1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (14:29 IST)

ज्युलियन असांज कोण आहेत? विकीलीक्स काय आहे?

विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकीलीक्सने म्हटलंय. यानुसार असांज युकेतून रवाना झाले असून ते अमेरिकेतील त्यांच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येईल.
 
ज्युलियन असांज कोण आहेत ?
ज्युलियन असांज यांचा जन्म 1971 साली ऑस्ट्रेलियातील टाउन्सव्हिल इथं झाला. त्यांच्या आई-वडिलांची फिरती नाटकमंडळी होती. त्यांचं बालपण तसं कठीण गेलं.
 
वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी ज्युलियन असांज वडील बनले आणि नंतर या मुलाच्या कस्टडीसाठी कायदेशीर लढाईदेखील लढले.
 
असांज यांना कॉम्प्युटरमध्ये गती होती आणि 1995 साली हॅकिंगमध्ये दोषी आढळल्यानं त्यांना हजारो ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंडही भरावा लागला होता. पुन्हा अशा प्रकारचं कृत्य न करण्याचं मान्य केल्यानं असान्जचा तुरूंगवास टळला होता.
 
मेलबर्न विद्यापीठामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स शिकायला जाण्यापूर्वी त्यांनी इंटरनेटसंबंधी पुस्तक लिहायलाही मदत केली होती.
 
2006 साली असांज यांनी काही समविचारी लोकांसोबत 'व्हिसल ब्लोइंग' वेबसाइट विकिलीक्सची सुरूवात केली.
 
विकीलीक्सचं नेमकं झालं काय?
चित्रपट, उद्योगापासून राष्ट्रीय सुरक्षा आणि युद्धापर्यंतच्या सर्व विषयांवरील अनेक देशांतील गोपनीय कागदपत्रं विकिलीक्सनं प्रसिद्ध केली होती.
 
बगदादमध्ये अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरनं कशाप्रकारे 18 सामान्य नागरिकांना मारलं याचा एक व्हीडिओ विकिलीक्सनं 2010 साली प्रसिद्ध केला. त्यानंतर ही साइट प्रकाशझोतात आली. त्याचवर्षी विकिलीक्सनं अमेरिकन लष्कराची अनेक गोपनीय कागदपत्रं उघड केली.
 
अफगाणिस्तान युद्धाच्या वेळेस अमेरिकन लष्कराकडून कशा प्रकारे निरपराध नागरिकही मारले गेले होते, हे या कागदपत्रांमधून स्पष्ट होत होतं.
 
इराक युद्धाशी संबंधित कागदपत्रांमधून अमेरिकन लष्कराकडून 66 हजार नागरिकही मारले गेल्याचं उघड झालं.
 
या सर्व प्रकारानंतर अमेरिकन सरकारनं सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्र उघड केल्याप्रकरणी असान्जवर कारवाईचे संकेत दिले.
 
स्वीडनमधील आरोप काय होते?
स्वीडननेही 2010 साली असांज यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढलं. असान्जवर लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यांना युकेमध्ये अटक करण्यात आली आणि नंतर जामीनही मंजूर झाला.
 
त्यानंतर स्टॉकहोमला व्याख्यान द्यायला गेले असताना असांज यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि दुसऱ्या एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला.
 
असांज यांनी आपल्यावरील हे दोन्ही आरोप फेटाळून लावले आणि आपल्याविरोधातील हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचं म्हटलं.
 
इक्वेडोरच्या दूतावासामध्ये आश्रय
स्वीडनमधील चौकशी टाळण्यासाठी असान्ज यांनी 2012 साली इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात आश्रय घेतला.
 
गोपनीय कागदपत्रं प्रसिद्ध केल्याच्या आरोपाबद्दल आपल्याला अमेरिकेच्याही ताब्यात देऊन खटला दाखल केला जाईल, अशी भीती असान्ज यांनी व्यक्त केली होती.
 
इक्वेडोरच्या दूतावासाची निवड करण्यामागे एक खास कारण होतं. या दक्षिण अमेरिकन देशाचे तत्कालीन अध्यक्ष राफेल कोरिआ हे विकिलीक्सचे पुरस्कर्ते होते.
 
असांज दूतावासात वास्तव्य करत असताना त्यांना या केसबद्दल औपचारिकत्या सूचित करणं कठीण होत असल्यानं स्वीडननं असान्जविरोधातील चौकशी थांबविण्याचा निर्णय 2017 मध्ये घेतला. त्यांच्यावरील अन्य दोन आरोपही 2015 साली काढून टाकण्यात आले होते.
 
स्वीडननं जरी असांजवरील आरोप काढण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांनी इक्वेडोरमधील दूतावासातील आपला आश्रय कायम ठेवला.
 
इक्वेडोरनं काढून घेतला राजाश्रय
2017 साली इक्वेडोरमध्ये सत्तापालट झाला. लेनिन मोरेनो यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. त्यानंतर असांज याचे इक्वेडोरसोबतचे संबंध बिघडले.
 
इक्वेडोरनं असांजचा राजाश्रय काढून घेतला. गैरवर्तन, आंतराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आणि हेरगिरीचे आरोप करत इक्वेडोरनं असांजचा आश्रय काढून घेतला.
 
त्यानंतर असांज यांना लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात अटक करण्यात आली.
 
कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असं म्हणत ब्रिटनच्या तेव्हाच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी असान्ज यांच्या अटकेचं स्वागत केलं होतं.
 
ब्रिटीश तुरुंगातून सुटका
इराक आणि अफगाणिस्तानातील युद्धाबद्दलची माहिती असणाऱ्या विकीलीक्स फाईल्स जगजाहीर केल्याने अनेकांची आयुष्यं धोक्यात आली, असा दावा अमेरिकेने गेली अनेक वर्षं केला होता. गेली 5 वर्षं ब्रिटीश तुरुंगात घालवलेल्या असान्ज यांनी अमेरिकेत प्रत्यापर्णाचं प्रकरण तुरुंगातूनच लढवलं होतं.
 
वर्षभराच्या कायदेशीर लढाईनंतर विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकीलीक्सने म्हटलंय. यानुसार असांज युकेतून रवाना झाले असून ते अमेरिकेतील त्यांच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येईल.
 
बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी वृत्तसंस्था सीबीएस (CBS) च्या माहितीनुसार असांज यांना अमेरिकेत तुरुंगवास होणार नाही आणि त्यांनी युकेमध्ये तुरुंगवासात घालवलेल्या कालावधीच्या बदल्यात त्यांना 'क्रेडिट' मिळेल. (म्हणजे भविष्यात एखाद्या प्रकरणी तुरुंगवास झाल्यास त्यांनी युकेत तुरुंगात घालवलेल्या कालावधीचा काळ त्या शिक्षेतून वजा होईल.)
 
न्याय खात्याच्या पत्रानुसार असान्ज यानंतर ऑस्ट्रेलियाला परततील.
 
1901 दिवस लहानशा कोठडीत घालवल्यानंतर मंगळवारी असांज बेलमार्श तुरुंगातून बाहेर पडल्याचं विकीलीक्सने एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर म्हटलंय.
 
त्यानंतर 'दुपारी त्यांना स्टॅनस्टेड विमानतळावर सोडण्यात आलं, तिथून विमानाने युकेतून ऑस्ट्रेलियाला रवाना झाले' असंही या निवेदनात म्हटलंय.
 
विकीलीक्सने ऑनलाईन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जीन्स-निळ्या टीशर्टमधल्या असांज यांना स्टॅनस्टेड विमानतळाकडे नेताना दिसत असून त्यानंतर विमानात चढताना दिसतात.
 
Published By- Dhanashri Naik