बीडच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, 4 वर्षाच्या मुलीला बाल्कनीत रडत बघून घटना उघडकीस
अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मूळचे बीडच्या अंबाजोगाईमधील असणाऱ्या या दांपत्याचा मृत्यूबद्दल पीटीआयने वृत्त दिलं आहे. अमेरिकी मीडियाच्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये राहणार्या दांपत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
त्यांची मुलगी बाल्कनीत उभी राहून रडत असल्यामुळे ही घटना उडकीस आली. बालाजी भारत रुद्रवार (३२) आणि आरती बालाजी रुद्रवार (३०) अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत. दांपत्यावर चाकूने हल्ला झाल्याचे समोर येत आहे.
बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी पीटीआयशी बोलताना सांगिल्यानुसार त्याची नात बाल्कनीत एकटीच रडत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश करुन बघितल्यावर त्यांना मृतदेह आढळले. वैद्यकीय तपासणीत चाकूने वार केल्याचं समोर आलं असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.
मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून पोस्टमार्टमची रिर्पोट देण्यात येईल असे वडीलांना सांगण्यात येत आहे. भारत रुद्रवार यांनी सांगितलं की माझी सून सात महिन्यांची गर्भवती होती. आम्ही एकदा तेथे गेलो होता तसंच पुन्हा अमेरिकेला जाण्याबद्दल विचार सुरु होता.
आयटी कंपनीत कामाला असणारे बालाजी रुद्रवार ऑगस्ट २०१५ मध्ये ते पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते.