रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: दुबई , मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (10:13 IST)

रंगतदार सामन्यात बंगळुरूची बाजी

येथील मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर सुपर ओव्हरमध्ये मात केली आहे. दोन्ही संघांमध्ये निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटला. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त सात धावा केल्या. नवदीप सैनीने सुपर ओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. मुंबईचा संघ सुपर ओव्हरमध्ये 7 धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे आरसीबीला विजयासाठी 8 धावांचे सोपे आव्हान मिळाले.

मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हर टाकतानाही भन्नाट मारा केला. परंतु शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्या आधी, 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार  यादव, क्विंटन डीकॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते. इशान किशनने 58 चेंडूत 2 चौकार आणि 9 षटकारांसह 99 धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचे शतक हुकले. पोलार्डने 60 धावा करत त्याला चांगली साथ दिली.