बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (17:57 IST)

महादेव बेटिंग ॲपः रणबीर कपूर ईडीच्या रडारवर येण्याचं कारण ठरणारं ॲप नेमकं आहे तरी काय?

आलोक प्रकाश पुतुल
 
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयासमोर एक छोटंसं ज्यूस सेंटर आहे. दुकानाचं नाव आहे 'ज्यूस फॅक्टरी'.
 
काही वर्षांपूर्वी भिलाईत देखील याच नावाने एक दुकान सुरू करण्यात आलं होतं. या दुकानाच्या मालकाचं नाव आहे सौरभ चंद्राकर.
 
मागच्या काही महिन्यांपासून ईडी या 28 वर्षीय सौरभ चंद्राकरच्या शोधात आहे.
 
भिलाई शहरात राहणाऱ्या सौरभवर आणि त्याचा साथीदार रवी उप्पल याच्यावर दुबईतून 'महादेव गेमिंग-बेटिंग' नावाचं ऑनलाइन सट्टेबाजी ॲप चालवल्याचा आरोप आहे. या ॲपची वार्षिक उलाढाल 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय.
 
याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी अभिनेता रणबीर कपूरला चौकशीसाठी बोलावलं आहे.
 
अंमलबजावणी संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत चित्रपटसृष्टीतील किमान 20 कलाकारांना तरी चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.
 
ईडीची रेड
या प्रकरणी ईडीने देशातील अनेक शहरांमध्ये छापे टाकून शंभर कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
 
या प्रकरणात पोलिसांसह अनेकांना अटक करण्यात आली असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीयांचीही चौकशी सुरू आहे.
 
अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या तपासाचा फास आवळला असून यात पोलीस कर्मचारी, नोकरदार, चित्रपटसृष्टीतील दिग्गज, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि विविध प्रकारचे दलाल सामील आहेत.
 
मात्र सौरभ चंद्राकरच्या वकिलाने आरोप फेटाळत, त्याचा आणि महादेव ॲपचा काहीच संबंध नसल्याचा दावा केला आहे.
 
त्याच्या वकिलांनी म्हटल्याप्रमाणे, तो केवळ एक ज्यूस सेंटर चालवतो. त्याने एका ज्यूस सेंटरनंतर 25 ज्यूस सेंटर्स सुरू केली. त्याची गोष्ट लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
 
छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं म्हणणं आहे की, निवडणुकीच्या काळात राजकीय कारण शोधून माझ्या जवळच्या लोकांना लक्ष्य केलं जातंय.
 
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मते, जर केंद्रीय यंत्रणा आणि केंद्र सरकार या ऑनलाइन बेटिंग ॲपबाबत जर गंभीर आहेत तर त्यांनी हे ॲप ब्लॉक करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही? आणि हे ॲप बंद करणं शेवटी केंद्र सरकारच्या हातात आहे.
 
पण हे ॲप चालवणाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा नक्कीच काही ना काही संबंध आहे असा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे.
 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ईडी कारवाई करत आहे आणि मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काहीच संबंध नाही, तर त्यांना काळजी करण्याची काय गरज आहे? ईडीच्या कारवाईमुळे ते इतके घाबरले असतील तर पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय. आणि जर मुख्यमंत्री बरोबर असतील तर त्यांनी तपास यंत्रणेला मदत करावी."
 
भिलाई ते दुबई पर्यंतचा प्रवास
छत्तीसगडमधील भिलाई हे पोलाद कारखान्यासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. भिलाई येथील के. एच. मेमोरियल शाळेत शिकलेल्या सौरभ चंद्राकरने महापालिकेत नोकरी करणाऱ्या वडिलांच्या पैशातून भिलाईमध्ये ज्यूस सेंटर सुरू केलं.
 
भिलाई पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, सौरभ चंद्राकरने ज्यूस सेंटर सुरू असतानाच सट्टा बाजारात हात पाय मारायला सुरुवात केली होती.
 
स्थानिक पातळीवर काही मित्रांसोबत सट्टेबाजीचं काम करत असताना त्याची दक्षिण भारतातील रेड्डी अण्णाशी ओळख झाली.
 
यानंतर सौरभने भिलाई येथील रवी उप्पल या मित्रासोबत ऑनलाइन बेटिंग ॲप सुरू केलं
 
या रवी उप्पलचे वडील भिलाई पोलाद कारखान्यात एकेकाळी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत होते. रवीच्या ओळखीमुळे हा व्यवसाय नव्या उंचीवर गेला.
 
पुढे त्याचे अनेक मित्रही या व्यवसायात सहभागी होऊ लागले. छत्तीसगडमधील अनेक पोलीस कर्मचारी या व्यवसायाला आश्रयच देत नव्हते तर ते या व्यवसायाचा एक भाग असल्याचा आरोप होतोय.
 
ईडीच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये सौरभ आणि रवी यांनी त्यांचा संपूर्ण व्यवसाय दुबईमधून चालवायला सुरुवात केली. त्यासाठी छत्तीसगडमधील शेकडो लोकांना दुबईत नोकरी देण्यात आली.
 
महादेव बुक
बघता बघता काही महिन्यांतच 12 लाखांहून अधिक सट्टेबाज 'महादेव बुक'मध्ये सामील झाले. यातले बहुतांश सट्टेबाज छत्तीसगडचे होते.
 
या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सोशल मीडियाने सर्वात मोठी भूमिका बजावली. सोशल मीडियावर त्याचा प्रचार करून जगातील अनेक देशांमध्ये याचे ग्राहक तयार करण्यात आले.
 
छत्तीसगडमधील अनेक लोक या ॲपचे आयडी आणि पासवर्ड विकण्यात गुंतले होते.
 
या आयडी आणि पासवर्डच्या मदतीने क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत सर्वच गोष्टींवर सट्टा लावला जाऊ लागला. हजारो प्रकारच्या बँक खात्यांमधून पैशांचे व्यवहार सुरू झाले.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलं की, 2020 मध्ये कोरोनाच्या काळात 'महादेव ॲप'चा व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वेगाने सुरू होता.
 
ज्यावेळी प्रेक्षकांशिवाय आयपीएल क्रिकेट सुरू झालं तेव्हा महादेव ॲपवर दोन हजार कोटींहून अधिक रुपयांची सट्टेबाजी करण्यात आली.
 
या व्यवसायातून मिळालेली कमाई काही चित्रपटांमध्येही गुंतवण्यात आली. बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकाच्या चित्रपटात सौरभच्या भावाने गुंतवणूक केली होती. याशिवाय हॉटेल व्यवसायातही अनेक कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती.
 
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बीबीसीला माहिती देताना सांगितलं की, "फेब्रुवारी 2020 मध्ये आयकर विभागाने छत्तीसगडमधील अनेक नोकरशहा आणि राजकारण्यांच्या घरांवर छापे टाकले होते. त्याचवेळी या महादेव ॲपची चर्चा सुरू झाली होती. पण जेव्हा दुबईमध्ये हाय प्रोफाईल पार्ट्या सुरू झाल्या आणि छत्तीसगडमधील अनेक लोक या पार्ट्यांना उपस्थित राहू लागले तेव्हा मात्र ईडीने त्याची दखल घेतली महादेव ॲपबाबत ईडीने प्राथमिक तपास सुरू केला तेव्हा छत्तीसगड पोलिसांनीही याप्रकरणी कारवाई सुरू केली. यात अनेक लोकांना अटक करण्यात आली."
 
मात्र या महादेव ॲपच्या कारवाईत इतका विरोधाभास आहे की, एकीकडे ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीविरोधात पोलिसांकडून इशारा देणाऱ्या बातम्या छापल्या जायच्या. तर दुसऱ्या बाजूला अर्धं पानं भरून या ॲपच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात होत्या.
 
काही जाणकार सांगतात की, एकीकडे सौरभ आणि रवीशी संबंधित लोक महादेव ॲपची माहिती पोलिसांना देत होते, तर दुसरीकडे पोलिसांपासून संरक्षण देण्याच्या नावाखाली ॲपच्या संचालकांकडून लाखो रुपये वसूल केले जात होते.
 
या सर्व प्रकरणादरम्यान सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य हळूहळू भारत सोडून दुबईला गेले.
 
लग्न, बॉलिवूड आणि हवाला
या वर्षी ऑगस्टमध्ये मनी लाँड्रिंगशी संबंधित कायद्यांतर्गत छत्तीसगड मधील पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, हवाला ऑपरेटर अनिल दममानी आणि सुनील दममानी यांना अटक करण्यात आली. यानंतर ईडीने प्रथमच महादेव ॲप संबंधित प्रकरणांची माहिती प्रसिद्ध केली.
 
यानंतर गेल्या महिन्याच्या 15 तारखेला दिलेल्या निवेदनात ईडीने म्हटलंय की कोलकाता, भोपाळ, मुंबईसह 39 शहरांमध्ये छापे टाकले असून यात 417 कोटींची रोख रक्कम, इतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच अनेक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
 
ईडीने केलेल्या दाव्यानुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या मालकीचे मेसर्स महादेव ऑनलाइन बुक हे संयुक्त अरब अमिरातीमधील मुख्य कार्यालयातून चालवलं जाता. 70:30 अशा नफ्याच्या प्रमाणात याची फ्रँचायझी दिली जाते.
 
ईडीच्या म्हणण्यानुसार, सट्टेबाजीतून मिळणारे उत्पन्न परदेशी खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हवाला ऑपरेशन्स केले जातात. यासोबतच भारतात सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्सच्या जाहिरातींसाठीही मोठ्या प्रमाणात रोख खर्च केला जातो.
 
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी युएईमध्ये स्वत:चं मोठं साम्राज्य उभं केल्याचा दावा ईडीने केला आहे.
 
शिवाय हे दोघेजण अवैध संपत्तीचं उघड प्रदर्शन करत आहेत.
 
फेब्रुवारी 2023 मध्ये सौरभ चंद्राकरने संयुक्त अरब अमिराती येथील रास अल-खैमाह याठिकाणी लग्न केलं. या विवाह सोहळ्यासाठी महादेव ॲपच्या प्रवर्तकांनी सुमारे 200 कोटी रुपये रोख खर्च केल्याचा आरोप आहे.
 
कुटुंबातील सदस्यांना यूएईला नेण्यासाठी खासगी विमानं भाड्याने घेण्यात आली होती. या लग्नात सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते.
 
लग्न समारंभाचे आयोजन करणारे, नर्तक, सजावट करणारे यांना खास मुंबईहून बोलावण्यात आलं होतं. या सर्वांना रोख रक्कम देण्यासाठी हवाला मार्गाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
 
या प्रकरणात डिजिटल पुरावे गोळा केल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीने माहिती देताना सांगितलं आहे की, योगेश पोपट यांच्या मेसर्स आर-1 इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने हवालाद्वारे व्यवहार करण्यात आला आहे. यात यूएई दिरहममधील 112 कोटी रुपये रोख आणि 42 कोटी रुपये हॉटेल बुकिंगसाठी देण्यात आले होते.
 
ईडीने आपल्या दाव्यात म्हटलंय की, त्यांनी पोपट, मिथिलेश आणि त्याच्याशी संबंधित इतर आयोजकांच्या 112 कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराशी संबंधित पुरावे गोळा केले आहेत. याशिवाय योगेश पोपट याच्या सांगण्यावरून 2.37 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली.
 
महादेव ॲपसोबत गुंतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
ईडीने, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या व्यवसायाबाबत दावा करताना म्हटलंय की, बरीच प्रसिद्ध व्यक्तिमत्वं या सट्टेबाज संस्थांच्या जाहिराती करत आहेत. त्यांना या कामाच्या बदल्यात संशयास्पद व्यवहाराच्या रूपात मोठी रक्कम मिळत आहे.
 
परंतु हे व्यवहार केवळ ऑनलाइन सट्टेबाजीच्या कमाईतून केले जातात.
 
ईडीने भोपाळच्या धीरज आहुजा आणि विशाल आहुजा यांच्या मेसर्स रॅपिड ट्रॅव्हल्सचा धांडोळा घेतला असता त्यांना आढळून आलं की, ही कंपनी महादेव अॅपचे प्रवर्तक, कुटुंब, या व्यवसायातील सहयोगी आणि त्यांच्याशी संबंधित प्रसिद्ध व्यक्तींसाठी तिकिटं बुक करायची.
 
हे लोक फेअरप्ले डॉट कॉम, रेड्डी अण्णा ॲप, महादेव ॲप यांसारख्या बेटिंग वेबसाइटची जाहिरात करायचे.
 
महादेव ॲपच्या मनी लाँड्रिंग व्यवसायात गुंतलेल्या लोकांची ओळख पटवल्याचा दावा करताना, ईडीने म्हटलंय की, कोलकाता स्थित विकास छापरिया हा महादेव ॲपचा संपूर्ण हवाला व्यवसाय हाताळत होता.
 
ईडीने त्याच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी केली असून ईडीला आढळलं की, विकास छापरियाने त्याच्या मेसर्स टेकप्रो आयटी सोल्युशन्स एलएलसी, मेसर्स परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट्स एलएलपी आणि मेसर्स एक्झिम जनरल ट्रेडिंग यांसारख्या संस्थांद्वारे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
 
अजूनही चौकशी सुरू असल्याचं ईडीने सांगितलं आहे.
 
येत्या वर्षात निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे. त्यातच छत्तीसगडमधील या सर्वात मोठ्या ऑनलाइन गुन्ह्याच्या तपासाची दिशा आणि स्थिती बघता, भिलाईपासून रायपूरपर्यंत रोज नवनव्या अफवांचं पेव फुटलं आहे.
 
कधीतरी या अफवांमध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याला अटक झाल्याची बातमी येते, तर कधी सिंगापूरला जाऊन या व्यवसायात भागीदार बनण्याची ऑफर देणाऱ्या आमदाराच्या भावाला अटक झाल्याची अफवा येते.
 
सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना श्रीलंकेपासून मलेशियापर्यंत पाहिल्याचा दावा करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाहीये.
 
नाव न सांगण्याच्या अटीवर भिलाई येथील एक व्यावसायिकाने सांगितलं की, या प्रकरणात राज्य पोलीस आणि ईडीकडे अनेक लोकांविरुद्ध स्पष्ट पुरावे आहेत.
 
आता ते नेमकी कशाची वाट पाहत आहेत, समजत नाही. कधी कधी असं वाटतं की या प्रकरणात कोणतीच कारवाई होणार नाही, केवळ बातम्या आणि फायलींमध्ये हा विषय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर सर्व अगदी शांत होऊन जाईल.