रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (20:19 IST)

IPLची भोजपुरीतून कॉमेंट्री : मीम्स, चर्चा, गहजब आणि एकदम निखळ आनंद…

अरे उठाके हेलिकप्टर घुमाइ देला. बहरा जाता छक्का. जियो रे बाबू. जियो जवान गंगा के तीरे, ई शॉट नाही बा हो धीरे यंदाचं आयपीएल दोन विभिन्न प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित होत आहे. टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सवर सामन्यांचे प्रक्षेपण होत आहे. ओटीटीवर जिओ सिनेमा ऍपवर सामन्यांचं प्रक्षेपण होत आहे.
 
जिओ सिनेमाने असंख्य प्रादेशिक भागांमध्ये समालोचन उपलब्ध करुन दिलं आहे. आयपीएल सामन्यांचा थरार हळूहळू रंगतो आहे, मात्र चर्चा भोजपुरी कॉमेंट्रीची होते आहे.
 
ट्वीटवर यासंदर्भात हॅशटॅगही ट्रेंड होतो आहे. जिओ सिनेमाने इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, उडिया, बंगाली, तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि भोजपुरी अशा 12 भाषांमध्ये समालोचनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
पहिल्यांदाच पंजाबी आणि भोजपुरी भाषांमध्ये समालोचनची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 
भोजपुरी समालोचकांमधलं एक नाव म्हणजे भाजप खासदार आणि अभिनेते रवि किशन. रवि किशन यांच्या भोजपुरी समालोचनाचे चाहते वाढत आहेत.
 
काही चाहते भोजपुरी समालोचनाचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काहीजण या समालोचनावर टीकाही करत आहेत. रवी किशन यांच्याबरोबरीने गुलाम हुसेन हेही समालोचन करत आहेत.
 
भोजपुरी समालोचनाबाबत रवि किशन काय म्हणाले?
"मी क्रिकेटचा प्रचंड चाहता आहे. भोजपुरी टीममध्ये मनोज तिवारीच्या बरोबर क्रिकेट खेळलो आहे. मातृभाषेत समालोचन करण्याचा आनंद अनोखा आहे. मातृभाषेसाठी काहीतरी करण्याचा माझा हा प्रयत्न आहे", असं रवि किशन यांनी सांगितलं.
 
भोजपुरी समालोचनाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत रवि किशन म्हणाले, "भोजपुरी समालोचनाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. भोजपुरी भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाचे आभार. जय भोजपुरी. खूप आनंद झाला. तुम्ही समालोचनाचा असाच आनंद घेत राहा".
 
2011 जनगणनेनुसार भारतात जवळपास 5 कोटी भोजपुरीभाषक आहेत. पण हा आकडा संदर्भानुसार बदलताना दिसतो. रवि किशन यांच्याच एका व्हीडिओत जगभरात भोजपुरी बोलणाऱ्यांची संख्या 25 कोटी असल्याचं सांगितलं होतं.
 
जगात 15 विविध देशांमध्ये भोजपुरी बोलली जाते. मॉरिशस, फिजी, त्रिनिदाद अँड टोबॅगो, नेपाळसह दक्षिण अमेरिकेतील काही देशांचा समावेश आहे.
 
आपल्या देशात भोजपुरी भाषा प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात बोलली जाते. या राज्यांच्या बरोबरीने मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ इथेही भोजपुरी बोलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
 
जिओ सिनेमाने आयपीएल समालोचन भोजपुरीत उपलब्ध करुन देण्यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक भोजपुरी मार्केटही आहे.
भोजपुरी समालोचनाची काही उदाहरणं
और इ गेंदा गइल छपरा रेलवे स्टेशन के टिकट काउंटर प
 
ई तो दु तल्ला, तीन तल्ला पर चल जाई. आरा छपरा चल जाई
 
ई का हो, मुहवां फोड़ब का? नो बाल
 
गंगा के तीरे, ई शॉट नाही बा हो धीरे
 
अरे उठाके हेलिकप्टर घुमाइ देला. बहरा जाता छक्का. जियो रे बाबू. जियो जवान
भोजपुरी समालोचनाचं कौतुक
आयपीएलचा हा हंगाम 74 दिवस चालणार आहे. तूर्तास पाचच सामने झाले आहेत. पण एवढ्या कमी कालावधीत भोजपुरी समालोचनाला जो प्रतिसाद मिळतो आहे तो हुरुप वाढवणारा आहे.
 
सोशल मीडियावर भोजपुरी समालोचनावर टीका करणारेही आहेत. भावना अरोरा लिहितात, आयपीएलचं समालोचन अनेक भाषांमध्ये होत आहे. प्रादेशिक भाषेचा खरा आस्वाद भोजपुरीतच मिळतो आहे.
 
सूर्या लिहितात, भारत पाकिस्तान सामन्यालाही रवि किशन यांना समालोचन कक्षात आणा.
 
उज्ज्वल सिन्हा लिहितात, यंदाच्या आयपीएलमधली चांगली गोष्ट म्हणजे भोजपुरी समालोचन.
 
नबील जैदी लिहितात, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई हरल्याने नाराज होतो. मग मी भोजपुरी समालोचन सुरू केलं. एकदम निखळ आनंद.
 
सागर नावाच्या युझरने मीम शेअर केलं. सट्ट से अंदर घुस गइल. बाप रे किल्ला उखड गेला असं भोजपुरी वाक्य मीममध्ये लिहिलं आहे.
 
भोजपुरी समालोचनावर टीका
एकीकडे भोजपुरी समालोचनाची प्रशंसा होत असताना काहींना मात्र हा प्रयत्न आवडलेला नाही.
 
नवीन तिवारी लिहितात, "भोजपुरी समालोचन अतिशय खराब. टपराट अशा भोजपुरी सिनेमाचं डबिंग सुरू ऐकल्यासारखं वाटतं".
 
भोजपुरी समालोचनात आरा, छपरा, गोपाळगंज या ठिकाणी फलंदाजांनी मारलेला षटकार पोहोचत असल्याचे उल्लेख आहेत.
 
यावर नवीन लिहितात, "यासारख्या अतिशयोक्ती गोष्टी दोन तीन सामने चालू शकतात. काही दिवसांनंतर याचा कंटाळा येईल".
 
अजित यादव लिहितात, "प्रत्येक जिल्ह्यात भोजपुरी भाषा बदलते, त्यामुळे हे समालोचन काहींना आवडतं, काहींना नाही".
 
प्रियांशु कुशवाहा लिहितात, "आयपीएल सामन्यांचं भोजपुरी समालोचन ऐकतो आहे. जिओ सिनेमाचा हा उपक्रम चांगला आहे. पण एक तक्रार आहे. भोजपुरी समालोचनासाठी ज्यांची निवड झाली आहे त्यांना आधी भोजपुरीची शिकवणी लावावी अन्यथा काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवावं. मातृभाषेचा इतका अपमान सहन करु शकत नाही".
 
अभिनव मौर्या लिहितात, "ज्यांना क्रिकेटचा जराही गंध नाही त्यांना समालोचनाचं काम दिल्यावर काय अपेक्षा करणार?"
 
बिहार आणि उत्तर प्रदेशात अनेक क्रिकेटपटू उत्तम भोजपुरी बोलतात. त्यांना संधी द्यायला हवी होती.
 
डॉ. देवेंद्र लिहितात, "भोजपुरी समालोचनाच्या नावाखाली काहीही बोललं जात आहे. उदाहरणार्थ विराट कोहली खेलत नइखन, गेंदबाज के साथ खिलवाड करत बाडे. पुअरा के पलानी बनावत बाडे. इ शॉट ना ह, दाल भात चोखा इ".
 
भोजपुरीचा वाढता परीघ
भोजपुरी भाषेत जे चित्रपट येत होते, ज्या पद्धतीची गाणी येत होती-त्यांच्यावर सातत्याने टीका व्हायची
 
भोजपुरी सिनेमा आणि गाण्यांवर अश्लीलतेचा आरोपही होत असे. पण गेल्या काही वर्षात भोजपुरी गाणी, सिनेमा मुख्य प्रवाहात येतो आहे.
 
कोरोना लॉकडाऊननंतर दिग्दर्शक अभिनव सिन्हा आणि मनोज वाजपेयी यांचं गाणं 'बंबई का बा' याची जोरदार चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच अनुभव सिन्हांचा चित्रपट 'भीड' मध्येही एक भोजपुरी गाणं होतं. हे गीत डॉ. सागर यांनी लिहिलं होतं.
 
राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत 22 भाषांचा समावेश आहे. या यादीत भोजपुरीचा समावेश व्हावा यासाठी सातत्याने मागणी होते आहे.
 
भोजपुरी भाषेचे जाणकार आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सदानंद शाही यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, "भोजपुरी भाषेचा इतिहास एक हजार वर्ष पुरातन आहे. कवी गोरखनाथ यांच्या कवितेत भोजपुरी शब्दांचे उल्लेख आढळतात. संतांची प्राचीन अशी परंपरा आहे, ज्यामध्ये भोजपुरी कवितांचे उल्लेख आणि गूढ रहस्यं सापडतात".
 
मराठीतही समालोचन
जिओ सिनेमाने मराठीतही समालोचनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. माजी क्रिकेटपटू किरण मोरे, धवल कुलकर्णी, केदार जाधव, सिद्धेश लाड यांच्याबरोबरीने कुणाल दाते, विकट पाटील, चैतन्य संत आणि प्रसन्न संत मराठी समालोचन करत आहेत. पूर्वी भावे सामन्याआधीच्या आणि सामन्यानंतरच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात.
 
Published by-Priya Dixit