श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी
महासंग्रहकार आणि संत तुकारामांचे प्रमुख टाळकरी आणि अभंग गाथेचे लेखक महान संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला आणि ते १६८८ मध्ये अनंतात विलीन झाले. तसेच महाराजांची पुण्यतिथी मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशीला येते यावेळेस ही तिथी १७ डिसेंबर २०२५ रोजी आहे.
श्री संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांचे प्रमुख टाळकरी आणि अभंग गाथेचे लेखक होते. ते तेली समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या जन्म ८ डिसेंबर १६२४ पुणे जिल्ह्यातील चाकण किंवा सुदुंबरे गावी झाला. संताजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे संकलन करून वारकरी संप्रदायाला मोठे योगदान दिले. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्यभरात दिंडी, कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी या तिथीला असते. संताजी महाराजांनी देह ठेवल्याची तारीख इ.स. १६८८ साली मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी होय.
तसेच महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये, विशेषतः सुदुंबरे जि. पुणे येथील त्यांच्या समाधी मंदिरात, तिथीनुसार पुण्यतिथी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. श्री संत संताजी जगनाडे महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे निष्ठावान शिष्य होते.
संताजी महाराजांचे महान कार्य
संताजी जगनाडे महाराज यांचे सर्वात मोठे आणि अविस्मरणीय योगदान म्हणजे त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा सुरक्षित ठेवली. ते संत तुकाराम महाराजांच्या १४ प्रमुख टाळकऱ्यांपैकी (झांझ वादकांपैकी) एक होते. त्यांनी संत तुकारामांनी सांगितलेले अभंग लिहून काढण्याचे आणि त्यांचे संकलन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्यात आल्यानंतर, संताजी महाराजांनी आपले अत्यंत कष्ट घेऊन, आपल्या स्मरणात असलेले आणि इतरांनी लिहून ठेवलेले अभंग पुन्हा मिळवून, तुकाराम गाथा पुन्हा लिहून जतन केली. त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच आज तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहोचू शकले. तसेच ते जातीने तेली होते, त्यामुळे त्यांना 'संतु तेली' या नावानेही ओळखले जात असे. त्यांनी तेली समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रबोधनासाठी मोठे कार्य केले.
तुकोबारायांशी असलेले नाते
एका आख्यायिकेनुसार, संत तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना वचन दिले होते की, त्यांच्या अंत्यसमयी ते स्वतः मूठमाती देण्यासाठी नक्की येतील. संताजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजे १६८८ साली त्यांच्या देहाला मूठमाती दिली जात असताना, कितीही माती टाकली तरी त्यांचा चेहरा झाकला जात नव्हता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या वचनानुसार तीन मुठी माती टाकली, त्यानंतर संताजी महाराजांचा देह पूर्णपणे झाकला गेला आणि ते समाधिस्त झाले.
Edited By- Dhanashri Naik