गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (23:13 IST)

लहान मुलांना पळवत असल्याचे, धर्मांतराचे खोटे व्हीडिओ कसे ओळखाल? वाचा-

एक व्हीडिओ तुमच्या पाहाण्यात बहुदा आला असेल त्यात एका बुरखा घातलेल्या बाईला एक माणूस मारत आहे आणि तिच्या हातात एक मूल आहे. नंतर तो माणूस त्या बाईचा बुरखा फाडतो, तर त्यातून एक पुरूष समोर येतो.
त्यानंतर हिंदीतून एक संदेश दिला जातो तो असा – “अशा प्रकारच्या गुन्हेगारांपासून सावधान, हे लोक बुरखा घालून मुलं पळवण्याचं काम करतात.”
 
हा व्हीडिओ युट्यूबवर या वर्षाच्या सुरुवातीला पब्लिश झाला होता पण तो डिलिट होण्याआधी 2.9 कोटी
 
पेक्षा जास्तवेळा पाहिला गेला होता.
 
पण हा व्हीडिओ खरा नाही. तो ठरवून स्क्रिप्ट करून तयार करण्यात आला होता. त्यातील कलाकारसुद्धा नवशिके होते.
 
हा स्क्रिप्टेड व्हीडिओ मनोरंजनासाठी तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण तरीही तो सोशल मीडियावर खरा असल्याचं सांगत जोरदार व्हायरल केला जातोय.
 
असे अनेक खोटे व्हीडिओ भारतात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यातून धार्मिकद्वेष आणि पुरूषी वर्चस्ववादाचा प्रसार होत असतो.
 
भारतात गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक तेढ वाढताना दिसतेय, खास करून हिंदू आणि मुस्लीम धर्मियांमध्ये. 2014 पासून त्यात वाढ झाली आहे.
 
खोट्या अफवांच्या आधारे अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात आहे. महिलांविरोधात मॉरल पोलिसींगसुद्धा वाढलं आहे.
 
अशा प्रकारचे खोटे व्हीडिओ तयार करण्याचा ट्रेन्ड आता हिंदीसह तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी आणि तेलुगू भाषांपर्यंत पोहोचला आहे. अनेकदा लोकल मीडिया चॅनेल्स चुकून ते चालवतातसुद्धा.
 
यातल्या अनेक व्हीडिओंमध्ये बुरखा घातलेली बाई लहान मुलांना चोरून घेऊन जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याचे आता वास्तविक जीवनात फार गंभीर परिणाम उमटत आहेत. अनेक ठिकाणी मुलं चोरी करण्याच्या संशयाने लोकांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे अशा खोट्या व्हीडिओंवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीस करतात.
 
हे व्हीडिओ घातक का आहेत?
 
असे व्हीडिओ बरेचदा अशा प्रकारे तयार करण्यात आलेले असतात जेणेकरून सोशल मीडियावर तो व्हीडिओ पाहाणाऱ्याची दिशाभूल होईल. काही व्हीडिओंमध्ये डिस्क्लेमर असतात पण ते एकतर दिसणार नाहीत अशा पद्धतीने दिलेले असतात किंवा मग ते व्हीडिओच्या शेवटी असतात.
 
अनेकदा तर हे डिस्क्लेमर इंग्रजीत असतात. जे प्रत्येकाला समजतातच असं नाही.
 
फॅक्टचेक पोर्टल अल्ट न्यूजनुसार – वर उल्लेख केलेली पुरुषाने बुरखा घातलेली क्लिप नंतर त्या टूट्यूब चॅनेलच्या मालकाने डिलिट केली. त्यात ही एक काल्पनिक घटना असल्याचा उल्लेख तर होता, पण तो फक्त काही सेकंदच दिसत होता.
 
काही व्हीडिओ क्रिएटर तर त्यांचे अशा प्रकराचे व्हीडिओ खरे वाटावेत म्हणून ते सीसीटीव्हीच्या फॉरमॅटमध्ये तयार करतात. जेणेकरून पाहाणाऱ्याला आपण सीसीटीव्हीचं फुटेज पाहात आहोत असं वाटेल.
 
असाच एक व्हीडिओ 2021मध्ये व्हायरल झाला होता. ज्याची कुठलीही शाहनिशा करण्यात आली नव्हती की त्याचे कुठले पुरावे होते. या व्हीडिओत एक मुस्लीम पुरुष हिंदू मुलींच्या जेवणात मादक पदार्थ मिसळताना दाखवण्यात आला होता.
 
या व्हीडिओच्या खाली मुस्लिमविरोधी कमेंट करण्यात आल्या होत्या. त्यात ‘लव्ह जिहादपासून सावधान’ अशा कमेंट देखील करण्यात आल्या होत्या.
 
व्हायरल होणारे असे अनेक व्हीडिओ हैदराबादमधल्या वेंकट सीपाना यांनी तयार केल्याचं दिसून आलंय. त्यांनी त्यांच्या अनेक व्हीडिओंमध्ये एकतर सीसीटीव्ही फुटेज किंवा छुपा कॅमेरा रेकॉर्ड करत असल्याचं भासवलं आहे. त्यांच्या या यूट्यूब चॅनेलला 1.2 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. तसंच त्यांच्या या चॅनेलवर 400 पेक्षा जास्त असे व्हीडिओ आहेत.
 
एका व्हीडिओत तर एक टेलर एका महिलेशी गैरवर्तणूक करताना दिसत आहे. ‘हिंदू माता-भगिनींनी अशा मुस्लीम टेलर्सच्या दुकानात जाऊ नये ते वाईट मनोवृत्तीचे असतात,’ अशा कॅप्शनसह हा व्हीडिओ ट्विटर आणि फेसबुकवर अनेकदा शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओत दावा करण्यात आला आहे की एक मुस्लिम टेलर एका हिंदू महिलेशी गैरवर्तणूक करत आहे.
 
“लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी हे व्हीडिओ तयार केलेत,” असं सीपाना यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.
 
अशा प्रकारे ठरवून तयार करण्यात आलेल्या व्हीडिओंमुळे कदाचित हिंसाचार नाही होणार, पण त्यामुळे दोन धर्मांमध्ये निर्माण झालेली दरी मात्र आणखी वाढेल, असं पत्रकार आणि अपमाहिती संशोधक एलिशान जाफरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.
 
“हे व्हीडिओ आधीच दुभंगलेल्या आणि ध्रुवीकरण झालेल्या समाजात इंधन ओतण्याचंच काम करत आहेत. यातले बरेचसे व्हीडिओ एकाच समाजाला लक्ष्य करणारे असतात. खास करून मुस्लीम. आणि जेव्हा ते व्हायरल होतात तेव्हा ते त्यांच्याविरुद्ध पद्धशीर हिंसाचाराला खतपाणीच घालतात,” जाफरी सांगतात.
 
काहीवेळा हे स्क्रिप्टेड व्हीडिओ संभ्रम निर्माण करतात. मग नंतर ते आणखी द्वेष पसरवण्याचं काम करतात.
 
काही व्हीडिओंमध्ये कुटुंबातील सदस्य, मित्र आणि आप्तेष्टांमध्ये अनैतिक संबंध असल्याचं दाखवतात. त्यात अनेकदा लोकांच्या वयांमध्ये मोठा फरकसुद्धा दाखवला जातो.
 
असे दोन व्हीडिओ मे महिन्यामध्ये जोरदार व्हायरल करण्यात आले होते. त्यात हिंदूंवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला होता.
 
पहिल्या व्हीडिओत भगवे कपडे घातलेला एक इसम दावा करत आहे की तो त्याच्या बहिणीशी लग्न करत आहे.
 
दुसऱ्या व्हीडिओत तिच महिला बुरखा घातलेली दाखवण्यात आली आहे, ज्यात तो इसम दावा करत आहे की तिला हिंदू धर्मात घेण्यासाठी तिच्याशी विवाह करत आहे.
 
ट्वीटरवर ही क्लिप शेअर करत काही लोकांनी दावा केला आहे की यामध्ये सदर व्यक्तीनं त्याची बहीण मुस्लिम असल्याचा दिखावा केला आहे.
 
या दोन्ही व्हीडिओमधील महिला आणि पुरूष इतरही अनेक व्हीडिओंमध्ये एकत्र दिसून आले आहेत. त्यात त्यांनी वेगवेगळे रोल केले आहेत.
 
याची ओरिजनल क्लिप एका यूट्यूब चॅनेलवर आहे. ज्याचे 4 लाख फॉलॉअर्स आहेत. या यूट्यूब चॅनेलवरील बहुतेक व्हीडिओ हे स्क्रिप्टेड आहेत.
 
हे व्हीडिओ जरी स्क्रिप्टेड असले तरी ते खरे असल्याचं लोकांना वाटतं, याबाबत या यूट्यूब चॅनेल्सचे मालक विक्रम मिश्रा यांना बीबीसीने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, “आम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे. जे व्हीडिओ लोकांमध्ये चालू शकतील असेच व्हीडिओ आम्ही तयार करतो.”
 
“हे व्हीडिओ लोकांचं मनोरंजन आणि व्ह्यूजसाठी तयार केले आहेत. आमची 12 जणांची टीम आहे आणि त्यातूनच आमची कमाई होते.”
 
बीबीसीनं या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशीदेखील संपर्क केला. तसंच अशा संदर्भहीन नाटकीय व्हीडिओंबाबत त्यांचं धोरण काय आहे असा सवालदेखील केला.
 
हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या व्हीडिओंना आळा घालण्यासाठी आमच्याकडे सुस्पष्ट नियम आहेत, असं मेटाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणारे असे व्हीडिओ मेटा काढून टाकत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
 
“हिंसा आणि ग्राफिकल कंटेटसाठी आमची कडक पॉलिसी आहे. तसंच चुकीची माहिती, धोकादायक किंवा दिशाभूल करणारी किंवा फसव्या माहितीविरोधात आमची कडक धोरणं आहेत,” असं यूट्यूबने सांगितलं आहे.
 
तर X ज्याला आधी ट्विटर नावाने ओळखलं जायचं त्यांच्याकडून मात्र ‘आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क करू’ असा ऑटो रिप्लाय दिला आहे.
 
एखादा व्हीडिओ स्क्रिप्टेड आहे हे कसं ओळखावं?
अनेक व्हीडिओ हे स्क्रिप्टेड असल्याचं दिसून येतं. तसंच ते वेगवेगळ्या देशांमध्ये तयार आणि प्रसारित केले जातात. पण त्यांच्यावर अनेकदा भारतीय विश्वास ठेवतात आणि ते व्हायरल करतात.
 
“कारण ते इथल्या पुराणमतवादी लोकांच्या भावनांना हात घालतात,” असं हरिश नायर सांगतात. हरिश हे फॅक्ट क्रेसेन्डोचे मॅनेजिंग एडिटर आहेत. ही संस्था भारत आणि इतर आशियायी देशांमध्ये काम करत.
 
लोकांना माहिती व्हावी या उद्देशानेसुद्धा अनेक भारतीय नागरीक असे व्हीडिओ शेअर करतात, असं त्यांना वाटतं.
 
हे अशा प्रकारचे स्क्रिप्टेड व्हीडिओ फक्त लोकांपर्यंत चुकीची माहिती नाही पसरवत तर ते त्यांच्या मनात असलेल्या धारणा आणि भावनानां खतपाणी घालतात, असं नायर यांना वाटतं.
 
“लोकांमध्ये मीडियाबाबत कमी असलेली साक्षरता हे त्यांचं एक प्रमुख कारण आहे. त्यातच हे अशा समाजात घडत आहे तिथं लोक आधीच विभागले गेलेत आणि त्यांच्या मनात असे विचार आधीपासूनच येत आहेत,” असं प्रतीक वाघरे सांगतात.
 
दिल्लीस्थित इंटरनेट फ्रिडम फाउंडेशनचे प्रतिक पॉलिसी डायरेक्टर आहेत. ही संस्था लोकांच्या डिजिटल हक्कांसाठी काम करते.
 
पण आपण पाहात असलेला व्हीडिओ खरा आहे की खोटा हे चेक करण्याचे काही पर्याय आहेत.
 
लोकांनी व्हीडिओ पाहाताना कॅमेरा अँगस, स्थळ, प्रतिक्रिया आणि त्यात वापरण्यात आलेल्या भाषेबद्दल लोकांनी जागृक राहीलं पाहिजे, असं रुबी धिंग्रा सांगतात.
 
न्यूज चेकर्स या वेगवेगळ्या भाषांमध्ये फॅक्ट्सचेकींगचं काम करणाऱ्या संस्थेच्या त्या मॅनेजिंग एडिटर आहेत.
 
लोकांनी जर व्हीडिओ जागरुकपणे पाहिले तर त्यांच्या लक्षात येईल की व्हीडिओत जे सुरू आहे ते ठरवून केलं जात आहे की कुणालातरी रंगेहात पकडण्यात आलं आहे. ते नेहमीसारखं बोलत आहेत की मुद्दाम मोठ्याने बोलत आहेत. कुणी खोटा अभिनय करत आहे का हे सर्व तपासता येईल. त्यातून व्हीडिओ खरा आहे की खोटा हे लक्षात येईल.
 
धिंग्रा सांगतात, “अशी खूपच कमी शक्यता आहे की एखादा खरा व्हीडिओ वेगवेगळ्या कॅमेराने एकाचवेळी शूट केला असेल आणि त्यात कुठलहीच बाधा नसेल आणि तो एकसंध असेल.”
 




Published By- Priya Dixit