शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (16:47 IST)

मतदान करण्याकरीता सुट्टी ती सुद्धा पगारी, मतदान करू दिले नाही तर होणार कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या  मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी किंवा तीन तासांची सवलत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशी सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्यास किंवा याबाबत तक्रार आली तर संबंधित आस्थापनाविरुध्द कारवाई करण्यात येईल.
 
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या परिच्छेद 135 ब नुसार निवडणूक होत असलेल्या मतदार संघातील उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदी ठिकाणावरील कर्मचा-यांना भरपगारी सुट्टी देण्यात येते. किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत दिली जाते. 14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 11 एप्रिल 2019 रोजी होत आहे. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील खाजगी कंपन्या व त्यामधील आस्थापना, सर्व दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स आदी आस्थापनातील कामगारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याकरीता भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
 
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी व इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक आहे.
वर नमुद केल्याप्रमाणे उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने व्यवस्थापकांनी या सुचनांचे योग्य अनुपालन होईल, याची खबरदारी घ्यावी. मतदानाकरीता सुट्टी अथवा योग्य सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाही, याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुध्द कारवाई करण्यात येईल असे शासनाने  स्पष्ट केले आहे.