शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 मे 2024 (12:16 IST)

गाझा-इजिप्तच्या सीमेवरील 'फिलाडेल्फी कॉरिडॉर'वर इस्रायलनं मिळवला ताबा

Isreal
फिलाडेल्फी कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाझा-इजिप्त सीमेलगतच्या भागावर इस्रायली लष्करानं ताबा मिळवला आहे. धोरणात्मकदृष्ट्या हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की, त्यांना इथे हमासने शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी वापरलेले तब्बल 20 बोगदे सापडले आहेत.
पण, इजिप्शियन टेलिव्हिजनने सूत्रांचा हवाला देऊन हा दावा नाकारला आहे आणि म्हटलंय की, इस्त्रायल असा दावा करून रफामधल्या आपल्या लष्करी कारवाईचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत आहे. इजिप्तसोबतचा तणाव वाढत असताना इस्रायलने ही घोषणा केली आहे.

फिलाडेल्फी कॉरिडॉर हा एक बफर झोन किंवा म्हणजे दोन देशांमधल्या 'नो मॅन्स लँड' सारखी मोकळी जागा आहे. हा कॉरिडॉर फक्त शंभर मीटर रुंद आहे. हा कॉरिडॉर गाझामधला आणि इजिप्तमधल्या तेरा किलोमीटर लांबीच्या सीमेलगत आहे. इथून हमासनं बोगदे खणले असून त्याद्वारा गाझामध्ये तस्करी होत असल्याचा इस्रायलचा दावा आहे. इस्रालयली सैन्य, अर्थात आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले, "अलीकडच्या काही दिवसांत आयडीएफने इजिप्तलगतच्या फिलाडेल्फी कॉरिडॉरवर नियंत्रण मिळवले आहे." हमास नियमितपणे गाझा पट्टीमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याचा दावा करत त्यांनी या कॉरिडॉरला हमासची 'लाइफलाईन' म्हटलंय. इस्रायली सैन्याने या भागातील बोगद्यांचा शोध घेण्याचे आणि धोका कमी करण्याचे काम केले आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, हगारी यांनी नंतर एका पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं की, सर्व बोगदे इजिप्तशी जोडलेले आहेत की नाही याची त्यांना खात्री करता येणार नाही. इजिप्तने यापूर्वी म्हटलंय की, त्यांनी हे सीमापार बोगदे नष्ट केले आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत शस्त्रास्त्रांची तस्करी करणे अशक्य आहे. दुसरीकडे, इजिप्तमधील एका उच्चस्तरीय सूत्राचा हवाला देत अल कैरो न्यूजने म्हटलंय की, "इस्रायल या आरोपांचा वापर राजकीय कारणांसाठी, युद्ध लांबवण्यासाठी आणि पॅलेस्टिनी शहर रफामध्ये कारवाई सुरू ठेवण्यासाठी करत आहे." रफा जिंकल्याशिवाय गाझाचं युद्ध जिंकता येणार नसल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
 
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या भूभागावर हमासच्या हल्ल्याने युद्ध सुरू झाले. हमासच्या त्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 252 जणांना हमासने ओलीस ठेवले होते. दुसरीकडे, हमास प्रशासित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार गाझामध्ये इस्रायलच्या कारवाईत 36,170 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने हमासविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून तीन आठवड्यांपूर्वी रफा क्रॉसिंगचा ताबा घेतल्यापासून इजिप्त आणि इस्रायलमधील तणाव वाढला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, रफाजवळील सीमा भागात इजिप्शियन आणि इस्रायली सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका इजिप्शियन सैनिकाचा मृत्यू झाला. इजिप्त हा पॅलेस्टाईनचा खंबीर समर्थक आहे. त्याने गाझामधील इस्रायली लष्करी कारवाया आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हत्येवर कडाडून टीका केली आहे. पण गाझामध्ये हमासची सत्ता आल्यापासून इजिप्तने 2006 मध्ये सीमा नाकेबंदी केली. इजिप्तने हमासवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातली आहे. मात्र, त्यांनी हमाससोबत संवादाचे मार्ग खुले ठेवले आहेत. इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविराम आणि इस्रायली ओलीस सोडण्याच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत आहेत.
 
Published By- Dhanashri Naik