रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

5G तंत्रज्ञानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो का?

ब्रिटनमधल्या काही शहरांमध्ये आता 5G मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबतच तिचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो का, हा प्रश्नही विचारला जातोय.
 
दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झरलँडसारख्या काही देशांमध्ये आणि अमेरिकेतल्या काही प्रातांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे आणि येत्या दोन-चार वर्षात इतरही देशांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरू होणार आहे. असं असताना या तंत्रज्ञानाविषयी कोणती चिंता भेडसावत आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी काही ठोस पुरावे आहेत का?
 
5G तंत्रज्ञानाचं वेगळेपण काय?
पूर्वीच्या इतर सेल्युलर तंत्रज्ञानाप्रमाणेच 5G नेटवर्कदेखील रेडियोलहरींच्या सिंग्नलवर अवलंबून आहे. हे सिग्नल अॅँटेना किंवा मास्टवरून तुमच्या मोबाईलवर पाठवले जातात.
 
आपण कायम विद्युतचुंबकीय किरणांनी (electromagnetic radiations) वेढलेलो आहोत. टिव्ही, रेडियो याच लहरींवर चालतात. इतकंच नाही तर मोबाईल फोनसारख्या तंत्रज्ञानातही यांचा उपयोग होतो. अगदी सूर्यप्रकाशासारखा नैसर्गिक स्रोतही त्याला अपवाद नाही.
 
पूर्वीच्या मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत 5G तंत्रज्ञानात दीर्घ लहरींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे एकाचवेळी अधिकाधिक उपकरणांना इंटरनेट मिळू शकतं. शिवाय, इंटरनेटचा स्पीडही जास्त असतो.
 
शहरी भागांमध्ये या लहरी कमी अंतर कापू शकतात. त्यामुळे 5G नेटवर्कला पूर्वीच्या नेटवर्कपेक्षा अधिक ट्रान्समीटर्स मास्टची गरज असते. ते तुलनेने जमिनीच्या अधिक जवळ उभारले असतात.
 
चिंतेचं कारण काय?
सर्व मोबाईल फोन तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे अनेकांना आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती काहींना वाटते.
 
2014 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं होतं, "मोबाईल फोनच्या वापरामुळे आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होत असल्याचं आढळलेलं नाही."
 
असं असलं तरी इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) या संस्थेसह जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमुळे (ज्याचा मोबाईल सिग्नल हादेखील एक भाग आहे.) 'कॅन्सर होण्याचा धोका उद्भभू शकतो' असं म्हटलेलं आहे.
 
या रेडिएशन म्हणजेच किरणांना या श्रेणीत ठेवण्यामागचं कारण म्हणजे "या किरणांच्या सानिध्यात येण्याने माणसाला कॅन्सर होऊ शकतो, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत."
 
मसालेदार अन्नपदार्थ खाणं आणि टॅल्कम पावडर वापरणंही यामुळेही तेवढाच धोका संभवतो.
 
मद्यपान आणि प्रोसेस केलेला मांसाहार यांना जास्त धोकादायक श्रेणीत टाकण्यात आलं आहे.
 
अमेरिकेच्या आरोग्य विभागाने विष विज्ञानाविषयी (toxology) 2018 साली प्रसिद्ध केलेल्या अहवालातही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संशोधनात रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमध्ये ठेवलेल्या नर उंदरांच्या हृदयात कॅन्सरसारखी गाठ तयार झाल्यात आढळलं.
 
या अभ्यासात उंदरांना त्यांच्या जन्माच्या आधीपासून दोन वर्ष दररोज नऊ तास मोबाईल फोनच्या रेडिएशनमध्ये ठेवण्यात आलं. यातल्या उंदरांच्या माद्यांचा कॅन्सरशी कसलाही संबंध आढळला नाही. उलट या प्रयोगात असंही आढळलं की ज्या उंदरांना या रेडिएशनमध्ये ठेवण्यात आलं ते इतर उंदरांच्या तुलनेत अधिक जगले.
 
हे संशोधन करणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितलं की एखादी व्यक्ती मोबाईलचा अतिवापर करत असली तरीदेखील, "या अभ्यासात जे एक्सपोजर देण्यात आलं त्याची मोबाईल फोन वापरताना एखादी व्यक्ती जे एक्सपोजर अनुभवते त्याच्याशी थेट तुलना करता येणार नाही."
 
सुरक्षितरित्या मोबाईल फोन वापरण्यासंबंधी सरकारला सल्ला देणाऱ्या मंडळात असणारे डॉ. फ्रँक डी व्होच म्हणतात, "अतिवापर करणाऱ्यांपैकी काहींना कॅन्सरचा धोका अधिक असू शकतो, असं काही संशोधनात आढळलं असलं तरी प्रतिबंधात्मक उपाय करावे, यासाठी पुरेसे खात्रीशीर पुरावे मिळू शकलेले नाही."
 
असं असलं तरी काही शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी युरोपीय महासंघाला (EU) 5G तंत्रज्ञान अद्याप सुरू करू नका, असं लेखी निवेदन दिलं आहे.
 
रेडिओ लहरी non-ionising असतात
मोबाईल फोन नेटवर्कसाठी वापरण्यात येणारे रेडिओ व्हेव बँड नॉन-आयोनाझिंग असतात. म्हणजे त्याच्या मूलद्रव्यातून लोह मोकळे करता येत नाही. "याचाच अर्थ डीएनए वेगळे करण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी ऊर्जा त्यात नसते", असं भौतिकशास्त्रज्ञ आणि कॅन्सरवर संशोधन करणारे डेव्हिड रॉबर्ट ग्रीम्स यांचं म्हणणं आहे.
 
मोबाईल फोनद्वारे वापरण्यात येणाऱ्या फ्रिक्वेन्सीपेक्षाही इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम खूप जास्त असेल, अशावेळी आरोग्याला नक्कीच धोका उद्भवू शकतो.
 
सूर्याची अतिनील किरणं या घातक श्रेणीत येतात. त्यांच्यामुळे त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो.
 
वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या एक्सरे, गॅमारे यासारख्या रेडिशन लेव्हल अतिशय जास्त असणाऱ्या किरणांच्या संपर्कात येण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्वं आहेत. या दोन्हीचे माणसाच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.
 
डॉ. ग्रीम्स म्हणतात, "कॅन्सरचा धोका वाढवायचा का, याविषयी लोकांना काळजी आहे आणि हे समजून घेता येतं. मात्र, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की रोज जो प्रकाश आपल्याला दिसतो, त्यापेक्षा रेडिओ लहरीची उर्जा खूप कमी असते."
 
ते पुढे सांगतात, "मोबाईल फोन किंवा वायरलेस नेटवर्कमुळे आरोग्यवर परिणाम झाला आहे, यासाठीचे ठोस पुरावे नाहीत."
 
5G ट्रान्समीटरची भीती बाळगावी का?
5G तंत्रज्ञानासाठी अनेक नवीन बेस स्टेशन्स गरजेचे आहेत. हे बेस स्टेशन्स म्हणजेच ट्रान्समीटर् किंवा मास्ट. या ट्रान्समीटरवरून मोबाईल फोनचे सिग्नल पाठवले किंवा स्वीकारले जातात.
 
मात्र, ट्रान्समीटरची संख्या वाढल्यामुळे 4G तंत्रज्ञानापेक्षा 5G एन्टेनामधून निघणाऱ्या रेडिएशनची पातळी कमी असेल.
 
मोबाईल फोनच्या बेस स्टेशनसंबंधीच्या (टॉवरसंबंधीच्या) ब्रिटन सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की सार्वजनिक ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी फिल्ड नियमात आखून दिलेल्या पातळीपेक्षा खूप कमी आहे.
 
उष्णतेच्या धोक्याचं काय?
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवागी असलेल्या 5G स्पेक्ट्रमचा एक भाग सूक्ष्मलहरी (मायक्रोव्हेव) बँडमध्ये येतो.
 
सूक्ष्मलहरी ज्या वस्तूतून जातात त्यात उष्णता निर्माण करतात.
 
मात्र, पूर्वीच्या मोबाईल तंत्रज्ञानाप्रमाणेच 5G तंत्रज्ञानात सूक्ष्मलहरींचं प्रमाण इतकं कमी आहे की त्यातून निर्माण होणारी उष्णता अजिबात धोकादायक नसते, असं प्रा. रॉड्नी क्रॉफ यांचं म्हणणं आहे. Non-Ionizing Radiation Protection (ICNIRP) या आंतरराष्ट्रीय आयोगाचे ते सल्लागार आहेत.
 
ते सांगतात, "5G तंत्रज्ञानात (किंवा सार्वजनिक स्थळी असलेल्या कुठल्याही सिग्नलमध्ये) रेडिओ फ्रेक्वेंसीची कमाल पातळी इतकी कमी असते की आजवर कुठल्याही तापमानवाढीची नोंद झालेली नाही."
 
एक्सपोजरवर मर्यादा
ब्रिटनच्या सरकारचं म्हणणं आहे की, "सध्याच्या नेटवर्कमध्ये 5Gची भर पडल्यावर रेडिओ लहरींच्या एकंदरीत एक्सपोजरमध्ये किंचीत भर पडेल. मात्र, एकंदरीत एक्सपोजर कमीच राहील, असा अंदाज आहे."
 
येऊ घातलेल्या 5G सिग्नलची फ्रिक्वेंसी रेंज इलेक्ट्रोमॅगनेटिक स्पेक्ट्रमच्या नॉन-आयोनायझिंग बँडच्या आतच आहे आणि ICNIRP ने आखून दिलेल्या घातक पातळीपेक्षाही कमी आहे.
 
प्रा. क्रॉफ्ट म्हणतात, "5G तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या एक्सपोजरचा ICNIRP ने गहन अभ्यास केला. हे एक्सपोजर घातक ठरू शकणाऱ्या 5G संबंधित रेडिओ लहरींच्या सर्वात खालच्या पातळीच्याही खूप खाली असावं, यासाठी बंधनं घालून देण्यात आली आहेत."
 
ICNIRP च्या मार्गदर्शक तत्त्वात शिफारस करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षाही कमी इलेक्ट्रोमॅगनेटिक फ्रिक्वेसी एक्सपोजरचा आरोग्यावर कुठलाही ज्ञात परिणाम झालेला आढळला नाही.