अख्तर पाकिस्तानी संघावर ओझे
रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर पाकिस्तानी संघावर एक प्रकारचे ओझे असून त्याची वर्तणूक योग्य नसल्याची टीका पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष शहरयार खान यांनी केली आहे. मागील दोन वर्षापासून शोएब अख्तर, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक, कर्णधार हे मंडळासाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. कारण, ते संघासाठी खेळत नसून आपल्या वयैक्तीक खेळावर अधिक भर देत आहेत. त्याचा विपरीत परिणाम संघातील इतर खेळाडूंवर होत असल्याचे खान यांनी जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अख्तर जेव्हा खेळत नाही तेव्हा संघ चांगले प्रदर्शन करून विजय प्राप्त करतो. तो अजून परिपक्व झाला नसून प्रसिद्धी आणि पैशाच्या जोरावर उद्धटपणे वागत आहे. अशा प्रकारच्या वर्तणुकीचा ड्रेसिंग रूममध्ये नकारात्मक परिणाम होत आहे. यावर पर्याय म्हणून अख्तरच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्याला समजावून सांगण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहीला असल्यचे खान यांनी सांगितले.