मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (09:00 IST)

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला आजपासून सुरुवात

संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहेत.
 
‘आयपीएल’ला यावर्षी ३० मार्चपासून प्रारंभ होणार होता, परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वप्रथम १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा लांबणीवर पडली. त्यानंतर मात्र ही स्पर्धा रद्द होण्यापर्यंतच्या चर्चाना सुरुवात झाली.  
 
गतविजेता मुंबईचा संघ यंदाही संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघांत अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य भरणा असल्यानेच त्यांनी चार वेळा ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवले आहे. मुंबईच्या लसिथ मलिंगाने माघार घेतली असली तरी जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनेघन असे वेगवान त्रिकूट त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कृणाल आणि हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड यांच्या रूपात मुंबईकडे गुणवान अष्टपैलूसुद्धा आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लीनला संघात सहभागी करून मुंबईने फलंदाजीची बाजू अधिक बळकट केली आहे.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसाठी ही ‘आयपीएल’ नक्कीच खास असेल. आतापर्यंतच्या १२ हंगामात धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने सर्वाधिक आठ वेळा अंतिम फेरी गाठली. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या माघारीमुळे चेन्नईला निश्चितपणे फटका पडला असून यंदा त्यांच्यापुढे नव्याने संघबांधणीचे आव्हान असेल. परंतु अमिरातीतील खेळपट्टय़ांवर फिरकीच्या बळावर सामने जिंकवून देण्यासाठी चेन्नईकडे इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, पीयूष चावला असे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहेत. फलंदाजीत शेन वॉटसन, अंबाती रायुडू, धोनी चेन्नईला तारतील तर ड्वेन ब्राव्हो नेहमीप्रमाणे अष्टपैलू खेळाडूची भूमिका समर्थपणे सांभाळेल.
 
* सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
 
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी १ (दोन्ही एचडी वाहिन्यांवर)