लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमावर जेव्हा नागपुरात दगडफेक झाली होती...
- प्रवीण मुधोळकर
नागपुरात 1950 मध्ये एका जाहीर कार्यक्रमात एका रसिकाने लतादीदींवर दगड भिरकावला होता. या घटनेनंतर नागपुरात कधीही कार्यक्रम करणार नाही अशी जणू शपथच लता मंगेशकर यांनी घेतली होती.
या घटनेनंतर तब्बल 46 वर्षांनी लतादीदींना नागपुरात बोलावण्यात आम्ही यशस्वी झालो, असं नागपूरच्या तत्कालीन महापौर कुंदा विजयकर बीबीसी मराठीला सांगत होत्या.
तर घडलं असं होता की, नागपूरातील पटवर्धन ग्राऊंडमध्ये लतादीदींच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण ऐवळी उन्हाचा त्रास झाल्यामुळे लता मंगेशकरांनी या कार्यक्रमात न गाण्याचा निर्णय घेतला. तसं त्यांनी जाहीरसुद्धा केलं.
पण त्यांच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या त्यांच्या एका चाहत्याने प्रेक्षकांमधून त्यांच्यावर दगड फेकला. सुदैवाने तो कुणाला लागला नाही. पण या घटनेनंतर कधीही नागपुरात गाणार नाही, अशी जणू शपथच त्यांनी घेतली होती.
या घटनेनंतर लतादीदींनी नागपुरात कार्यक्रम करावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आला.
"लतादीदींची नागपूरवरची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वर्षं करत होतो. तेव्हा बाळासाहेब म्हणजेच ह्रदयनाथ मंगेशकर 1995 मध्ये नागपूर महानगर पालिकेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरला आले होते. बाळासाहेबांना आम्ही विनंती केली की लतादीदींची नाराजी दूर करण्यात आम्हाला मदत करा. तेव्हा बाळासाहेब मंगेशकरांनी लतादीदींना समजावलं. शेवटी लतादीदींनी नागपुरात कार्यक्रमात येण्यास होकार दिला", अशी माहिती विजयकर देतात.
"19 नोव्हेबर 1996 रोजी आम्ही लता मंगेशकर यांचा नागपूर महानगर पालिकेच्या वतीने जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमात मी महापौर म्हणून शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीने लतादीदींना गायनाची विनंती केली.
कार्यक्रमात आलेल्या अनेकांनी लतादीदींना एक तरी गीत गावं असं आवाहन केलं. पण लतादीदींचा सत्कार असल्याने त्यांनी गायन करणं अभिप्रेत नव्हतं. शेवटी सर्व मंगेशकर कुटुंबियांनी लतादीदींना विनंती केली आणि मंगेशकर कुटंबियांनी मिळून या कार्यक्रमात पसायदान म्हटलं", अशी आठवण विजयकर सांगतात.
महत्त्वाचं म्हणजे जवळपास 46 वर्षानंतर लतादीदींनी नागपूर शहरात गायन केलं होतं. आम्ही त्यांचं स्वागत खऱ्या वीणेएवढीच चांदीची वीणा देऊन केलं, विजयकर पुढे म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही लतादीदींना आदरांजली व्यक्त करताना नागपुरातल्या त्या घटनेचा उल्लेख केला.