परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. गमदग्नी व रेणुकामाता यांच्यापोटी यांचा जन्म झाला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना शरादपि शापादपि असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच देणार्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्त्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांचा उल्लेख सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणार्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर आपल्याकडील धश्रुष्य त्यांनी रामाला भेट दिले. पुढे त्यांनी भिष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हारले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला. कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढ्याच रंजक. असं म्हणतात की कोकणाच्या भुप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्रच्या योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतात परशुराम क्षेत्रे आहेत. केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगत. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूनपासून 4 कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फुट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असेच म्हणतात. मंदिराच्या रचनेमध्ये मुगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात.
उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी, एकदा या बेगमेची ताटवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की ताटवे परत आल्यास देऊळ बांधीन, त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरुपपणे किनार्याला लागली आणि परशुमरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला. या मंदिरामध्ये काळ, काम अमाणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मुर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे, मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव.
अक्षयतृतियेपासून सुरु होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सानिमित्त किर्तन, भजनाचे कार्य आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकर्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशिर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडावर येतो. त्यामुळे मार्गशिर्ष एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी येथे दर्शनाला येतात. कोकणाचा सर्वांग सुंदर निसर्ग, दुरवर दिसणारी कौलारु घरांची चित्रमय रचना असलेली गावं या सुंदर देखाव्याच्या पाश्वभूमीवर स्वाभिमानाची, निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणारे परशुरामाचे मंदिर.