मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:57 IST)

मल्हारी मार्तंड विजय अध्याय तेरावा

॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मणी म्हणे मल्लास ॥ आजीचा हा सुदिवस ॥ रणीं भिडेन सांबास ॥ देह पुनीत करीन मी ॥१॥
सिंहनाद केला मणीं ॥ किरिट कुंडल झळके कणी ॥ छत्र शोभे नीळवर्णी ॥ वीस हात जयासी ॥२॥
मणि आला युध्दासी ॥ सांब सांगे दैत्यासी ॥ आज वधीन दुष्टासी ॥ म्हणोनि रणीं सरसावला ॥३॥
मणिं महादेवास म्हणत ॥ तूं युध्दासि आलासि येथ ॥ आज जिंकीन मी त्वरित ॥ पाहि रे कपर्दिका ॥४॥
सांबानी गदा मारिली ॥ मणी म्हणे तुझी शक्ति गेली ॥ सांबानें सहस्त्रशक्ति सोडिली ॥ तेहि दैत्य तोडोनि टाकी ॥५॥
मणिनें सोडिले सहस्त्र बाण ॥ सांबें हुंकारें केलें दहन ॥ देवानें मुकुटावरी बाण ॥ सोडिले तेव्हां रत्नें गळति ॥६॥
क्रोधें मणिं धांवला ॥ देवें चंद्रमुख बाणें शिर उडविला ॥ शरभ रुप धरुनि भुजा चाविला ॥ कार्तिक आयुधें मारिलें ॥७॥
आयुध मुखें धरिलें नंतरी ॥ शूळानें मारिलें पाठीवरी ॥ तेव्हांचि हयरुप धरीं ॥ अर्धचंद्रबाणें छेदिला ॥८॥
पुन्हां गजमुख जाहला ॥ कुराडीनें मस्तकीं मारिलां ॥ खड्गासह अश्वावरी स्वार जाहला ॥ बाणवृष्टि करुं लागे ॥९॥
मार्तंड ब्रह्मास्त्र सोडिलें ॥ तेणें अश्वासह व्याकुल पडले ॥ ते स्थळीं तुरंगाख्य तीर्थ जाहलें ॥ पुनीत जन पाहती ॥१०॥
सांबास सर्वांगी बाण भेदले ॥ तेणें बहुत क्रोध आले ॥ शूलाने मणीस मारिलें ॥ पाय धरी मणी त्वरित ॥११॥
मस्तक ठेवोनि चरणी ॥ स्तवन करितां झाला मणी ॥ नमो नमो जी शूलपाणी ॥ त्रिपुरांतका ॥१२॥
नमो भूतनाथा सर्वांतयामीं ॥ नमो नागभूषणा कैलास स्वामी ॥ नमो नीलकंठ पशुपते नामि ॥ दीनवत्सला तुज नमो ॥१३॥
मार्तंड म्हणे जाहलों प्रसन्न ॥ काय मागतोस वरदान ॥ ते मीं तुज देईन ॥ माग मणी दैत्यसुता ॥१४॥
मणी म्हणे हेंचि देई ॥ हें मस्तक असो तुझे पायीं ॥ अश्वरुपासहित राही ॥ अवश्य म्हणे मार्तंड ॥१५॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१६॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मणिकासुरवधनो नाम त्रयोदशोऽध्याय गोड हा ॥१३॥