चेन्नईला मोठा धक्का, दीपक चहरला दुस-यांदा दुखापत, आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता
आयपीएल 2022 मध्ये सलग चार सामने पराभूत झालेल्या चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या दीपक चहरला दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याच्या स्नायूंना दुखापत झाली होती. चहर दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत होता आणि एप्रिलच्या अखेरीस तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती. आता चहरला स्नायूंच्या दुखापतीतून सावरण्यापूर्वीच दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. यावेळी त्याच्या पाठीला दुखापत झाली असून आता त्याच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
चेन्नई संघाला चहरची उणीव आधीपासूनच होती. त्याच्या अनुपस्थितीत सीएसकेला सलग चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्याच्या आगमनानंतर सीएसके अधिक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना दुसऱ्यांदा झालेल्या दुखापतीमुळे संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. दीपकच्या जागी मुकेश चौधरीला संधी देण्यात आली आहे, पण चेन्नईच्या पॉवरप्लेमध्ये एकाही गोलंदाजाला विकेट मिळवता आलेली नाही.
25 एप्रिल रोजी होणाऱ्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चहर खेळू शकतो, अशी शक्यता आहे. तोपर्यंत चेन्नईला त्याच्याशिवाय पाच सामने खेळावे लागणार आहेत. यादरम्यान चेन्नई संघाला 12 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 17 एप्रिलला गुजरात टायटन्स आणि 21 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे. दीपक 25 एप्रिलला परतला असता, तर चेन्नईचे साखळी फेरीत सात सामने शिल्लक राहिले असते आणि उर्वरित सामने जिंकून हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला असता, पण आता त्याच्या आशा संपल्या आहेत.