मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (16:32 IST)

IPL 2021: मराठी बोलू शकणारा ऑस्ट्रेलियन चेन्नईच्या ताफ्यात

चेन्नई सुपर किंग्सने फास्ट बॉलर जोश हेझलवूडऐवजी ऑस्ट्रेलियाच्याच जेसन बेहनड्रॉफला संघात समाविष्ट केलं आहे. बेहनड्रॉफ याआधी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. डावखुरा, उंचपुरा बेहनड्रॉफ वेगवान आणि अचूक बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे.
 
मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना बेहनड्रॉफला, सूर्यकुमार यादव मराठी शिकवत असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
 
"माझं नाव जेसन आहे आणि मी बॉलिंग करतो", हे वाक्य बोलताना बेहनड्रॉफचा गोंधळ उडाला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे वाक्य नीट म्हणून दाखवलं होतं.
 
कसं काय पलटण? हे वाक्य जेसनने सहज म्हणून दाखवलं.
 
"लय भारी मुंबई" हे वाक्य जेसनने पटकन म्हणून दाखवलं.
सूर्यकुमारच्या शिकवणीनंतर बेहनड्रॉफने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. कसं काय रोहित? लय भारी असं सांगत बेहनड्रॉफने रोहितला चकित केलं. बेहनड्रॉफचं मराठी ऐकून तिथे उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
 
मी मराठी शिकतो आहे. सूर्या चांगला शिक्षक आहे असं बेहनड्रॉफने सांगितलं.
 
पुढच्या वर्षी तू महाराष्ट्राचा माणसासारखा बोलू शकशील, असा विश्वास रोहितने व्यक्त करतानाच त्याला शुभेच्छा दिल्या.
 
मुंबई इंडियन्सने हा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला होता.
आता हाच बेहनड्रॉफ मुंबईविरुद्ध खेळताना दिसेल.
 
30 वर्षीय बेहनड्रॉफने 11 वनडे आणि 7 ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
2019 मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात बेहनड्रॉफने मुंबई इंडियन्ससाठी 5 सामने खेळताना 5 विकेट्स घेतल्या होत्या.
 
चेन्नई याआधीही ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सवर विश्वास दाखवला आहे. बेन हिल्फेनहॉस, डग बोलिंजर, डर्क नॅन्स, जॉन हेस्टिंग्ज या ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सनी चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व केलं आहे.