सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (10:58 IST)

युके निवडणूक एक्झिट पोल: कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता

12 डिसेंबर रोजी युकेतल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुका झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.
 
या अंदाजांनुसार कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 368 खासदार मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2017 च्या निवडणुकांच्या तुलनेत त्यांना 50 जागा जास्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळाल्यावर युकेचा युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असं मत बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा क्युएन्सबर्ग यांनी केला आहे.
 
या निवडणुकीत लेबर पक्षाला 191, लिबरल डिमोक्रॅट्सला 13, SNP पार्टीला 55 तर नव्यानेच स्थापन झालेल्या ब्रेक्झिट पक्षाला शून्य खासदार मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनं वर्तवली आहे.
 
एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाउंडची किंमत डॉलरच्या तुलनेत वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. युरोच्या तुलनेत पाउंडची किंमत झपाट्याने वाढल्याचं लक्षात आलं आहे.
 
गृह सचिव प्रिती पटेल यांनी सांगितलं की सरकारची स्थापना झाल्यानंतर 'ब्रेक्झिट'ची म्हणजेच युकेनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या कामाला वेग येईल. सत्तेत आल्यानंतर क्रिसमसच्या आधी ब्रेक्झिटचं विधेयक संसदेत ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
 
'जगातली सर्वांत महान लोकशाही'
ज्या लोकांनी मतदान करून लोकशाही बळकट केली त्या सर्वांचे मी आभार मानतो असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.
 
"पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपण जगातल्या सर्वांत महान लोकशाहीत राहतो," असं जॉन्सन म्हणाले.
 
'लेबर पार्टीचे नेते नाराज'
जर हे एक्झिट पोल खरे ठरले तर ती फारच निराशाजनक बाब ठरेल असं मत लेबर पार्टीचे शॅडो चान्सलर जॉन मॅकडोनल्ड यांनी व्यक्त केलं. दोन्ही पक्षांमध्ये फार काही अंतर नसेल असं वाटत असल्याचंही ते म्हणाले.
 
जर एक्झिट पोल खरे ठरले तर 1987 च्या निवडणुकानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मिळालेला हा सर्वांत मोठा विजय ठरेल. तसेच लेबर पार्टीसाठी ही नामुष्कीची वेळ ठरू शकते. 1935 मध्ये लेबर पार्टीची निराशाजनक कामगिरी झाली होती. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होऊ शकते अशी भीती लेबर पक्षातील नेत्यांना वाटत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.
 
'कॉर्बिन आउट होत आहे ट्रेंड'
एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर कॉर्बिन आउट (#CorbynOut ) ट्रेंड होत आहे. लेबर पार्टीच्या उमेदवार सियोभान मॅकडोना यांनी लेबर पक्षाचे नेते कॉर्बिन यांच्यावर निशाणा साधला आहे. मॅकडोना म्हणतात, लेबर पक्षाला निवडणुकीत अपयश मिळालं तर ती केवळ एकाच व्यक्तीची जबाबदारी राहील. कारण या निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती, त्यांनीच उमेदवार निवडले आणि त्यांनीच प्रचार केला आहे."
 
राजकीय संपादक लॉरा क्युएन्सबर्ग याचं विश्लेषण
जर एक्झिट पोल खरे ठरले तर बोरिस जॉन्सन यांनी बहुमत मिळवलं असंच म्हणावं लागेल. याचाच अर्थ असा की युकेला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे खासदारांचं पुरेसं पाठबळ असेल. ब्रेक्झिट जर घडलं तर जागतिक इतिहासात जे युकेला स्थान मिळालं आहे ते डळमळीत होण्याची शक्यता आहे. इतक्यावरच हे थांबणार नाही. या निकालानंतर कंझर्व्हेटिव्ह सरकारला पाच वर्षं सत्ता मिळणार आहे.
 
लेबर पक्षासाठी हा खूप मोठा धक्का ठरू शकतो. हा त्यांचा ऐतिहासिक पराभव ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत लेबर पक्ष डावीकडे झुकला आहे.
 
SNP चा ( स्कॉटिश नॅशनल पार्टी) स्कॉटलॅंडमध्ये प्रभाव निश्चितपणे वाढला आहे. लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने प्रचाराच्या वेळी आशा उंचावल्या होत्या पण एक्झिट पोलचे आकडे वेगळंच काही सांगत आहे.
 
मंत्रिमंडळावर काय परिणाम होऊ शकतो?
असं म्हटलं जात आहे की लेबर पार्टीचं जिथं नुकसान झालं तिथं कंझर्व्हेटिव्ह पक्षांचा फायदा झाला आहे. 2016 साली ब्रेक्झिटसाठी जनमत चाचणी झाली होती. त्यावेळी लेबर पार्टीला काही मतदारसंघात आघाडी मिळाली होती ती मतं यावेळी कंझर्व्हेटिव्हला गेली असण्याची शक्यता आहे. 1987 च्या निवडणुकांमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षांची कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ठ कामागिरी मानली जाते. पण या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाची कामगिरी 1987 च्या निवडणुकीहून सरस ठरू शकते.
 
जर एक्झिट पोल खरे ठरले तर मंत्रिमंडळात फार बदल होणार नाहीत असं पंतप्रधान कार्यालयाने सूचवलं आहे. सर्वकाही बोरिस जॉन्सन यांच्या नियोजनाप्रमाणे पार पडलं तर फेब्रुवारीपर्यंत युके युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेलं असेल असं म्हटलं जात आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खातेवाटप होईल.