४२॥
कस्तूरींत मृत्तिका गेलीं मिळोन ॥ मोलासी चढली तिजसमान ॥ तैसेंचि माझें प्राकृत भाषण ॥ कराल मान्य वाटतसे ॥४३॥
नातरी पडतां किंचित जीवन ॥ पय करी आपुल्यासमान ॥ तेंवीं तुमच्या कृपेंकरून ॥ सरतीं वचनें होतील ॥४४॥
तुम्ही संत ईश्वरमूर्ती ॥ ऐसा निश्चय दृढ चित्तीं ॥ म्हणोनियां महीपती ॥ नमन करी सद्भावें ॥४५॥
आतां ऐका चित्त देऊन ॥ श्रीकृष्णअवतार संपतां जाण ॥ कलियुगीं यज्ञादि दानधर्म ॥ यांचा लोप जाहला ॥४६॥
विप्रीं सांडिला आचार ॥ क्षत्रीं सांडिला विचार ॥ चतुर्थाश्रम साचार ॥ धरामर न करितील ॥४७॥
पुत्र नायके पितृवचन ॥ शिष्य न करिती गुरुसेवन ॥ भ्रतार स्त्रियांचें वचन ऐकोन ॥ श्वशुरगृहीं राहती ॥४८॥
कोणासी नावडे तीर्थाटन ॥ सद्भावें न करिती पुराणश्रवण ॥ हरिकीर्तन टाकून जाण ॥ भोरिप आवडीं पाहती ॥४९॥
शालग्राम टाकून धरामरीं ॥ क्षुद्र दैवतें वसविती घरीं ॥ तुलसी रुद्राक्ष टाकूनि दूरी ॥ दरुषणें गळां घालिती ॥५०॥
धनाढ्यासी नावडे दान ॥ निरोगियासी नावडे तपाचरण ॥ रायासी नावडती प्रजाजन ॥ न्यायनीति राहिल्या ॥५१॥
कुलस्त्रिया होती दासी ॥ कन्या विकिती अश्विनीऐसी ॥ अविंध मारिती गायींसी ॥ कलिराजा प्रकटता ॥५२॥
असत्य भाषण बहु बोलती ॥ साधुजनांची निंदा करिती ॥ खोटें तेंचि खरें दाविती ॥ साक्ष देती सकळिक ॥५३॥
गायत्रीचा लोप झाला ॥ साबरीमंत्र प्रगटला ॥ विश्वास देऊनि भाविकांला ॥ घात करितील निर्दय ॥५४॥
पाषण होऊन देव बैसले ॥ तयांसी अविंध फोडिती बळें ॥ तीर्थीं कर बैसविले ॥ थोर पीडिलें कलीनें ॥५५॥
असत्याएवढें पाप नाहीं ॥ सत्याएवढें सुकृत नाहीं ॥ कलीनें सत्य लोपविलें अवघेंही ॥ दोष झाले अपार ॥५६॥
राहूचा उदय होतां जाण ॥ अंधारें कोंदे गगन ॥ कीं जवळ येतां मरण ॥ देहीं रोग एकवटती॥५७॥
जैसी रजंनी प्रगटतां जाण ॥ पिशाचें उठती मसणांतून ॥ कीं पुरुष देखोनि प्राकृतहीन ॥ दुःखदैन्य येतसे तेथें ॥५८॥
कीं गुरु क्षोभतांचि जाण ॥ त्यापुढें प्रकटे अज्ञान ॥ कीं तारुण्यदशा येतांचि पूर्ण ॥ देहीं अहंता विस्तारे ॥५९॥
नातरी कुटिल येतां सभेंसी ॥ निंदा प्रकटे आपैसी ॥ कलि उद्भवतां दुरितें तैसीं ॥ प्रकट झाली अपार ॥६०॥
बदरिकाश्रमासी ऋषी गेले ॥ इतर ब्राह्मणीं आचार सांडिले ॥ ऐसें होताच एक वेळे ॥ पृथ्वीकंप जाहला ॥६१॥
यावरी वैकुंठीं श्रीहरी ॥ निजभक्तांशीं विचार करी ॥ अद्भुत पाप महीवरी ॥ मृत्युलोकीं जाहलें ॥६२॥
यज्ञ याग सर्व राहिले ॥ ब्राह्मणीं सत्कर्म टाकिलें ॥ अज्ञानजन बुडाले ॥ दुःखार्ण्वामाझारीं ॥६३॥
ऐसियास काय कीजे विचार ॥ ऐसें बोलतां क्षीराब्धिजावर ॥ तंव अवघे भक्त जोडोनि कर ॥ सन्मुख उभे राहिले ॥६४॥
मग म्हणती हृषीकेशी ॥ कांहीं आज्ञा करावी आम्हांसी ॥ तेव्हां क्षीरसागरविलासी ॥ निजभक्तांसी बोलत ॥६५॥
आम्हीं मागें अवतार धरूनी ॥ दुष्ट दैत्य टाकिले मारूनी ॥ निर्वैर केली सर्व धरणी ॥ आतां बौद्ध होऊनि बैसलों ॥६६॥
यावरी तुम्हीं सकळिकीं ॥ अवतार घेऊनि मृत्युलोकीं ॥ माझीं स्थानें आहेत जितकीं ॥ महाक्षेत्रें पुरातनें ॥६७॥
पंढरीक्षेत्र दिंडीरवन ॥ तेथें उद्धवें अवतार धरून ॥ दक्षिण देशींचे सर्व जन ॥ माझे भक्तीसी लावावे ॥६८॥
मथुरा गोकुळवृंदावन ॥ तेथें अक्रूरें अवतार धरून ॥ माझे भक्तीसी अवघे जन ॥ उपदेश करून लावावे ॥६९॥
दारुक भक्तें पश्चिम दिशेस ॥ अवतार धरूनि रामदास ॥ माझे भजनीं सकळ देश ॥ लावूनि उद्धार करावा ॥७०॥
पूर्व दिशेसी जगन्नाथ ॥ व्यासें अवतार धरूनि तेथ ॥ माझीं चरित्रें अति अद्भुत ॥ जनांसी श्रवण करावीं ॥७१॥
हस्तिनापुर क्षेत्र जाण ॥ तेथें वाल्मीकें अवतार धरून ॥ माझें भजनीं सकळ जन ॥ अति आदरें लावावे ॥७२॥
राम अवतार म्यां घेतला ॥ तुम्ही वानर झालेति त्या वेळां ॥ रावण मारूनि इंद्र सोडविला ॥ सकळ देवांसहित ॥७३॥
तेचि कृष्णावतारी गोपाळ ॥ कोणी यादव झाले प्रेमळ ॥ कंसादि दैत्य निर्दाळूनि सकळ ॥ गोब्राह्मण रक्षिले ॥७४॥
आतां बुद्धावतार धरून ॥ उगाचि निवांत राहिलों जाण ॥ तुम्हांवांचूनि माझें कीर्तन ॥ जनांसी श्रवण कोण करवी ॥७५॥
तुम्हांलागीं मी झालों सगुण ॥ येरवीं मज पुसतें कोण ॥ भक्तांवांचूनि मजकारणें ॥ कोणी जिवलग दिसेना ॥७६॥
ऐसें बोलतां कमळावर ॥ भक्त करिती जयजयकार ॥ म्हणती तूं दीनदयाळ ईश्वर ॥ कळलें साचार आम्हांसी ॥७७॥
सूर्यापासाव जैसे किरण ॥ कीं मृत्तिकेपासाव सुवर्ण ॥ तैसे आम्ही भक्तजन ॥ तुझेनि संपन्न श्रीहरी ॥७८॥
कीं पुष्पांपासूनि मकरंद वृक्ष जाण ॥ कीं आकाशीं असे तारागण ॥ तैसे आम्ही भक्तजन ॥ तुझेनि संपन्न श्रीहरी ॥७९॥
तंतूपासूनि पट जाण ॥ कीं दीपापासूनि प्रभा घन ॥ तैसे आम्ही भक्तजन ॥ तुझेनि पावन श्रीहरी ॥८०॥
जीवनापासोनि जळचरें जाण ॥ कीं पुष्पांपासूनि मकरंद पूर्ण ॥ तैसे आम्ही भक्तजन ॥ तुझेनि थोर दिसतसों ॥८१॥
सुवर्णापासाव जैसें कंकण ॥ आकाशापासाव निघे पवन ॥ तैसे आम्ही भक्तजन ॥ तुझेनि सगुण झालों कीं ॥८२॥
वोडंबरियाचीं बाहुलीं ॥ नाचवित्याचेनि सूत्रें नाचलीं ॥ तैसी लंका घेवविली ॥ आम्हांहातीं रघुवीरा ॥८३॥
पांवा ध्वनि मधुर बोलिला ॥ परी वाजविल्याचेनि वाजला ॥ तैसाचि कृष्णावतारीं करविला ॥ आमचे हातें प्रताप ॥८४॥
तुझ्या इच्छेनें सकळिक ॥ होती जाती ब्रह्मादिक ॥ अनंत ब्रह्मांडें देख ॥ घडिसी मोडिसीं स्वइच्छें ॥८५॥
आतां आम्हांसी ज्या रीतीं ॥ आज्ञा करिशील श्रीपती ॥ तसे जाऊनि सत्वरगतीं ॥ जन भक्तीसी लावूं कीं ॥८६॥
ऐसें ऐकोनि कमळावर ॥ उद्धवासी बोले प्रत्युत्तर ॥ शिंपियाचे वंशीं अवतार ॥ नामदेव तूं होई ॥८७॥
पंढरी क्षेत्र भूमंडळीं ॥ अवतार धरूनि तयें स्थळीं ॥ माझी अनंत नामावळी ॥ जनांसी श्रवण करावावी ॥८८॥
रामकृष्णादि अवतार घेउनी ॥ जीं चरित्रें दाविलीं तुम्हांलागुनी ॥ तीं जनांचिये श्रवणीं ॥ सर्व तुवां पाडावीं ॥८९॥
कलियुगांमाजी एक ॥ माझें नाम आहे तारक ॥ ऐसें सांगे रमानायक ॥ उद्धवासी ते वेळी ॥९०॥
शुक्रासी सांगे हृषीकेशी ॥ त्वां अवतरावें अविंधवंशीं ॥ अयोनिसंभव जन्म तुजसी ॥ निश्चयेंसीं देईन ॥९१॥
निमित्तमात्र जाऊनि तेथ ॥ होई माझा कबीर भक्त ॥ नाममहिमा अति अद्भुत ॥ प्रकट त्वरित करावा ॥९२॥
मग वाल्मीकासी म्हणे जगन्निवास ॥ तूं ब्राह्मण होईं तुलसीदास ॥ निजभक्तिप्रेमा अति विशेष ॥ दाखवीं जनांसी कलियुगीं ॥९३॥
शतकोटि रामायण ॥ तूं भविष्य बोलिलासी पुरातन ॥ तोचि महिमा प्राकृत करून ॥ लावीं जन भक्तीसी ॥९४॥
दारुका तूं डाकुरासी ॥ रामदास ब्राह्मण होईं त्वरेंसीं ॥ मी द्वारकेहून तुझे भक्तीसी ॥ धांवून येईन सत्वर ॥९५॥
शंकरासी सांगे विश्वकर्ता ॥ तुम्हीं व्हावें नरसीमेहता ॥ जुनागढीं भक्तिमार्गकथा ॥ जनां समस्तां ऐकवीं ॥९६॥
तुम्हीं पुढें व्हावें सत्वरें ॥ मीही मागून येतों त्वरें ॥ ज्ञानेश्वररूपें निर्धारें ॥ अर्थ गीतेचा सांगेन ॥९७॥
ब्रह्मा होईळ सोपान ॥ सदाशिव निवृत्ति पूर्ण ॥ आदिमाया मुक्ताईरूपें जाण ॥ अवतरेल भूमंडळीं ॥९८॥
ऐसें बोलतां वनमाळी ॥ जयजयकारें पिटिली टाळी ॥ देवीं पुष्पवृष्टि केली ॥ आनंदले निर्जर ॥९९॥
म्हणती धन्य आजिचा दिन ॥ आम्हांवरी तुष्टला जगज्जीवन ॥ आतां मृत्युलोकीं अवतार घेऊन ॥ उद्धार करूं आपला ॥१००॥
वैकुंठ कैलासाहूनि अधिक ॥ आह्मांस दिसतो मृत्युलोक ॥ पापपुण्य तेथें पिक ॥ यज्ञयागादिक हवनें ॥१॥
कर्मभूमीस सुकृत केलें ॥ तें स्वर्गलोकीं सर्व वेंचलें ॥ मागुती लोटून दिधलें ॥ कर्मभूमीस पुढती पैं ॥२॥
मृत्युलोकीं जोडती हरिचरण ॥ मृत्युलोकीं जोडे वैकुंठभुवन ॥ येथें जन्मतां हरिकीर्तन ॥ श्रवणीं पडे सर्वांच्या ॥३॥
म्हणऊनि कर्मभूमीसी अवतार ॥ अवधे घेऊं निर्जर ॥ ऐसें बोलूनि सत्वर ॥ सुरवर इंद्रभुवनीं गेले ॥४॥
आतां करावया विश्वोद्धार ॥ अवतार घेतील वैष्णववीर ॥ त्यांचीं चरित्रें सविस्तर ॥ ऐका सादर निजकर्णीं ॥५॥
नातरी ऐसें म्हणाल मनीं ॥ या कथा नाहींत व्यासोक्तपुराणीं ॥ हा विकल्प चित्तांत आणुनी ॥ संशयवनीं पडाल ॥६॥
तरी भविष्योत्तरपुराणांत ॥ स्वयें बोलिला पराशरसुत ॥ कीं कलियुगीं अवतार घेतील भक्त ॥ नीच योनींत स्वलीलें ॥७॥
अघटित चरित्रें दावूनि जनीं ॥ स्वाधीन करतील चक्रपाणी ॥ नाममहिमा प्रकट करूनी ॥ सिद्धांतज्ञानीं निमग्न ॥८॥
ते हे निजभक्त वैष्णवजन ॥ कोणता अवतार घेतील कोण ॥ त्यांचें सविस्तर झालें कथन ॥ तें परिसा सज्जन निजप्रीतीं ॥९॥
पुढिले अध्यायीं निरूपण ॥ श्रीजयदेवचरित्र अतिपावन ॥ महीपति ह्मणे अवधान ॥ संतसज्जनीं मज द्यावें ॥११०॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ प्रथमाध्याय रसाळ हा ॥१११॥
ओंव्या ॥१११॥ अध्याय ॥१॥    ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीभक्तविजय प्रथमाध्याय समाप्त ॥