- धर्म
» - हिंदू
» - हिंदू धर्माविषयी
कहाणी बुधबृहस्पतीची
ऐका बुधबृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होत. तिथे एक राजा होता. त्याला सात मुलं होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगतात. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्रय आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, असतं दर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिने विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही, ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली, त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे, आता आम्ही पूर्वीसारखी होऊ, असा काही उपाय सांगा! ते म्हणाले, श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्याचीं मनोभावे पूजा करावी, अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात! त्याप्रमाणं ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी
तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावयाचं नाही. म्हणून तेथील लोकांनी हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत माळ घालेल, त्याचे राज्याभिषक होईल अशी दवंडी पिटवली. हंत्तिणीनं ह्या बाईच्या नवर्याच्या गळ्यांत माळ घालती. मंडळींनी त्याला हाकून दिलं. पुन्हा हत्तीणीला फिरवल, पुन्हां त्याच्याच गळ्यात माळ घालती. याप्रमाणे दोनदा झालं, पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली.
मग राजाने मोठ्या तलावाचं काम सुरू केल हजारो मजूर खपू लागले. तिथे त्याची माणसं आली. राजाने आपली बायको ओळखली, मनामध्ये संतोष झाला. तिनं बुधबृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवाने देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजाने ती गोष्ट मनात ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला, हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं, तूप वाढ सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले, जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला, मुलंबाळं झाली, दु:खाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुधबृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हाआम्हांवर करोत! ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.