1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (18:47 IST)

कोरोना लस : लहान मुलांना कोरोना लस देणारा 'हा' ठरला जगातील पहिला देश

Corona vaccine: Ha became the first country in the world to vaccinate children against corona
कॅनडा सरकार लवकरच 12 ते 15 वर्ष वयाच्या मुलांचं लसीकरण सुरू करणार आहे. कॅनडाने या वयोगटाच्या मुलांसाठी फायझर लशीला मंजुरी दिली आहे.
 
किशोरवयीन मुलांसाठी कोरोना लशीला मंजुरी देणारा कॅनडा पहिला देश ठरला आहे.
 
या वयोगटातल्या मुलांवर लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचण्यांच्या डेटाच्या आधारे कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
 
याविषयी माहिती देताना कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागारांनी सांगितलं, "या वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे, यावर मंत्रालयाचा ठाम विश्वास आहे."
 
फायझरनेही या वयोगटातील मुलांसाठी लस उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.
 
कॅनडाने 16 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींसाठी फायझरची लस आधीच सुरू केलेली आहे.
कॅनडातील अलबेर्टा प्रांतात विषाणू संसर्गाचा दर सर्वाधिक आहे. या प्रांतात येत्या सोमवारपासून 12 वर्ष वयापेक्षा मोठ्या सर्वांना ही लस दिली जाणार आहे.
 
कॅनडामध्ये आतापर्यंत 12 लाख कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यापैकी जवळपास 20% रुग्ण 19 वर्षांखालचे आहेत.
 
लस पुरवठ्यामध्ये झालेल्या विलंबामुळे कॅनडामध्ये लसीकरण मोहीम काहीशी धीम्या गतीने सुरू झाली होती. अवर वर्ल्ड इन डेटाच्या म्हणण्यानुसार कॅनडामध्ये आतापर्यंत जवळपास 34% लोकांना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे, तर अमेरिकेत हे प्रमाण 44% आहे.
लहान मुलांमध्ये कोव्हिड-19 मुळे गंभीर आजारी होण्याचं किंवा मृत्यू होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. इतकंच नाही तर कोरोना महामारीच्या या संपूर्ण काळात थोड्याफार केसेस वगळता लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं प्रमाणही खूप कमी होतं.
 
लशीला परवानगी मिळाल्यामुळे यापुढेही फायझरला 12 ते 15 या वयोगटातल्या मुलांसाठी ही लस किती सुरक्षित, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण आहे, याबाबत कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाला माहिती द्यावी लागणार आहे.
 
चाचण्यांच्या प्राथमिक निष्कर्षांवरून ही लस या वयोगटातल्या मुलांवर 100% परिणामकारक असल्याचं आणि मुलांमध्ये आजाराविरोधात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती तयार करत असल्याचं फायझरने मार्च महिन्यात जाहीर केलं होतं.
 
अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन आणि युरोपीयन मेडिसिन एजेंसीदेखील फायझर लस किशोरवयीन मुलांना द्यायची का, याचा आढावा घेत आहे. लवकरच त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी याच आठवड्यात 12 ते 15 वयोगटातील मुलांना लवकरात लवकर लस देण्याची योजना आखली आहे.
 
इतर लस उत्पादकांचं काय म्हणणं आहे?
फायझरप्रमाणेच इतर लस उत्पादकही लहान मुलांवर लसीच्या चाचण्या घेत आहेत. शाळा सुरू करणे, कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालणे आणि इतर आजार असलेल्या मुलांचं कोव्हिडपासून संरक्षण, यासाठी मुलांना विशेषतः किशोरवयीन मुलांना लस देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
मॉडेर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या दोघांकडूनही 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवर लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मॉडेर्नाच्या चाचण्याचे निष्कर्ष लवकरच हाती येण्याची शक्यता आहे.
मोडेर्ना आणि फायझर तर 6 महिने ते 11 वर्ष वयाच्या मुलांवरही लसीच्या चाचण्या घेत आहेत.
 
तर यूकेमध्ये अॅस्ट्राझेनकादेखील 300 मुलांवर लसीच्या चाचण्या घेत आहे. 6 ते 17 वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये लशीमुळे रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते का, याचा संशोधक अभ्यास करत आहेत.
 
बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी कोव्हिडविरोधी लसीवरील पेटेंट सुरक्षा काढण्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लस उत्पादकांचं लसीवरचं पेटंट रद्द होईल आणि त्यामुळे इतर औषध निर्मिती कंपन्यांना लसीचं उत्पादन करण्याची परवानगी मिळेल. असं झाल्यास लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्यामुळे गरीब देशांनाही परवडणाऱ्या दरात लस विकत घेण्यात मदत होईल.
 
जागतिक व्यापर संघटनेच्या प्रस्तावाला बायडेन यांनी दिलेला पाठिंबा म्हणजे, "कोव्हिडविरोधी लढ्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण" असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अॅधनॉम घेब्रेयेसूस यांनी म्हटलं आहे.
 
'किशोरवयीन मुलांसाठी लसीला मंजुरी देणारा कॅनडा पहिला देश'
बीबीसीच्या आरोग्य प्रतिनिधी रेचल श्रायर यांचं विश्लेषण -
 
कोव्हिडविरोधी लसीच्या चाचण्यांमध्ये 16 वर्षाखालील मुलांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे जगातल्या बहुतांश देशांमध्ये लसीकरण मोहिमेत 16 वर्षांखालील मुलांचा समावेश करण्यात आलेला नाही.
 
खरंतर ज्या आजारावर लस विकसित करण्यात आली आहे तो आजार मुलांसाठी फारसा धोकादायक नाही आणि म्हणून लस उत्पादक कंपन्याही लहान मुलांवर चाचण्या घेण्यात सावधगिरी बाळगत आहेत.
मात्र, इतर व्याधी (कोमॉर्बिडीटीज) असणाऱ्या मुलांना कोव्हिडमुळे मोठा धोका संभवतो. त्यामुळे लहान मुलांसाठी लस किती सुरक्षित आहे, याची माहिती मिळणं अशा मुलांच्या पालकांसाठी फार महत्त्वाचं आहे.
 
फायझरने 12 ते 15 या वयोगटातल्या मुलांवर कोव्हिड लशीच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्याचा डेटाही जारी करण्यात आला आहे. या डेटावरून या वयोगटातल्या मुलांसाठी लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं दिसून येतं. या डेटाच्या आधारे सर्वात पहिले पाऊल उचललं आहे ते कॅनडाने.
 
मुलांना कोव्हिड-19 चा फारसा गंभीर धोका उद्भवत नसला तरी लहान मुलांचंही सुरक्षितपणे लसीकरण पार पडल्यास यातून हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यात या आजाराच्या साथीला आळा बसू शकतो.
 
दुसरीकडे जगातल्या अनेक देशांना कोव्हिडचा सर्वाधिक धोका असणाऱ्या आपल्या नागरिकांना पुरेशी लस उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. अशावेळी कॅनडाने सर्वात कमी धोका असणाऱ्यांचं लसीकरण सुरू केल्यास ज्यांना अधिक गरज आहे त्यांना प्राधान्याने लस मिळू नये का, असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.