रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 10 जानेवारी 2023 (13:29 IST)

मंगळवारची अंगारकी चतुर्थी कथा Angarki Sankashti Chaturthi 2023 Vrat Katha

chturthi
मंगळवारची संकष्टी चतुर्थी "अंगारकी" म्हणून का संबोधिले जाते ह्या बाबतची उपयुक्त माहिती जाणून घ्या.
आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी  उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति श्रीगणेशा ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदया नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो.
 
परंतु हीच संकष्टी जेंव्हा मंगळवारी  येते तेंव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही तितकीच रंजक आहे. 
 
कृतयुगात अवंती नगरीत  वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. 
 
ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. 
 
त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो  दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थी चा. 
"स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान " त्यानं प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितीला.
 
यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, "ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी  केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील". 
 
"अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस  म्हणून अंकाकर  व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून  मंगळ ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या  आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील". 
 
त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून अंगारकी चतुर्थीला  अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी  केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. 
 
म्हणूनच उद्याच्या मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली वहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्वाचे ईप्सित कामे मार्गी लागण्यासाठी, इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी. 
 
कारण उद्या ब्रम्हांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी कैक सहस्र पटीने पृथ्वी कडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी धरणाऱ्यांस त्या पुण्यलहरींचा त्याला निश्चितच फायदा होतो हे मी स्वानुभवाने सांगतो. 
 
आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणुन, चंद्रदर्शन  करुनच उपवास सोडावा.
तसेच हेही ध्यानात असु द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने  कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये.
 
कारण मुळातच बाप्पा ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशा नुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केंव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच. 
गणेश अंगारकी श्लोक
गणेशाय नमस्तुभ्यं, 
सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं, 
गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश, 
अंगारकाय नमोऽस्तुते ॥