शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शनिवार, 31 मे 2008 (00:47 IST)

वॉर्नच्या राजस्थानचा फायनलमध्ये 'रॉयल' प्रवेश

राजस्थानने सेहवागच्या दिल्लीवर स्वारी करून 105 धावांनी विजय संपादन करताना आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 'रॉयल' प्रवेश केला. शेनच्या जोडगोळीने दिल्लीचा अवघ्या 87 धावात खुर्दा उडवला. एकोणतीस चेंडूत बावन्न धावा तडकवून दहा चेंडूत 3 बळी घेणार्‍या शेन वॅटसनने सानावीराचा पुरस्कार पटकवला.

वॉर्नच्या 'रॉयल' संघास ग्रॅमी स्मिथ व असनोडकरने तडाखेबंद सुरूवात दिल्यानंतर युसुफ पठाण व शेन वॅटसनने उत्तरार्धात फटकेबाजी करून धावांचा पाऊस पाडला. राजस्थानने दिल्लीसमोर वीस षटकात 193 धावांचे अवघड लक्ष धेवले.

दिल्लीची भिस्त सेहवाग व गंभीरवर अवलंबून होती. मात्र वॅटसनने प्रारंभीच तीन बळी मिळवून दिल्लीचे पंख कापले. यानंतर वॉर्नने फिरकीची जादू दाखवत दोन बळी घेतले. मुनाफ पटेलनेही तीन बळी घेत दिल्लीचा धुव्वा उडवला.

दिल्लीकडून फक्त तिलकरत्ने दिलशानने सन्मानजक 33 धावांची खेळी केली. वॉर्नच्या नेतृत्वाखालील रॉयल्स संघाने खेळाच्या सर्वच विभागात दिल्लीस निष्प्रभ ठरवत एकतर्फी विजय संपादन केला. दिल्लीचा डाव सोळा षटकात अवघ्या 87 धावांवर आटोपला.

उपांत्य सामन्यातील थरारापासून मात्र प्रेक्षक वंचितच राहिले. सेहवागच्या 'डेव्हिल्स'नी वॉर्नच्या 'रॉयल्स' समोर सपशेल शरणागती पत्करली. शनिवारी पंजाब व चेन्नईदरम्यान होणार्‍या सामन्यातून विजयी ठरणार्‍या संघासोबत राजस्थानची अंतिम सामन्यात गाठ पडणार आहे. अंतिम सामना रविवारी मुंबईत होणार आहे.