गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 22 जुलै 2024 (18:14 IST)

निवडणूक जिंकण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प भारतावर बरसले

डोनाल्ड ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी भारताच्या अनेक धोरणांवर आक्षेप व्यक्त केला होता.आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी भारताला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आता ही वेगळी गोष्ट आहे की, भारतातल्या काही हिंदू संघटनांना ट्रम्प अगदीच जवळचे वाटतात. पण ट्रम्प यांनी मात्र भारतावर आक्षेप व्यक्त करण्यास सुरुवात केलीय.ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असून ते सध्या प्रचारात व्यग्र आहेत
 
गेल्याच आठवड्यात मिशिगनमधील एका निवडणूक रॅलीत ट्रम्प यांनी चीनबद्दल बोलताना भारताच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली होती.
ट्रम्प म्हणाले की, "तुम्हाला चीनमध्ये काही बनवायचे असेल तर आम्ही इथे काही वस्तू बनवाव्यात आणि त्या तिथे पाठवाव्यात असं त्यांना वाटतं आणि मग ते तुमच्यावर 250 टक्के आयात शुल्क लादतील. आम्हाला हे नको आहे. मग तुम्हाला येऊन तुमचा प्लांट लावण्याचे आमंत्रण मिळते. मग या कंपन्या तिथे जातात."
 
यानंतर ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख करत म्हटलं की, "भारताने हार्ले डेव्हिडसनसोबतही असाच प्रकार केला. 200 टक्के आयात कर लागू केल्यामुळे हार्ले डेव्हिडसन त्यांच्या दुचाकींची विक्री करू शकलं नाही."
 
ट्रम्प भारताविषयी आणखीन काय म्हणाले?
निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या एका सभेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, "हार्ले डेव्हिडसनचे प्रमुख मला व्हाईट हाऊसमध्ये भेटले. त्यांनी मला जे काही सांगितलं ते ऐकून मी खूप निराश झालो."
हार्ले-डेव्हिडसन ही जगातील प्रसिद्ध दुचाकी बनवणारी कंपनी आहे. या कंपनीच्या दुचाकींची किंमत लाखो रुपयांपर्यंत असते. हार्ले डेव्हिडसनच्या मोटारसायकलला 'सुपरबाईक' अशी उपाधी मिळाली आहे आणि जगभरातील श्रीमंतांमध्ये ही मोटारसायकल खूप लोकप्रिय आहे.
 
भारतात हार्ले डेव्हिडसन या कंपनीने 2018 मध्ये, 5 ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या दुचाकी बाजारात आणल्या होत्या.
ट्रम्प म्हणाले की, "मी हार्ले डेव्हिडसन कंपनीच्या प्रमुखाला विचारले की तुमचा भारतात व्यवसाय कसा चालला आहे?"यावर मला उत्तर मिळालं की त्यांचा व्यवसाय ठीक चाललेला नाही. आमच्या गाड्यांवर 200 टक्के शुल्क का आकारला जातो? दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर आम्ही एखादी गाडी विकली तर त्यावर एवढा कर लादला जातो."
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, "मी त्यांना म्हणालो की, जर 200 टक्के आयात शुल्क आकारलं तर तुम्ही तुमची गाडी तिथे विकू शकणार नाहीत. खरंतर भारताने हार्ले डेव्हिडसनला त्यांचा कारखाना उभारण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि ते आमंत्रण स्वीकारून ही कंपनी तिथे गेलीसुद्धा होती. कदाचित तो कारखाना सुरूही झाला असेल, हे देश अशा पद्धतीने काम करत आहे. यासाठी मी भारताला जबाबदार धरणार नाही. हे घडू देण्यासाठी मी स्वतःला आणि माझ्या देशाला जबाबदार धरतो की आपण हे होऊ दिलं. मात्र आतापासून असं होणार नाही."
 
भारत खरोखरच 200 टक्के आयात शुल्क लावतो का?
ट्रम्प यांनी यापूर्वी केलेल्या विधानांवर नजर टाकली तर त्यांनी 2017 ते 2024 पर्यंत वेगवेगळ्या शुल्क आणि करांबद्दल भाष्य केलं आहे. 2017 मध्ये ट्रम्प यांनी हा मुद्दा पहिल्यांदा अमेरिकन काँग्रेससमोर मांडला होता.
 
ट्रम्प यांनी 2018 मध्ये म्हटलं होतं की भारताने या गाड्यांवर 60 ते 75% कर लावणं चुकीचं आहे आणि त्यानंतर नरेंद्र मोदींनी हा कर 50% पर्यंत कमी केला होता.
 
2019 मध्येही ट्रम्प म्हणाले होते की, "भारताने अमेरिकन मोटरसायकलवरील शुल्क 100 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे परंतु हे अजूनही खूप जास्त आहे आणि ते स्वीकारलं जाऊ शकत नाही."
 
ट्रम्प म्हणाले होते की,"आमचा देश मूर्ख नाहीये. तुम्ही भारताकडे पहा. नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी काय केलं ते तुम्ही बघा. तिथे मोटारसायकलवर 100% कर लावण्यात आला आहे. आम्ही त्यांच्यावर कोणताही कर लावत नाही. मोदींनी एका फोन कॉलनंतर हा कर 50% कमी केला. हे अजूनही अस्वीकार्य आहे. भारत यावर काम करत आहे."
 
असं असलं तरी 2018च्या एका अहवालात इकॉनॉमिक टाइम्सने असं सांगितलं होतं की भारताला हार्ले डेव्हिडसनची नाही तर हार्ले डेव्हिडसनला भारताची जास्त गरज आहे.
या वृत्तपत्राने जगातील अनेक देशांमध्ये हार्ले डेव्हिडसनच्या विक्रीत घट झाल्याची माहिती या अहवालात दिली होती.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार ट्रम्प ज्यावेळी असं म्हणाले होते की भारत 100 टक्के कर लावतो त्यावेळी हा कर 75 टक्के होता.
ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्याकाळात हार्ले डेव्हिडसनची भारताच्या बाजारातली भागीदारी कमी झाली होती. 2013 मध्ये भारतातील लक्झरी सेगमेंटमध्ये कंपनीचा हिस्सा 92 टक्के होता. 2018 मध्ये हा आकडा 56 टक्क्यांवर आला होता.
 
2018 मध्ये जेव्हा ट्रम्प यांनी हा आरोप केला होता त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. ट्रम्प-मोदी चर्चेसंदर्भात जारी केलेल्या निवेदनातही हार्ले डेव्हिडसनचा उल्लेख नव्हता.
भारताविषयी डोनाल्ड ट्रम्प आणि कोणकोणती विधानं केली आहेत?
2020 मध्ये मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारतात देखील आले होते. त्यावेळी गुजरातमधील मोटेरा स्टेडियमवर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा तिथे भारतीय वंशाच्या लोकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनीही हजेरी लावली होती.
 
या कार्यक्रमाला 'हाऊडी मोदी' असं नाव देण्यात आलं होतं. असं असलं तरी ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावाला साजेशी अशी वेगवेगळी विधानं भारताबद्दल केली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदूषणाबाबत भारतावर निशाणा साधला होता. त्यावेळी भारतातील अनेक शहरांच्या हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) धोकादायक पातळीवर पोहोचला होता.
 
त्यावेळी ट्रम्प म्हणाले होते की, "भारत, चीन आणि रशियाची घाण लॉस एंजेलिसकडे वाहत येत आहे. तुम्हाला माहीत आहे की इथे एक मोठी समस्या आहे. तुलना केली तर आपल्याकडे जमिनीचा एक छोटा तुकडा आहे. चीन, रशिया आणि भारतासारख्या इतर देशांशी तुलना केली तर ते स्वच्छतेसाठी आणि धूर रोखण्यासाठी काहीही करत नाहीत. ते त्यांची घाण समुद्रात टाकत आहेत आणि ती घाण लॉस एंजेलिसकडे वाहत आहे."
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी पाकिस्तानवर 'दहशतवादाला प्रोत्साहन' दिल्याचा आरोप केला होता. भारतानेही पाकिस्तानबाबत नेहमी हीच भूमिका घेतली आहे.
 
भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती पण भारताने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. ट्रम्प यांनी या प्रकरणी चीनला पाठिंबा दिला होता.
अमेरिका चीनला आपला प्रतिस्पर्धी मानते आणि वेळोवेळी इतर मार्गाने चीनला याची जाणीव करून देत असते.
राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा प्रणालीतही अनेक बदल केले होते.
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसला होता.
ट्रम्प आगामी निवडणुकीत विजयी ठरले तर भारताची भूमिका काय असेल?
इंडियन एक्स्प्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ सी राजा मोहन यांनी ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील काही आव्हाने सांगितली आहेत.
 
भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम करू शकणाऱ्या विषयांशी संबंधित पाच आव्हानं या लेखात यांनी सांगितली आहेत. या आव्हानांचा या दोन्ही देशांच्या संबंधांवर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होऊ शकतात.
 
ते पाच मुद्दे खालीलप्रमाणे :
व्यापार आणि आर्थिक जागतिकीकरण
सुरक्षा आणि सहयोगी
लोकशाही आणि हस्तक्षेप
स्थलांतरित आणि खुल्या सीमा
हवामान आणि ऊर्जा
Published By- Priya Dixit