वटपौर्णिमेची कथा
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
पूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा एक परम धार्मिक व प्रजापालन तत्पर असा राजा होऊन गेला. त्याला सर्व सुखे होती पण पोटी संतान नसल्यामुळे तो फार दु:खी होता. त्याने उग्र तपश्चर्या करून ब्रह्मपत्नी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. तिने राजाला 'तुला सर्वगुणसंपन्न, तेजस्वी व लावण्यवती कन्या होईल' असा वर दिला. त्याप्रमाणे राजाला कन्या झाली. सावित्रीच्या कृपाप्रसादाने झाली म्हणून राजाने तिचे नाव सावित्री ठेवले. होता होता सावित्री मोठी झाली. पण तिच्या गुणसंपदेने व तेजस्वीपणामुळे दिपून कोणी राजपुत्र तिला वरायला तयार होईना. तेव्हा राजाज्ञेने ती स्वत:च राजपुरोहिताबरोबर वरसंशोधनार्थ बाहेर पडली. शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान याला तिने पसंत केले. द्युमत्सेन अंध होता व शत्रूंनी राज्यभ्रष्ट केल्यामुळे तो आपली पत्नी व एकुलता एक मुलगा यांच्यासह अरण्यात राहत होता.सत्यवानाला मनाने वरून सावित्री घरी परतली, त्यावेळी नारदमुनी तिथे आलेला होता. सावित्रीने सत्यवानाची निवड केली हे ऐकून नारदाला दु:ख झाले. तो अश्वपतीला म्हणाला, 'सत्यवान अल्पायुषी असून, आजपासून एका वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे. तेव्हा सावित्रीने दुसरा वर निवडावा.' पण सावित्री आपल्या निवडीबाबत अढळ राहिली. तेव्हा तिला अशीर्वाद देऊन नारद निघून गेला.त्यानंतर अश्वपतीने सावित्रीचा सत्यवानाशी विवाह करून दिला. सावित्रीने मग उंची वस्त्राभरणांचा त्याग केला व ती साधी वस्त्रे नेसून राहू लागली. सासूसासरे व पती यांची सेवा करण्यात ती आपला दिवस घालवू लागली. सत्यवानाचा मृत्यू चार दिवसांवर येऊन ठेवला, तेव्हा सावित्रीने त्रिरात्र सावित्रीव्रत करण्याचा संकल्प केला. व्रताचे तीन दिवस संपले व चौथा दिवस उजाडला. हाच सत्यवानाचा मृत्यूदिन होता. त्यादिवशी सत्यवान दर्भ व काष्ठे आणण्यासाठी वनात गेला, तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. सरपणासाठी लाकडे तोडीत असता एकाएकी सत्यवानाचे डोके दुखू लागले, म्हणून सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ निजला. तेवढ्यात यमदूत त्याचे प्राण हरण करण्यासाठी तेथे आले. पण सावित्रीच्या तेजामुळे ते सत्यवानाचे प्राण हरण करु शकले नाहीत. तेव्हा यमधर्म स्वत: तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण खेचून घेऊन जाऊ लागला. सत्यवानाच्या शवाला कोणी स्पर्श करून नये, म्हणून ती तजवीज करून सावित्रीही यमधर्माच्या मागून निघाली. यमधर्माने तिला परत जायला सांगितले, तरी ती परत फिरली नाही. हळूहळू यमाशी युक्तिवाद करून तिने सासर्याचे डोळे आणि गेलेले राज्य परत मिळविले. तसेच सत्यवानाचे प्राणही परत मिळविले. सर्वांना आनंद झाला. सावित्रीने यथाविधी पारणा व व्रताचे उद्यापन केले. त्यानंतर अनेक वर्षे राज्योपभोग, ऐश्वर्य, पुत्रप्राप्ती इ. सुखे भोगून शेवटी ती दोघे स्वर्गाला गेली.
भरत खंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध आहेत. पण त्यात सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. एखाद्या सुवासिनीने दुसर्या स्त्रीला नमस्कार केला असता, ती 'जन्मसावित्री हो' असाच आशीर्वाद तिला देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीचे अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे.बंगालमध्ये वटसावित्रीव्रत करण्याची रित थोडी वेगळी आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्या प्रसंगी पतीच्या अंगाला सुंगधी तेल व चंदनाची उटी लावतात, त्याच्या गळ्यात फुलांचा हार घालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. याव्यतिरिक्त, त्या यमाचीही पूजा करतात आणि त्याला फुले, फळे व वडाची डहाळी अर्पण करतात.