रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मे 2023 (19:56 IST)

इम्रान खान: जिगरबाज कॅप्टन ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. माजी कर्णधार असलेल्या इम्रान खान यांचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. पाकिस्तानात राजकीय व्यक्तिमत्वाच्या बरोबरीने ते क्रिकेट सेलिब्रिटी आहेत.
 
पाकिस्तानला त्यांनी 1992 साली क्रिकेट वर्ल्डकप जिंकवून देण्याबद्दल ते ओळखले जातात. पाकिस्तानचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन म्हणूनही त्यांची ओळख आहे.
 
इम्राननी 1996 मध्ये PTI पक्ष स्थापन केला आणि राजकारणात प्रवेश केला. पण त्यांना राजकारणात दखल घेण्याजोगं यश संपादन करण्यासाठी 2013 साल उजाडावं लागलं. त्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये PTI तिसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला. पहिले दोन पक्ष होते, पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ शरीफ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP).

असं नेहमीचं म्हटलं जातं की, इम्रान यांना लष्कराचा छुपा पाठिंबा होता. त्यांचे राजकीय विरोधक त्यांना कायम लष्कराचा 'लाडका' म्हणून संबोधतात. पण इम्रान यांनी आपल्या पार्टीच्या लोकप्रियतेमागे लष्कराचा काहीही हात नाही, असं स्पष्ट केलं आहे.
 
आपल्या पक्षाला 2018 निवडणुकांसाठी मैदान खुलं करून दिलं याचाही त्यांनी इन्कार केला आहे.
रंगीबेरंगी जीवनशैली
 
पूर्णवेळ राजकारणात येण्याआधी इम्रान खान यांच्या यूकेमधल्या रंगीत-संगीत जीवनशैलीची पाकिस्तानात खूप चर्चा होत होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय माध्यमांनी खूप रस दाखवला. त्यांनी तीन लग्न केली. त्यांचीही चर्चा झाली.
 
आता मात्र त्यांच्याकडे PTI चा धार्मिक नेता म्हणून पाहिलं जातं.
 
इम्रान खान त्यांच्या दानधर्मासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या आईच्या नावे एक मोफत कॅन्सर उपचार हॉस्पिटल उभारलं आहे. त्यांच्या आईचा मृत्यू याच रोगाने झाला.
 
महत्त्वाच्या मुद्द्यांवर इम्रान यांची भूमिका
भ्रष्टाचाराविरोधात लढा हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे.
इम्रान खान माजी विरोधीपक्ष नेते होते. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या परिवाराने केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध ज्यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली त्यांच्यापैकी इम्रान खान एक आहेत.
जुलै महिन्यात शरीफ यांच्या विरोधात निकाल आला आणि त्यांना कैदेची शिक्षा झाली. याचाही इम्रान यांनी आपल्या प्रचारात पुरेपूर वापर करून घेतला.

राजकारणातल्या घराणेशाहीवरही इम्रान खान यांनी फार टीका केली आहे. त्यांच्यामते ही घराणेशाहीच पाकिस्तानमधल्या नाकर्त्या सरकारला आणि कमजोर प्रशासनाला जबाबदार आहे.
पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराची भूमिका आहे ही बाब त्यांना मान्य आहे. चांगलं सरकारचं नागरी आणि लष्करी नेत्यांमधले संवेदनशील संबंध व्यवस्थित हाताळू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे.

"उत्तमप्रकारे काम करणारं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार हीच तुमची खरी ताकद असते. पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराला हस्तक्षेप करावा लागतो कारण इथे अत्यंत वाईट सरकारं आजवर आली. लष्कराचा हस्तक्षेप योग्य आहे असं माझं म्हणणं नाही, पण तिथे एक पोकळी आहे जी भरून काढणं गरजेचं आहे," पाकिस्तानातल्या डॉन या वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इम्रान यांनी सांगितलं.
 
मोदींवर शरसंधान
इम्रान खान यांनी या मुलाखतीत पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावरही आपली मतं व्यक्त केली होती. भारत-पाकिस्तानच्या संबंधातल्या तणावाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
"पाकिस्तानला एकटं पाडायचं नरेंद्र मोदी सरकारचं धोरणं आहे. ते पाकिस्तानविरोधात राळ उडवतात, कारण काश्मीरमध्ये ते करत असलेल्या हिंसेसाठी त्यांना पाकिस्तानला जबाबदार ठरवायचं आहे," त्यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितलं.

इस्लामी जहालवाद्यांबद्दल सहानुभूती असल्याच्या कारणावरून इम्रान खान यांच्यावर टीकाही झालेली आहे. बंडखोरांशी चर्चा करावी या मताचे ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. त्यांचे विरोधक त्यांना 'तालिबान खान' असं म्हणतात. पण ते इस्लामी जहालवाद्यांबद्दल सहानुभूती असल्याच्या आरोपाचा इन्कार करतात. बंडखोरांसोबत शांततेची बोलणी केली तर पाकिस्तानमधला दहशतवादाचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटतं.ते आपल्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गिलानी यांचं उदाहरणं देतात. गिलानी यांनी शांततेसाठी तालिबानशी चर्चा केली होती.
 
पक्ष आणि आश्वासनं
मतदारांनी निवडून दिल्यास इस्लामच्या कल्याणासाठी झटणारा देश म्हणून पाकिस्तान ओळखला जाईल, असं आश्वासन खान यांनी दिलं होतं.
 
खान यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात 'नया पाकिस्तान'चा उल्लेख केला आहे. प्रशासकीय सुधारणा, भ्रष्टाचाराचं निर्मूलन आणि पारदर्शकता यावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
 
सोशल मीडियावर इम्रान यांच्या पक्षाचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. त्या ठिकाणी राजकीय आणि निवडणूक संदर्भातील विषयांवर चर्चा सुरू असते.
2013 निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काश्मीरप्रश्नी तोडगा हा पक्षाच्या चार प्रमुख मसुद्यांपैकी एक होता. मात्र पाच वर्षांनंतर हा मुद्दा पक्षाच्या जाहीरनाम्यात तळाशी फेकला गेला आहे.
 
UN सेक्युरिटी काउन्सिलच्या मानकांनुसार काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करण्याचं आश्वासन इम्रान यांच्या पक्षाने दिलं आहे.
 
धगधगत्या अशा बलुचिस्तान प्रश्नासंदर्भात इम्रान यांच्या पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. बलूच नेतृत्वाशी तसंच युवा वर्गाशी चर्चा करून राजकीय आणि आर्थिक सबलीकरणासाठी आवश्यक पावलं उचलली जातात असं आश्वासन देण्यात आलं आहे.
 
चीनबरोबरचे संबंध बळकट करून सीपेक अर्थात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची हमी देऊ असं इम्रान यांच्या पक्षाने म्हटलं आहे.
 
तीन लग्न
25 नोव्हेंबर 1952 मध्ये जन्मलेल्या इम्रान यांनी लाहोर येथील एचीसन कॉलेज, कॅथेड्रल स्कूल आणि इंग्लंडमधील प्रसिद्ध रॉयल ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी केबल कॉलेज, ऑक्सफर्डमधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
 
क्रिकेट कारकिर्दीदरम्यान क्लब, पार्ट्या करणारे रंगीलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. इम्रान यांनी 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथ या ब्रिटिश महिलेशी लग्न केलं.
इम्रान-जेमिमा या दांपत्याला दोन मुलं आहेत. नऊ वर्षं संसार केल्यानंतर इम्रान-जेमिमा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.
 
लैंगिक शोषणाचा आरोप
2014 मध्ये इम्रान यांनी टीव्ही अँकर रेहम खान यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. रेहम खान यांचे आईवडील पाकिस्तानचे आहेत, मात्र त्यांचा जन्म लिबियाचा आहे. हे लग्न केवळ दहा महिने टिकलं. रेहम यांनी विभक्त झाल्यानंतर पुस्तक लिहिलं. दहा महिन्यांच्या कालावधीत लैंगिक शोषण झाल्याचा आरोप रेहम यांनी पुस्तकात केला आहे.
 
यानंतर 2018 मध्ये इम्रान यांनी बुशरा मानिका यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 
क्रिकेट कारकीर्द
पाकिस्तानच्या सार्वकालीन महान क्रिकेटपटूंमध्ये इम्रान यांचा समावेश होतो. 1987 मध्ये इम्रान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र पुढच्याच वर्षी त्यांना निवृत्ती सोडून परतण्याचं सांगण्यात आलं. इम्रान यांनी पुनरामगन केलं. चारच वर्षांत त्यांनी पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून दिला.
16व्या वर्षी इम्रान यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. पाकिस्तानमधील स्थानिक संघ तसंच ऑक्सफर्ड महाविद्यालयाच्या संघाकडून खेळण्याचा मान मिळवला. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. 1971 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी पाकिस्तानसाठी पदार्पण केलं.
 
तीन वर्षांत इम्रान यांनी पाकिस्तानच्या वन डे संघात स्थान मिळवलं. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांनी संघातलं स्थान पक्कं केलं. 1978 मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे इम्रान यांनी 139.7 वेगाने टाकलेला चेंडू चांगलाच गाजला होता.
 
डेनिस लिली, अँडी रॉबर्ट्स यासारख्या समकालीन दिग्गजांना मागे टाकण्याची किमया इम्रान यांनी केली होती. इम्रान यांनी 88 कसोटी सामन्यांमध्ये 6 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 3,807 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 362 विकेट्स आहेत. दैदिप्यमान कारकीर्दीनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली तेव्हा पाकिस्तानसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता.

1982 मध्ये जावेद मियाँदादकडून कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली तेव्हा इम्रान यांचा स्वभाव लाजाळू होता. सुरुवातीला टीम मीटिंगमध्ये ते खुलेपणाने बोलू शकत नसत. मात्र अल्पावधीतच त्यांनी खेळाडू आणि कर्णधार म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं. मायदेशात भारताविरुद्ध झालेल्या मालिकेत सहा कसोटीत 40 विकेट्स पटकावणं, श्रीलंकेविरुद्ध कारकीर्दीतलं सर्वोत्तम प्रदर्शन आणि कर्णधार म्हणून पहिल्याच वर्षी 13 कसोटीत 88 विकेट्स घेण्याची करामत- अशा अफलातून प्रदर्शनासाठी इम्रान प्रसिद्ध आहेत.
 
दणक्यात पुनरागमन आणि वर्ल्डकप खिशात
1987 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर इम्रान यांनी निवृत्ती स्वीकारली. मात्र राष्ट्रपती जनरल जिया उल हक यांच्या आग्रहाखातर त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजविरुद्ध 3 कसोटीत 23 विकेट घेत त्यांनी दणक्यात पुनरागमन केलं.
 
1992 वर्ल्डकपविजेत्या पाकिस्तान संघाचं नेतृत्व इम्रान खान यांनी केलं होतं. पाकिस्तानला पहिलावहिला वर्ल्डकप जिंकून देण्याची किमया इम्रान यांच्या नेतृत्वाने साधली होती. क्रिकेटमधून दुसऱ्यांदा निवृत्ती स्वीकारल्यानंतर कारकिर्दीत चेंडूशी छेडछाड केल्याचं त्यांनी कबूल केलं. मात्र एका काऊंटी सामन्यादरम्यान असं केल्याचं त्यांनी सांगितलं.
 
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पाकिस्तानात कधीही मतदान न केल्याचं इम्रान यांनी सांगितलं. मात्र इम्रान यांचा विजय पाकिस्तान राजकारणातील भुत्तो आणि शरीफ यांच्या कुटुंबीयांच्या वर्चस्वाची अखेर झाल्याची नांदी आहे.
 


Published By- Priya Dixit