शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (07:37 IST)

भारत-कॅनडा बिघडलेल्या संबंधांमुळे तिथल्या भारतीयांचं काय होणार?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी (18 सप्टेंबर) संसदेत खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय एजन्सींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली.
तेव्हापासून दोन्ही देशांमधील आधीच तणावपूर्ण असलेले संबंध आणखी बिघडले आहेत.
 
दोन्ही देशांनी एकमेकांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत.
 
दरम्यान, भारतानं कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
 
तज्ज्ञांच्या दृष्टीनं, कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधांचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापार आणि कॅनडामध्ये स्थायिक झालेले भारतीय होय.
 
या ताज्या घडामोडीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
 
अशा परिस्थितीत कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
 
विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांसाठी, जे कॅनडाच्या विविध राज्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशानं राहत आहेत आणि जे आता कॅनडात नोकरी करत आहेत.
 
भारत आणि कॅनडामधील बिघडलेल्या संबंधांचा तिथं राहणाऱ्या भारतीयांवर काय परिणाम होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या वर्षी कॅनडानं जनगणनेची आकडेवारी जाहीर केली होती, त्यानुसार इतर देशांतून तिथं स्थायिक झालेल्या एकूण लोकांपैकी 18.6 टक्के भारतीय आहेत.
 
टाईम मासिकाच्या अहवालानुसार, भारतानंतर शिखांची सर्वाधिक लोकसंख्या कॅनडात राहते. तेथील एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 2.1 टक्के आहे.
 
इतकंच नाही तर 2018 सालापासून बहुतेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी भारतातून कॅनडामध्ये येत आहेत.
 
'इंडियन एक्स्प्रेस'नं गेल्या वर्षी कॅनडाच्या जनगणनेबाबत एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं.
 
या अहवालात असं सांगण्यात आलं की, बहुतांश भारतीय स्थलांतरित कॅनडातील टोरांटो, ओटावा, वॉटरलू आणि ब्रॅम्प्टन या शहरांमध्ये स्थायिक आहेत.
 
यापैकी टोरांटो शहरात भारतीयांची संख्या अधिक आहे. हे शहर विकासाच्या बाबतीत कॅनडात अव्वल मानलं जातं.
 
याशिवाय ब्रिटिश कोलंबियामध्येही भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वारामध्येच हरदीप सिंह निज्जरवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
 
रॉयटर्सच्या अहवालानुसार, 2022 मध्ये कॅनडामध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी 40 टक्के भारतीय आहेत.
 
कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचं योगदान
रॉयटर्सच्या अहवालात असं म्हटलं आहे की, टीसीएस, इन्फोसिस , विप्रो सारख्या 30 भारतीय कंपन्यांनी कॅनडात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो.
 
ज्येष्ठ पत्रकार गुरप्रीत सिंग म्हणतात की, दरवर्षी कॅनडाला जाणार्‍या भारतीयांची संख्या लक्षात घेता दोन्ही देशांतील संबंध बिघडल्यामुळे भारतीय समुदायात अस्वस्थता वाढली आहे.
गुरप्रीत सिंग यांनी हरदीप सिंग निज्जरच्या खुनाच्या एक महिना आधी त्याची मुलाखत घेतली होती.
 
ते सांगतात, " सध्या कॅनडातील भारतीय लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आलेला दुरावा, त्याचा कॅनडात स्थायिक झालेल्या भारतीयांवर काय परिणाम होईल, याची चिंता आहे. ज्यांना भारतातून कॅनडात आणि कॅनडातून भारतात व्हिसा घेऊन प्रवास करावा लागतो, त्यांना कितपत फटका बसेल, व्यवसायावर किती परिणाम होईल असे अनेक प्रश्न आहेत."
 
"येथील स्थायिक भारतीयांचे नातेवाईक दोन्ही देशात आहेत. कुणी भारतात राहतं, कुणी कॅनडात राहतं.त्यामुळं अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या विधानाचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम झाला आहे, हे निश्चित आहे."
 
तणावाचा भारतीयांवर काय परिणाम?
फोर्ब्सनं या वर्षी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यानुसार 2013 पासून कॅनडामध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या तिपटीनं वाढली आहे.
 
जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळं भारतासोबतच्या कॅनडाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, असं सामरिक विषयाचे तज्ज्ञ ब्रह्म चेलानी यांनी कॅनडाच्या एका वेबसाइटसाठी दिलेल्या लेखात म्हटलं आहे.
 
कॅनडामध्ये राहणार्‍या भारतीयांमध्ये मोठी संख्या ही विद्यार्थ्यांची आहे. भविष्यात तिथं जाण्याचा विचार करणारे विद्यार्थीही आहेत.
 
लाइव्हमिंटनं काही तज्ज्ञांचा हवाला देत एका अहवालात म्हटलं आहे की, सध्या बदलत्या परिस्थितीचा कॅनडामध्ये राहणार्‍या भारतीयांवर किंवा भारतीय विद्यार्थ्यांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
 
या मागील तर्क असा आहे की , सध्या कॅनडाचं प्रशासन किंवा इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून अशी कोणतीही माहिती आलेले नाही, जे भारतीय स्थलांतरितांसाठी चिंतेचं कारण असेल.
 
इंडियन एक्स्प्रेसनं काही कन्सल्टन्सी कंपन्यांशी संवाद साधला , जे भारतीयांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करतात. या सर्वांच्या मते सध्या भारतीय विद्यार्थ्यांवर तणावाचा कोणताही परिणाम दिसत नाही.
 
कॅनडामध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी 40 टक्के भारतीय आहेत.या मागचा असा तर्क आहे की फक्त कॅनडाला याचा फायदा होतो आणि त्यामुळं तो कोणत्याही प्रकारची जोखीम घेणार नाही.
 
कॅनडात राहणाऱ्या भारतीयांवर ताज्या घडामोडींचा काय परिणाम होईल असं विचारलं असता, ज्येष्ठ पत्रकार गुरप्रीत सिंग म्हणतात, "या संपूर्ण प्रकरणावर अनिवासी भारतीयांची मत विभागलेली आहे. ते एकाच दृष्टीकोनातून विचार करत नाहीत. ट्रूडो यांनी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा संबंध भारतीय एजन्सीशी जोडला होता. काहींना हे महत्त्वाचं वाटतं."
 
" खलिस्तानी विचाराशी सहमत नसलेला एक गट देखील आहे. त्यांना वाटतं की ट्रूडो यांचं विधान आवश्यक नव्हतं."
 
कॅनडातील हिंदूंचं मत काय आहे ?
जनगणनेच्या आकडेवारीवरून असंही दिसून आलं आहे की पंजाबी व्यतिरिक्त, कॅनडात तमिळ, हिंदी, गुजराती, मल्याळम आणि तेलुगु यांना आपली मातृभाषा मानणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे.
 
कॅनडाच्या जनगणनेनुसार, देशाच्या लोकसंख्येपैकी हिंदूंची संख्या 2.3 टक्के आहे, जी शिख धर्मीयांपेक्षा थोडी जास्त आहे.
 
हरदीप सिंग निज्जर याच्या मृत्यूनंतर कॅनडातील अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
 
या संपूर्ण प्रकरणानंतर कॅनडाचे हिंदू कुठे आहेत, असं विचारलं असता गुरप्रीत सिंग म्हणतात, “शिखांप्रमाणेच हिंदू समुदायाचीही वेगवेगळी मतं आहेत. शीख समुदायातील एक वर्ग खलिस्तानच्या बाजूनं आहे पण एक वर्ग याच्या विरोधात आहे. नरेंद्र मोदी 2015 ध्ये कॅनडात आले होते, त्यांचं येथील सर्वात जुन्या गुरुद्वारामध्ये स्वागत करण्यात आलं होतं.
 
" तसंच हिंदूंचा एक वर्ग असा आहे ज्यांचा आरएसएसच्या विचारसरणीशी काहीही संबंध नाही. त्यांना धर्मनिरपेक्ष भारत हवा आहे. पण ज्या प्रकारे ध्रुवीकरणाचं वातावरण आहे, तो चिंतेचा विषय आहे."
 
1980 च्या दशकात भारतात खलिस्तानची मागणी शिगेला पोहोचली होती. पण कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये शीख समुदायाचा एक वर्ग अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहे.
 
भारत या देशांना शिख फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्यास सांगत आहे.
 
जस्टिन ट्रुडो जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते, तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता.
 
एबीसी न्यूजनुसार, कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाच्या बाजारपेठेत योगदानाच्या बाबतीत भारतीय चौथ्या क्रमांकावर आहेत. मात्र, भविष्यात हे चित्र बदलेल की नाही, याबाबत सध्या तरी कोणतंही स्पष्ट मत नाही.
 
पण ब्रह्म चेलानी म्हणतात की , ट्रुडो यांच्या वक्तव्यामुळं भारत आणि कॅनडा यांच्यातील बिघडलेले दोन्ही देशातील संबंध पुर्वपदावर यायला वेळ लागेल , कदाचित कॅनडातील सरकार बदलल्यानंतरच द्विपक्षीय संबंधामध्ये प्रगती दिसून येईल. पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये कॅनडामध्ये निवडणुका होणार आहेत.
 




Published By- Priya Dixit