मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2019 (12:39 IST)

बल्क एस.एम.एस,केबल नेटवर्क, सोशल मीडिया,रेडियो,डिजिटल बोर्डवरील जाहिरातींचा प्रमाणीकरण करणे बंधनकारक

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताच उमेदवारांचा प्रचार सुरू होतो. प्रचारासाठी तयार करण्यात येणा-या विविध प्रकारच्या ऑडीओ-व्हिज्यूअल जाहिराती, बल्क एस.एम.एस, केबल नेटवर्क, सोशल मिडिया, रेडियो तसेच सार्वजनिक ठिकाणी डिजीटल बोर्डवरील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. या जाहिराती विविध माध्यमांना प्रसारण करण्यापूर्वी प्रसार माध्यम सनियंत्रण समितीकडून जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
 
उमेदवारांनी आपल्या जाहिराती जिल्हा माहिती कार्यालय, दगडी इमारत, तहसील चौक, (काटेबाईंच्या शाळेजवळ) यवतमाळ येथे जिल्हास्तरीय प्रसारमाध्यम सनियंत्रण समितीकडे प्रमाणित करण्यासाठी द्यावयाच्या आहेत. निवडणुकीच्या कालावधीत सर्वत्र आचारसहिंता लागू असल्यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी करावयाच्या जाहिरातीसाठी वैयक्तिक टिका- टिप्पणी, धार्मिक, जातीय भावना दुखावणारी किंवा समाजात एकमेकाबद्दल तिरस्कार , घृणा आणि तिटकारा निर्माण करणारी जाहिरात या कालावधीत प्रसारीत होणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवाराकडून प्रसारीत करण्यात येणा-या इलेक्ट्रानिक, सोशल माध्यम आणि सार्वजनिक ठिकाणी चित्रफित किंवा ध्वनीफित प्रकारातील जाहिरात मजकुराचे प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. प्रमाणित न झालेल्या जाहिराती प्रकाशित झाल्यास समितीकडून सबंधीत उमेदवाराला नोटिस पाठविण्यात येईल. 
 
जाहिरातीच्या मजकूराचे प्रमाणीकरण करण्यासाठी राष्ट्रीयकृत पक्षाच्या उमेदवारासाठी जाहिरात प्रसारीत करण्याच्या 3 दिवस पूर्वी सदर जाहिरातीची सी. डी. आणि संहिता (स्क्रिप्ट) दोन प्रतीत विहित नमुण्यात सदर समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी जाहिराती प्रमाणित करण्यासाठी दयावयाचा अर्ज प्रसारणारपूर्वी 7 दिवस आधी दयावा. अर्जासोबत जाहिरात तयार करण्यासाठी केलेला खर्च आणि जाहिराती प्रसारणासाठी येणा-या खर्चाचा तपशिल विहित अर्जात देणे बंधनकारक आहे.