गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (16:19 IST)

'अत्याचार केल्यावर त्यानं म्हटलं की, तुझ्या शरीरातला जिन बाहेर काढायला मी हे केलं'

rape
अरब जगतात आणि मुस्लिमांमध्ये 'आध्यात्मिक उपचार' ही सामान्य प्रथा आहे.
जे लोक अशा आध्यात्मिक उपचारांचा दावा करतात त्यांच्याकडे उपचारासाठी जाणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अधिक असतं.
 
त्यांना असं वाटतं की, वाईट शक्तीची सावली पडल्यामुळे आपल्याला जो आजार झालाय त्यातून हे लोक आपल्याला बरं करू शकतात.
 
बीबीसी अरेबिकने महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि शोषण करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.
 
बीबीसी अरेबिकने गेल्या वर्षभरात 85 महिलांशी संवाद साधला. या महिलांनी मोरोक्को आणि सुदानमधील आध्यात्मिक उपचार करणार्‍या 65 जणांची माहिती दिली आहे. या उपचार करणाऱ्या लोकांनी महिलांवर बलात्कार केल्याचे, त्यांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.
 
बीबीसीने या पीडित महिलांच्या गोष्टी शोधण्यात त्या पडताळण्यात आणि एनजीओ, न्यायालये, वकील यांच्याशी बोलून अनेक महिने काम केले आहे.
 
बीबीसीच्या एका महिला पत्रकाराने उपचार घेण्याच्या बहाण्याने अशाच एका वैद्याला गाठलं. या व्यक्तीने बीबीसीच्या पत्रकारावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण तिथून निसटून जाण्यात त्या यशस्वी झाली.
 
काही वर्षांपूर्वी दलाल नावाची एक मोरक्कन स्त्री नैराश्याच्या गर्तेत सापडली होती. उपचारासाठी ती कॅसाब्लांका जवळील एका गावात आध्यात्मिक उपचार करणाऱ्याकडे गेली. त्यावेळी ही महिला अंदाजे 25 वर्षांची होती
आध्यात्मिक उपचार करणाऱ्याने दलालला सांगितलं की तिला 'प्रेमी जिन'ने पछाडलंय.
 
त्याने दलालला खाजगीत भेट घ्यायला सांगितली आणि तिला एक वस्तू हुंगण्यास दिली. त्यानंतर दलाल बेशुद्ध पडली. तिच्यामते ते एखादं बेशुद्ध करणारं औषध असावं.
 
दलालला तोपर्यंत शारीरिक संबंधांचा अनुभव नव्हता. तिने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला समजलं की तिच्यावर बलात्कार झाला आहे, ती विवस्त्र अवस्थेत होती.
 
स्थानिक भाषेत 'राकी' असं म्हटलं जाणाऱ्या त्या व्यक्तीवर दलाल खूप चिडली, तिने त्याच्यावर आरडाओरड केली.
 
दलाल त्याला म्हणाली की, "माझ्यासोबत हे करताना तुला लाज वाटली नाही का?"
 
यावर तो दलालला म्हणाला की, तुझ्या शरीरातून जिन बाहेर काढण्यासाठी मी हे सगळं केलं.
 
दलालने हा प्रसंग कोणालाच सांगितला नाही. कारण सुरुवातीला तिला लाज वाटली आणि दुसरं म्हणजे यावर तिलाच दोष दिला जाईल याची तिला खात्री होती.
 
काही आठवड्यांनंतर ती गरोदर राहिली तेव्हा तिला धक्काच बसला. स्वतःला संपवून टाकावं असं तिच्या मनात आलं
 
आपण गरोदर आहोत असं तिने त्या राकीला जाऊन सांगितलं. त्यावेळी त्याने या प्रकरणातून हात काढून घेत याला जिन जबाबदार असल्याचं सांगितलं. यामुळे दलाल आणखीनच घाबरली. जेव्हा मूल झालं तेव्हा तिने त्याच्याकडे पाहण्यासही नकार दिला.
 
मुलाचं नावही ठेवलं नाही आणि ते बाळ दुसऱ्या व्यक्तीला दत्तक म्हणून देऊन टाकलं.
 
दलालने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जर तिच्या कुटुंबीयांना याविषयी समजलं असतं तर त्यांनी तिची हत्या केली असती.
 
बीबीसीला मुलाखत दिलेल्या अनेक महिलांनी सांगितलं की, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची त्यांनी कुठे वाच्यता केली असती तर त्यांनाच दोषी ठरवलं असतं. त्यामुळे फार कमी महिलांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे किंवा पोलिसांत तक्रार दिली.
 
काही महिलांना तर अशी भीती वाटत होती की, जर मी तक्रार केली तर जिन जास्तच चिडेल आणि त्यांचा बदला घेईल.
 
सुदानमधील सवसान नावाच्या महिलेने तिची कर्मकहाणी बीबीसीला सांगितली.
 
सवसानचा नवरा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहायला गेला आणि ती निराधार झाली. मदतीसाठी तिने अशाच एका राकीची मदत घेतली.
 
सवसानला आशा होती की तो राकी तिला असं काहीतरी औषध देईल ज्यामुळे तिचा नवरा तिच्याकडे परत येईल.
 
पण त्याने सवसानला उपचाराची जी पद्धत सांगितली ती तिला अजिबातच अपेक्षित नव्हती.
 
सवसान सांगते, "त्याने मला सांगितलं की आपल्या दोघांना शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. त्यातून जे वीर्य बाहेर पडेल त्याचं औषध तयार करून मी देईन. तुला ते तुझ्या पतीला पाजावं लागेल."
 
सवसान पुढे सांगते की, त्याने ज्या पद्धतीने मला हे सांगितलं त्यावरून त्याला कशाचीही भीती नव्हती असं वाटलं.
 
"त्याला खात्री होती की मी याबाबत पोलिस, न्यायालय किंवा माझ्या पतीला काही सांगणार नाही."
 
सवसानने ताबडतोब ते ठिकाण सोडलं आणि तिला आलेला हा अनुभव तिने कोणालाही सांगितला नाही.
 
बीबीसीने सुदानमधील 50 महिलांशी संवाद साधला. त्यातील सवसान आणि आणखीन तीन महिलांनी शेख इब्राहिम नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलं.
 
यातल्या एका महिलेला स्वतःचं नाव उघड करण्याची इच्छा नाही. मात्र तिने सांगितलं की, शेख इब्राहिमने तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.
 
अफाफ नावाच्या आणखी एका महिलेने सांगितलं की, शेख इब्राहिमने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला मागे ढकललं. त्यावेळी अफाफ पूर्णपणे असहाय्य होती.
 
तिने बीबीसीला सांगितलं की, "शेख इब्राहिम हे करू शकतो यावर लोकांचा विश्वास बसत नाही. कोणाचाही यावर पूर्ण विश्वास बसणार नाही. माझ्या बाजूने बोलण्यासाठी मी कोणता साक्षीदार उभा करणार होते? खोलीत मी त्याच्यासोबत एकटीच होते."
 
बीबीसीची शोध पत्रकार शेख इब्राहिमच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यास तयार झाली.
 
आम्ही त्या महिला पत्रकाराला रीम हे नाव दिलं. रीमने शेखला सांगितलं की, तिच्या पदरी मूलबाळ नाहीये.
 
मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो असं शेख इब्राहिम तिला सांगितलं आणि बाटलीत थोडं पाणीही दिलं. या पाण्याला 'महाय्य' म्हणतात. रीमला हे पाणी घरी नेऊन प्यायला सांगितलं.
 
रीम सांगते की त्यानंतर शेख तिच्या जवळ आला आणि बसला. त्याने रीमच्या पोटावर हात ठेवला. रीमने हात काढायला सांगितल्यावर त्याने हात थोडा पुढे सरकवला. रीमने तिथून लगेचच पळ काढला.
 
रीमने नंतर सांगितलं की, "मी पूर्णपणे हादरले होते. त्याचे डोळे आणि चेहरा बघून मला खूपच भीती वाटली."
 
रीम सांगते की, शेखच्या कृतीवरून तरी असं वाटत नाही की तो हे सगळं पहिल्यांदाच करत असावा.
 
बीबीसीने शेख इब्राहिमशी संपर्क केला आणि रीम सोबत झालेल्या हरकतींवर प्रश्न विचारले.
 
मदत मागण्यासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचंही त्याने नाकारलं आणि लगेचच मुलाखत देणं थांबवलं.
 
अशा लोकांच्या फंदात न पडण्याचा सल्ला शेख फातिमा देतात.
 
फातिमाने सुदानची राजधानी खार्तूम येथे महिलांसाठी एक आध्यात्मिक केंद्र उघडलं आहे. गेल्या 30 वर्षांपासून त्या या ठिकाणी महिलांवर उपचार करत आहेत.
 
बीबीसीने या केंद्राला भेट दिली. या केंद्रात महिलांना पाहणं हा वेगळाच अनुभव होता.
 
काही महिला वेड्या झाल्या होत्या. शेख फातिमा सांगतात की, आध्यात्मिक उपचार करणारे स्त्रियांच्या अशा मन:स्थितीचा फायदा घेतात.
 
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अनेक महिलांनी मला सांगितलं की, शेख त्यांना स्पर्श करून भूत काढतो. हा उपचाराचा भाग आहे असं त्यांना वाटतं. या महिलांनी सांगितलेले किस्से थक्क करणारे आहेत."
 
बीबीसीने याबाबत मोरोक्को आणि सुदानमधील राजकीय नेतृत्वाशी बोलण्याचा प्रयत्न केला.
 
सुदानमधील डॉ. अला अबू झैद देशाच्या इस्लामिक व्यवहार विभागात काम करतात.
 
त्यांनी मान्य केलंय की, आध्यात्मिक उपचार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा कोणताही मार्ग सध्या तरी उपलब्ध नाहीये. त्यामुळेच हे लोक मोठा उपद्रव ठरत आहेत. ज्या लोकांकडे कोणतेच कामधंदे नाहीयेत तेच असल्या कामात गुंतलेले आहेत.
 
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांनी यापूर्वीही या प्रकारच्या गोष्टींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देशात जी अस्थिरता आहे त्यामुळे ते शक्य झालं नाही.
 
मोरोक्कोचे इस्लामिक व्यवहार मंत्री अहमद तौफिक यांनी सांगितलं की, यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज आहे असं त्यांना वाटत नाही.
 
अहमद तौफिक सांगतात, "अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर हस्तक्षेप करणं कठीण आहे. लोकांमध्ये धर्माविषयी जागरूकता निर्माण करणं हाच यावरचा उपाय आहे."
 
इतके पुरावे गोळा करूनही मोरोक्कन आणि सुदानी अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
 
अशा परिस्थितीत या धंद्यात असलेल्या लोकांविरुद्ध बोलण्याचं ओझं केवळ महिलांच्या खांद्यावर आहे.
 


Published By- Priya Dixit