मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:57 IST)

मल्हारी मार्तंड विजय अध्याय अकरावा

॥ श्री मार्तंड भैरवाय नम: ॥ आपुलें अपजय पाहोन ॥ मल्ल जाहला क्रोधायमान ॥ तों तितक्यांत खड्गदंष्ट्‍ येवोन ॥ मल्लाप्रति बोलतसे ॥१॥
म्हणे तव कृपें कडोन ॥ शत्रूस आज मारीन ॥ विजय दळीं गाजवीन ॥ पराक्रम पाहें माझा ॥२॥
ऐसें बोलोनि दैत्य ॥ निघाला दळासमवेत ॥ पंचदक्ष घोडे दशलक्ष रथ ॥ वीस लक्ष गजसेना ॥३॥
दैत्य आला पाहोन ॥ सांबें आज्ञापिला षडानन ॥ चतुरंग सेना मेळवोन ॥ षडानन सिध्द जाहला ॥४॥
दैत्य म्हणे रे षण्मुखा ॥ तूं युध्दासि नव्हेसी निका ॥ लोणी खायेरे बालका ॥ निघोनि जाय ॥५॥
ऐसे शब्द ऐकोन ॥ षडानन क्रोधें करुन ॥ सोडिता झाला सहस्त्र बाण ॥ खड्गदंष्ट्र दैत्यावरी ॥६॥
सहस्त्र बाण सांवरोन ॥ दैत्यें सोडिले सहस्त्रावधी बाण ॥ तें पाहोनि षडानन ॥ शक्तीकडोनि वारिलें ॥७॥
गगनीं मयोर उडवोन ॥ गज वधिला षडाननें ॥ दैत्य होवोनि क्रोधायमान ॥ रथकुंडल विध्वंसिले ॥८॥
घालोनि बाणजाळ ॥ षडानन केला व्याकुळ ॥ कोपोनि पार्वती बाळ ॥ दिव्य शक्ति काढिली ॥९॥
शक्ति ओपिली षडाननें ॥ दैत्यें वारिली कटाक्षें कडोन ॥ परी नावरतां हृदयीं येवोन ॥ भेदितांचि प्राण गेला ॥१०॥
खड्गदंष्ट्र गतप्राण पाहोन ॥ पळो लागलें त्याचें सैन्य ॥ षण्मुखाची सेना धावोन ॥ दैत्यदळासी मारिलें ॥११॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१२॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां खड्गदंष्ट्रवधनो नाम एकादशोऽध्याय गोड हा ॥११॥