शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (21:32 IST)

चार नवरे, सासूसह 12 जणांची हत्या, जन्मठेपेऐवजी स्वतःच केली होती फाशीची मागणी; पण

suicide
वकार मुस्तफा
त्यांना 'हसरी आजी' असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अंगापिंडाने जाड, गुबगुबीत दिसणारी ही आजी नेहमी हसतमुख असायची, पण त्या हसतमुख चेहऱ्यामागे तब्बल अडीच दशकांची सिरीयल किलर बाई दडली होती.
 
ही गोष्ट आहे नॅनी डॉस या अमेरिकन सीरियल किलरची. तिने 1920 ते 1954 दरम्यान सुमारे 12 लोकांची हत्या केली.
 
तिच्या पालकांनी तिचं नाव नॅन्सी ठेवलं होतं. 1905 साली अमेरिकेतील अलाबामा राज्यातील एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. परंतु क्राइम लायब्ररी प्रोफाइलनुसार, तिला वयाच्या पाचव्या वर्षापासून 'नॅनी' म्हटलं जायचं.
 
जेम्स आणि लुईसा हेझेल यांना नॅनी धरून पाच मुलं होती. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर चालायचा. त्यामुळे नॅनीला आणि तिच्या लहान भावंडांना फारच कमी शिक्षण मिळालं. बऱ्याचदा या मुलांना शेतीची कामं करावी लागायची.
 
अलाबामामधील गुन्हेगारी शास्त्रज्ञ पॅम जोन्स सांगतात की, जेम्स हेझेल हा वाईट स्वभावाचा आणि दुसऱ्यांचा छळ करणारा व्यक्ती होता. कदाचित तो नॅनीचा खरा पिता नसावा असं संशोधनातून समजतं.
 
जोन्स लिहितात की, नॅनी जेव्हा किशोरवयात आली तेव्हा तिच्या समवयस्कांसोबत मिसण्याला, संबंध ठेवायला तिच्या वडिलांचा विरोध होता.
 
"तिला मेकअप करण्याची, चांगले कपडे घालण्याची, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची मनाई होती. अगदी चर्चच्या एखाद्या कार्यात देखील तिला सहभागी होऊ दिलं जात नव्हतं. पण उपलब्ध माहितीनुसार ती रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांना भेटण्यसाठी घरातून लपून बाहेर पडायची."
 
पत्रकार विल्यम डे लाँग यांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयात असतानाच नॅनीने तिच्या भावी पतीसोबत सुंदर आयुष्याचं स्वप्न पाहिलं .
 
तिचा मोकळा वेळ प्रणय मासिकं वाचण्यात जायचा. कदाचित ती तिच्या वडिलांच्या अत्याचारामुळे प्रणय मासिकांचा आश्रय घेत असावी.
 
विवाहांची मालिका
जोन्स लिहितात की, "स्थानिक कापड कंपनीत काम करत असताना, 16 वर्षीय नॅनी आणि सहकारी चार्ल्स ब्रिग्स एकमेकांच्या प्रेमात पडले. भेटीनंतर काही महिन्यांनी त्यांचं लग्न झालं आणि 1927 पर्यंत त्यांना चार मुली झाल्या.
 
जोन्सने चार्ल्सबद्दल लिहिलंय की "नॅनी सुंदर होती आणि तिच्यासोबत त्याने खूप छान वेळ घालवला. त्यांच्या लग्नाची सुरुवात चांगली झाली होती, पण काही वर्षांनी नॅनी त्याच्यापासून दुरावली."
 
डे लाँग म्हणतात की, हे दोघेही चार्ल्सच्या आईसोबत राहत होते. ती नॅनीच्या वडिलांप्रमाणेच तिला अपमानास्पद वागणूक द्यायची. कदाचित यामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली आणि पहिला खून झाला.
 
टेरी मॅनर्स यांच्या 'डेडलियर दॅन मेन', या पुस्तकात टेरी लिहितात की, लग्नाच्या सुरुवातीच्या काळात दोघांनीही दारू आणि विवाहबाह्य संबंधांचा आश्रय घेण्यास सुरुवात केली.
 
ज्या वर्षी त्यांची सर्वात धाकटी मुलगी, फ्लोरेन्स जन्मली त्या वर्षी त्यांच्या दोन मुलींचा अन्नातून विषबाध झाल्यामुळे अनपेक्षितपणे मृत्यू झाला. त्यावेळी हे दोन्ही मृत्यू अपघाती ठरवले गेले. परंतु कुटुंबातील सदस्य आणि पोलिसांचा असा विश्वास आहे की या हत्या नॅनीनेच केल्या असाव्यात.
 
या दोन मुली जाऊन अवघा काही काळच लोटला होता. इतक्यात चार्ल्स आपली थोरली मुलगी मेल्विनाला घेऊन निघून गेला, तर धाकटी मुलगी फ्लोरिन ही नॅनीकडेच राहिली. अशा प्रकारे नॅनीचं पहिलं लग्न 1928 मध्ये संपलं.
 
चार्ल्स 1928 च्या उत्तरार्धात मेल्विना आणि नवीन पत्नीसह परतला. नॅनी तिच्या मुलींना घेऊन तिच्या पालकांसोबत राहायला गेली आणि स्वतःचा आणि तिच्या मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिक सूतगिरणीत काम करू लागली.
 
चार्ल्स नशीबवान होता कारण त्याचा जीव वाचला.
 
जोन्स लिहितात की, दुसऱ्या पतीच्या शोधात, नॅनी क्लबमध्ये जाऊन आपण एकटे असल्याची जाहिरातबाजी करू लागली.
 
तिच्या या जाहिरातीला फ्रँक हॅरेल्सन याने कविता आणि फोटोसह प्रतिसाद दिला.
 
1929 मध्ये त्यांचंही लग्न झालं. पण आता नॅनीच्या पुढ्यात आणखीन मोठी डोकेदुखी वाढून ठेवली होती.
 
'फ्रँक हा एक मद्यपी होता. त्याने आपल्या वैवाहिक जीवनाचा मोठा भाग स्थानिक तुरुंगात, ड्रग्सचा वापर करण्यात घालवला. तिचा दुसरा नवरा तिच्यावर ओझं बनू लागला, तिला अपमानास्पद वागणूक देऊ लागला. नॅनीने 16 वर्ष शारीरिक आणि भावनिक अत्याचार सहन केले. पण तिचं हे ही लग्न मोडलं.
 
फ्रँकचा बंदोबस्त करण्यापूर्वी नॅनीने त्याच्या कुटुंबातील त्याचा पुतण्या आणि भाचीची हत्या केली होती.
 
नातीचा खून
1940 च्या दशकाच्या सुरुवातीला नॅनीची मोठी मुलगी, मेल्विनाने लग्न केलं. तिने एका मुलाला जन्म दिला आणि पुढच्या दोन वर्षात एका मुलीला जन्म दिला.
 
जोन्सच्या म्हणण्यानुसार, मेल्विना आणि तिचा नवरा हॉस्पिटलच्या खोलीत झोपले असताना, नॅनीने तिच्या नवजात नातीची हत्या केली.
 
बाळंपणानंतरच्या औषधांमुळे मेल्विनाला वाटत होतं की, तिच्या आईने पेनने बाळाला भोसकलं. तसं तिने तिच्या घराच्या लोकांना सांगितलं. पण कोणीही नॅनीवर संशय घेतला नाही.
 
पुढच्या सहा महिन्यांनंतर, मेल्विना तिच्या तान्हुल्या मुलाला, रॉबर्टला त्याच्या आईकडे सोडते पण त्याचाही गुदमरून मृत्यू होतो.
 
जोन्स लिहितात की, या नातवाचा नॅनीने 500 डॉलरचा विमा काढला होता. त्याच्या मृत्यूनंतर आर्थिक फायदा होण्याची ही शेवटची वेळ नव्हती.
 
एकामागून एक हत्यांचं सत्र
आता नवरा फ्रँकची पाळी होती. संशोधक गॉर्डन हार्वे यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या महायुद्धातून परतलेल्या मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करून तो एका रात्री घरी आला.
 
न्यायालयात दिलेल्या नॅनीच्या साक्षीनुसार, फ्रँकने तिच्यावर जबरदस्ती केली म्हणून दुसऱ्या दिवशी तिने पतीच्या वाईनमध्ये उंदराना मारण्याचे विष मिसळले.
 
15 सप्टेंबर 1945 रोजी फ्रँक मरण पावला.
 
डे लाँग लिहितात की, लोकांना वाटलं की त्याचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्यामुळे झाला असावा. पण फ्रँकचाही विमा असल्याने त्याच्या मृत्यूनंतर पैसे मिळाले. त्या पैशातून नॅनीने घर आणि जमीन विकत घेतली.
 
नॅनी नंतर नॉर्थ कॅरोलिनामध्ये गेली. तिथेही तिने 'लोनली हार्ट' अशी जाहिरात केली.
 
अर्ली लॅनिंग हा पेशाने मजूर होता. त्याने नॅनीसोबत फक्त दोन दिवस घालवले आणि एवढ्याश्या ओळखीवर थेट लग्न केलं.
 
जोन्स लिहितात की, नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहत असताना नॅनी समाजासाठी एक आदरणीय विवाहित स्त्री होती. ती स्थानिक मेथोडिस्ट चर्चची सक्रिय सदस्य बनली.
 
तिला शेजाऱ्यांचीही सहानुभूती मिळाली कारण तिचा नवरा शहरात वेश्यांकडे जातो हे सगळ्यांना माहीत होतं.
 
त्यामुळे उलट्या, चक्कर येऊन मरण पावलेल्या तिच्या नवऱ्याच्या मृत्यूवर शंका घेण्याऐवजी ते लोक नॅनीशी चांगले वागू लागले.
 
शिवाय नॅनीने स्वतः सगळ्यांना सांगितलं होतं की, तिनेच तिच्या नवऱ्याला चहा आणि नाश्ता दिल्यावर त्याची तब्येत बिघडली.
 
डॉक्टरांनीही त्याच्या मृत्यूला त्याच्या मद्यपानाला कारणीभूत धरलं.
 
हार्वे लिहितात की त्या वेळी या भागात फ्लूचा विषाणूही होता. त्यामुळे मृत्यू संशयास्पद न वाटल्याने शवविच्छेदन करण्यात आलं नाही.
 
आपल्या मृत पतीने राहतं घर त्याच्या बहिणीला दिलंय हे कळताच नॅनीने आपलं सामान बांधलं आणि ते शहर सोडून निघून गेली. पुढच्या काही तासांत त्या घराची राख रांगोळी झाली होती.
 
नॅनी अर्लीच्या आईकडे जवळच्या गावात राहायला गेली. काही आठवड्यांनंतर, विम्याचे पैसे आले जे अर्लीच्या नावावर होते. आणि मृत्यूपत्रानुसार ते पैसे त्याच्या बहिणीचे होते. पण बहिणीला पैसे मिळण्यापूर्वीच अर्लीच्या आईचे अचानक निधन झाले.
 
नॅनीने बेकायदेशीरपणे पैसे घेतले, तिचं सामान बांधलं आणि पुन्हा एकदा शहर सोडलं. तिची बहीण ड्यूईची काळजी घेण्यासाठी ती अलाबामाला गेली, तिचाही काही काळानंतर अचानक आणि रहस्यमयरीत्या मृत्यू झाला.
 
जोन्सच्या म्हणण्यानुसार, लग्नाचे तीन अयशस्वी प्रयत्न झाले असतानाही नॅनीच्या मनात अजूनही प्रेम बाकी होतं.
 
1950 च्या दशकाच्या सुरुवातीस, तिने डायमंड सर्कल क्लबमध्ये सामील होण्यासाठी 15 डॉलर शुल्क भरले. इथेच ती तिचा चौथा पती रिचर्ड मॉर्टनला भेटली. कॅन्ससमधील हा सेवानिवृत्त सेल्समन तिच्या आधीच्या तीन पतींपेक्षा खूपच वेगळा होता.
 
तो खूप आनंदी असायचा, आपल्या पत्नीशी चांगलं वागायचा.
 
डे लाँग लिहितात की, पण नॅनीसोबत लग्नाच्या बंधनात असताना देखील रिचर्ड मॉर्टनने इतर महिलांसोबत संबंध ठेवले होते.
 
जोन्सच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या दोन महिन्यांतच नॅनी वर्तमानपत्रात जाहिराती देऊन तिच्या पुढच्या नवऱ्याचा शोध घेत होती.
 
आपल्या पतीच्या मृत्यूनंतर नॅनीची आई, लुईसा हेझेल अलाबामाहून तिच्याकडे राहायला आली होती. ती आल्यानंतर काही दिवसांतच तिला तीव्र आतड्यांसंबंधी त्रास होऊ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.
 
डे लाँग लिहितात की आईचा विषय संपताच नॅनीने तिचे पूर्ण लक्ष तिच्या 'फसवणाऱ्या' नवऱ्याकडे वळवले.
 
जोन्स म्हणतात की, रिचर्डचा मृत्यू विषारी कॉफी प्यायल्याने झाला. हार्वे लिहितात, रिचर्डने प्यायलेल्या कॉफीचा संपूर्ण थर्मॉस विषयुक्त होता.
 
रिचर्ड मॉर्टनच्या मृत्यूनंतर सॅम्युअल डॉस हा नॅनीचा नवा पती बनला.
 
नॅनीने पतीला मारल्याचा संशय
डॉस एक स्पष्टवक्ता आणि अत्यंत पुराणमतवादी माणूस होता ज्याला वेळ आणि पैसा वाया घालवायला आवडत नव्हता. डे लाँगच्या म्हणण्यानुसार, सॅम्युअल नशेत नसायचा ना कधी त्याने कोणाला अपमानास्पद वागणूक दिली.
 
त्याने फक्त एकच चूक केली, त्याने आपल्या पत्नीला शैक्षणिक हेतूंसाठी असलेली मासिकं आणि दूरदर्शनचे कार्यक्रम पाहायला सांगितलं.
 
जोन्स लिहितात की, या निर्बंधांमुळे नॅनी तिच्या पतीला सोडून अलाबामाला गेली. सॅम्युअलने आपल्या रागावलेल्या पत्नीला घरी परतण्याची विनंती केली. त्याने नॅनीला त्याच्या बँक खात्यात भागीदार बनवले आणि पत्नीच्या नावे त्याच्या दोन जीवन विमा पॉलिसी काढल्या.
 
एके दिवशी नॅनीने त्याला घरी बनवलेला केक खाऊ घातला. 24 तासांच्या आत त्याच्या पोटात जळजळ होऊ लागली, ओटीपोटात दुखू लागलं. पुढचे अनेक आठवडे तो दवाखान्यात पडून होता. नंतर तो बरा होऊन घरी परतला.
 
तो घरी आला म्हणून नॅनीने त्याच्यासाठी खास जेवण तयार केलं. त्याआधी त्याची भूक शमवण्यासाठी विष ओतलेली कॉफी त्याला देऊ केली.
 
डे लाँगच्या मते, ही विषयुक्त कॉफी त्याचं शेवटचं पेय होतं. पण इथेच नॅनीची चूक झाली.
 
तिच्या पाचव्या आणि शेवटच्या पतीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तिचा संशय आला होता, पण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता.
 
त्यामुळे डॉक्टरांनी नॅनीला पटवून दिलं की, जीवन विम्याची रक्कम मिळण्यासाठी पतीचं शवविच्छेदन करणं महत्वाचं आहे. तिने यासाठी होकार दिला.
 
शवविच्छेदनात डॉक्टरांना सॅम्युअल डॉसच्या शरीरात मोठ्या प्रमाणात आर्सेनिक आढळून आलं, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 1954 मध्ये नॅनीला अटक करण्यात आली.
 
तपासकर्त्यांना नॅनीकडून कबुलीजबाब मिळवताना खूप अडचणी आल्या.
 
नॅनीची कबुली
जोन्स लिहितात, "ती 'रोमँटिक हॅट्स' नावाचं मासिक वाचायची. पोलिसांना तिच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी तिच्याशी किशोरवयीन मुलांप्रमाणे प्रेमाच्या गोष्टी कराव्या लागल्या. अखेर अनेक तासांच्या चौकशीनंतर नॅनीने आपल्या पतीला विष दिल्याची कबुली दिली."
 
तिने असं का केलं? अशी विचारणा पोलिसांनी केली.
 
त्यावर नॅनीने सरळ उत्तर दिलं की, 'तो मला माझा आवडता टेलिव्हिजन कार्यक्रम पाहू देत नव्हता किंवा उन्हाळ्याच्या रात्री पंखा चालू करू देत नव्हता.'
 
त्यानंतर नॅनीने पोलिसांना तिच्या आधीच्या पतींची हत्या केल्याची कबुली दिली.
 
तिच्या या कबुलीजबाबाने देशभरात खळबळ उडाली. मात्र, ती नेहमी हसतमुख दिसायची.
 
त्यामुळे काही पत्रकारांनी तिला 'हसरी आजी' असं नाव देऊन टाकलं. एका वृत्तपत्राने तर तिचं नामकरण 'सेल्फ मेड विडो' असं केलं होतं.
 
नॅनीने तिच्या पाच पतींपैकी चार पतींची हत्या केल्याची कबुली दिली. पण कुटुंबातील सदस्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली नाही.
 
तपासादरम्यान, आठ संशयित पीडितांचे मृतदेह सापडले. शवविच्छेदनात नॅनीचे इतर तीन मृत पती आणि त्यांच्या आईच्या शरीरात विष आढळून आले.
 
उर्वरित व्यक्तींना गुदमरवून मारल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे तिने सुमारे 12 लोक मारले असावेत असा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला. यातले बहुतेक त्यांचे नातेवाईक होते.
 
एकूण चार पती, दोन मुले, दोन बहिणी, दोन नातवंडं आणि एका सासूची तिने हत्या केल्याचं उघड झालं.
 
लहानपणी तिच्या डोक्याला मार लागला होता. या डोकेदुखीचा त्रास तिला आयुष्यभर होता. या सगळ्याचं खापर तिने मेंदूच्या दुखापतीवर फोडलं.
 
आपल्या नवऱ्यांना कसं मारलं याचं वर्णन करताना ती हसत होती. विम्याच्या पैशासाठी तिने या हत्या केल्या नव्हत्या असं तिचं म्हणणं होतं.
 
तिच्याच शब्दात सांगायचं तर, प्रणय मासिकांचा तिच्या मानसिकतेवर खोल परिणाम झाला होता. ती एक परिपूर्ण जोडीदार, आयुष्यातलं खरं प्रेम शोधत होती.
 
नवरा भरकटला की ती त्याला मारायची आणि पुढचा नवरा शोधायची.
 
मानसिक संतुलन आणि रद्द झालेली फाशीची शिक्षा
हार्वे यांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे, ओक्लाहोमा राज्याने नॅनीला हत्येसाठी दोषी ठरवलं. उत्तर कॅरोलिना, कॅन्सस आणि अलाबामा मधील राज्य न्याय विभागांनी देखील तिच्यावर खुनाचा आरोप लावला. पण ओक्लाहोमाच्या बाहेर तिच्यावर खटला चालवला गेला नाही.
 
पुढे दोन वर्षांनंतर न्यायाधीशांनी तिचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा निकाल दिला आणि तिची शिक्षेपासून सुटका झाली. न्यायाधीशांनी नंतर स्पष्ट केलं की, एका महिलेला, विशेषत: मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेला फाशी देऊन आपण समाजासमोर वाईट उदाहरण ठेऊ इच्छित नाही.
 
2 जून 1965 रोजी ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर) ने तिचं निधन झालं. तिला 1955 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर तिने मृत्यूदंडाची मागणी केली होती, मात्र ते काही घडू शकलं नाही. या सगळ्यात तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी झालं नव्हतं.
 
तुरुंगातील तिच्या आयुष्यावरील एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, तुरुंगात तिला फक्त लॉन्ड्रीमध्ये काम करण्याची परवानगी होती. स्वयंपाकघरात काम करण्याची तिची मागणी नम्रपणे नाकारली गेली.
 
कदाचित तिची ही विनंती नाकारून तुरुंग प्रशासनाने तिचा विषारी भूतकाळ संपवला असावा!