शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: दुबई , शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (14:05 IST)

धोनी ब्रिगेडचा आज विराट सेनेशी सामना

मागील सामन्यात आपापल्या प्रतिस्पर्धी संघांकडून पराभूत झालेली धोनी ब्रिगेडची चेन्नई सुपर किंग्ज व विराट सेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आज (शनिवारी) आयपीएलचा सामना होणार आहे. चेन्नईला कोलकाताकडून 10 धावांनी तर बंगळुरूला दिल्लीकडून 59 धावांनी सपाटून मार खावा लागल्याने दोन्ही संघ गत पराभव विसरून विजयी मार्गावर परतण्याच्या इराद्यांनी  मैदानावर उतरतील. दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंचा भरणा असून हे सर्व खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी आतूर झाले आहेत.
 
चेन्नईच्या संघातील केदार जाधवच्या बचावात्मक खेळीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. या सामन्यात त्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. शेन वॉटसन व फाफ डू प्लेसिस सलग चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, मधली फळी त्यांच्या चिंतेचा विषय आहे. स्वतः धोनीचा फॉर्मही हरवलेला आहे. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे कामगिरी करावी लागेल. चेन्नईच्या गोलंदाजांनी कोलकाताविरुध्द मागील सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. अष्टपैलू ड्‌वेन ब्राव्हो याने विकेट्‌सघेतल्या होत्या. पीयूष चावलाऐवजी नवख्या कर्ण शर्माने मोलाची भूमिका पार पाडताना विकेट्‌सही घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजीची दमदार दीपक चाहर, सॅम कुरेन आणि शार्दूल ठाकूर यांच्यावर असेल. चेन्नईकडे आता पुनरागमनाकडे अधिक वेळ बाकी नाही.
 
दुसरीकडे बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या लयीत आला आहे. युवा देवदत्त पड्रिकल आणि अनुभवी ए.बी. डी'व्हिलिर्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. एरॉन फिंचकडूनही आक्रमक खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीमध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर वगळता अन्य गोलंदाजांना छाप पाडता आली नाही. उमेश यादव, मोहम्मद सिराज व नवदीप सैनी महागडे सिध्द झाले आहेत. श्रीलंकेचा इसुरू उडाना याच्या आगमनामुळे गोलंदाजीला बळ मिळाले आहे.
 
बंगळुरूलाही आपल्या कमतरता तपासाव्या लागतील. दिल्लीविरूध्द त्यांची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली होती. या सामन्यात बंगळुरूचा पगडा जरी भारी वाटत असला तरी बंगळुरूच्या खेळाडूंनी चेन्नईला कमी लेखणे त्यांना महागात पडू शकते.
 
सामन्याची वेळ
संध्याकाळी 7.30 वाजता.