सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. निवडणूक
  3. लोकसभा निवडणूक
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (10:37 IST)

रायगड लोकसभा : कुठल्याही लाटेला न जुमानणारा मतदारसंघ यंदा कुठला धक्का देणार?

election
कुणाही ‘करिष्माई’ व्यक्तीच्या लाटेलं न जुमानणारा किंवा कुठल्याही ‘आकस्मिक’ घटनेच्या आहारी न जाणारा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो.
1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेनं काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिलं, पण रायगडमध्ये लाट चालली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील हे काँग्रेसचा पराभव करत संसदेत पोहोचले होते.
 
2014 साली ‘मोदीलाट’ देशभरात असतानाही, रायगडमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या अनंत गीतेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी शेवटच्या फेरीपर्यंत टक्कर दिली होती. अवघ्या दोन हजार मतांनी तटकरेंना पराभव स्वीकारावा लागला होता. तेही सुनील तटकरे यांच्याच नावाचे आणखी काही उमेदवार उभे असल्याचा फटका बसल्याचं दिसून आलं.
 
2019 लाही बऱ्यापैकी ‘मोदीलाट’ अस्तित्वात असूनही रायगडमध्ये युतीच्या अनंत गीतेंचा सुनील तटकरेंनी पराभव केला.
 
असा आपला इतिहास सांगणारा रायगड मतदारसंघ यावेळी मात्र वेगळ्याच पेचात अडकलेला दिसून येतो. हा पेच महाराष्ट्रात गेल्या चार-साडेचार वर्षात बदललेल्या राजकीय डावपेचांनी निर्माण केलाय. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या 2024 चा जो निकाल येईल, तो कुठलाही असला, तरी धक्कादायक असेल, असंच बहुतांश राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
2019 ला काय झालं आणि आता काय स्थिती आहे, यावर अधिक चर्चा करण्यापूर्वी, रायगड लोकसभा मतदारसंघाची रचना, निवडणुकीतील जय-पराजयाचा इतिहास, प्रभावशाली नेते यांवर धावती नजर टाकूया.
 
मावळपासून रत्नागिरीपर्यंत पसरलेला मतदारसंघ
आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे मतदारसंघ होते. 2008 साली मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग असे दोन मतदारसंघ तयार झाले.
 
यातील रायगड मतदारसंघ मावळपासून गुहागरपर्यंत अशा विस्तीर्ण भूभागावर पसरला आहे. रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, तर रत्नागिरीतील दापोली, राजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतात.
 
डॉ. सी. डी. देशमुख हे रायगड (तेव्हाचं कुलाबा) चे पहिले म्हणजे 1952 साली खासदार म्हणून निवडून गेले. स्वत: पंडित नेहरू त्यांच्या प्रचारासाठी रोहा या देशमुखांच्या गावी आल्याच्या आठवणी आजही इथले बुजूर्ग सांगतात.
 
कष्टकऱ्यांचे नेते म्हणून पुढे देशभर नावाजले ते दि. बा. पाटीलही इथून संसदेत गेले होते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं, ते बॅरिस्टर ए. आर. अंतुलेही इथून खासदार बनले होते. बॅरिस्टर अंतुलेंनीच पुढे कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड केलं.
 
आता रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. या दोघा नेत्यांभोवती जिल्ह्याचं राजकारण फिरताना दिसून येतं.
 
यापैकी अनंत गीते हे 1999, 2004, 2009 आणि 2014 अशा चारवेळी रायगडमधून खासदार बनले, मात्र 2019 मध्ये सुनील तटकरेंनी त्यांना पहिल्यांदा पराभव दाखवला.
 
सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत.
 
‘राजकीय संगीत खुर्ची’
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालेल्या ‘राजकीय संगीत खुर्ची’मुळे मोठी राजकीय उलथापालथ झाली. या उलथापालथीचा परिणाम रायगडमध्येही झाला आणि कुणाही सर्वसामान्य मतदाराला चक्रावून टाकणारी समीकरणं इथं तयार झाली आहेत. सर्वसामान्यच काय, राजकीय क्षेत्राबाबत सातत्यानं जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनाही ही समीकरणं गोंधळात टाकतात. म्हणून थोडं सविस्तरपणे ते सांगणे आवश्यक आहे. कारण यातूनच रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीतले कल अवलंबून आहेत.
 
रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन आमदार शिंदे गटाचे, तर ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे.
 
या आकडेवारीवरून लक्षात येतं की, पक्षफुटीआधी एकट्या शिवसेनेचे चार आमदार इथे होते. म्हणजे, शिवसेनेची ताकद होती, असं मानायला हरकत नाही. मात्र, आता शिवसेनेतच फूट पडल्यानं ती ताकदही विभागली गेलीय.
 
पण हे झालं, पक्षफुटीपर्यंतचं. शिवसेनेच्या आणि नंतर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पार तीनशे साठ अंशात बदलली आहेत. ती कशी झाली आहेत, यावर नजर टाकूया.
रायगडमध्ये 2019 ची लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी अशी झाली. या निवडणुकीत अनंत गीते (4,55,968 मतं) यांचा सुनील तटकरेंनी (4,55,530 मतं) पराभव केला.
 
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनात बंड झालं आणि रायगड लोकसभा मतदारसंघातल्या चारपैकी तीन शिवसेना आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव तेवढे उद्धव ठाकरेंसोबत राहिले.
 
दुसरीकडे, 2019 लोकसभा निवडणुकीवेळी शेकपाचे अलिबागमधून आमदार असलेले धैर्यशील पाटीलही आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार खरंतर आता भाजपप्रणित महायुतीकडे सहापैकी पाच आमदार आहेत खरे, पण तरीही इथली लढाई चुरशीची असेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. त्याचंही कारण आहे.
 
लढाई कशी होईल? तटकरे वि. गीते की आणखी कुणी?
रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचं फारसं अस्तित्व नव्हतं. आता शेकापचे धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन आपलं अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केलीय. हेच धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये येताच, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच तयारीला लागले होते. त्यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्येही ते लोकसभेच्या निवडणुकीला उतरणार असल्याचे संकेत देत होते.
 
उत्तम वक्ते असलेले धैर्यशील पाटील हे पेण मतदारसंघातून दोनवेळा आमदार होते. पेण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे शेकापची ही मतं धैर्यशील पाटलांच्या रूपाने भाजप स्वत:कडे खेचण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, प्रश्न इतकाच आहे की, या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल का?
 
कारण दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्रीवर्धन तालुक्यात दौरा झाला आणि तिथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की, रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील. यापूर्वी कर्जतमध्ये पक्षाच्या कार्यकारिणी सभेत बोलतानाही अजित पवारांनी रायगड राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं म्हटलं होतं.
 
त्यामुळे थेट अजित पवारांनीच हे म्हटल्यानं आता भाजपप्रणित महायुतीत रायगडच्या उमेदवारावरून वादंग माजतो की, अजित पवार म्हणतात तसं हा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवेल, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे आणि गीतेंनी तसा प्रचार करण्यासही सुरुवात केलीय. फेब्रुवारीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी रायगड दौरा केला. त्यावेळी तालुकास्तरावर घेतलेल्या प्रत्येक सभेत अनंत गीतेच खासदार असतील, असा वारंवार उल्लेख केला. शिवाय, महाविकास आघाडीतील इतर पक्ष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात नाहीय. त्यामुळे अनंत गीतेंचं तिकीट पक्कं मानलं जातंय.
 
अनंत गीते यांना यावेळी साथ मिळालीय ती शेतकरी कामगार पक्षाची.
 
राष्ट्रवादी काँग्रेससोबत एरव्ही जाणाऱ्या पक्षानं अजित पवार की शरद पवार यातील दुसरा पर्याय निवडलाय. त्यामुळे शेकापची साथ शिवसेनेला आणि पर्यायानं अनंत गीतेंना मिळू शकते.
शिवाय, महाडमधील दिवंगत नेते माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप या शिवसेनेच्या ठाकरे गटात आल्यात. त्यामुळे महाड भागात गोगावले सोडून गेले असतानाही दिलासा देणारी बाब ठरलीय.
 
दरम्यान, गीते विरुद्ध तटकरे अशी संभाव्य लढत दिसत असली, तरी अंतर्गतही अनेक लढाया शक्य आहेत. कारण रायगड लोकसभा मतदारसंघातील महाडचे आमदार भरत गोगावले असो, अलिबागचे महेंद्र दळवी असो, किंवा दापोलीचे योगेश कदम यांनी महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना, रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. आता हे सगळे एकाच महायुतीत असले, तरी त्यांच्यातील नाराजी दूर झालीय का, हे एकतर प्रचाराच्या काळात किंवा थेट निकालातून स्पष्ट होईलच.
 
प्रचारात कोणते मुद्दे आणि मतदारसंघातील समस्या काय?
आता रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे मुद्दे आणि समस्यांबाबत जाणून घेऊ.
 
रायगड लोकसभा मतदारसंघात रोजगाराचा मोठा मुद्दा दिसून येतो. या मतदारसंघातील मोठा भूभाग ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागातील अनेक गावांमधील लोक रोजगाराच्या कारणाने मुंबई, ठाणे, पालघरकडे स्थलांतरित होताना दिसतात. विशेष म्हणजे, रसायनी, धाटाव आणि महाड-पोलादपूर अशा तीन एमआयडीसी या मतदारसंघात आहेत. मात्र, तरीही हे स्थलांतर रोखण्यात आजवर राजकीय नेतृत्वांना यश आलेलं दिसून येत नाही.
 
आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीनेही स्थलांतराचा मुद्दा रायगड लोकसभा मतदारसंघात दिसून येतो. गंभीर आजारांवरील उपचारासाठी आणि शिक्षणातील उच्च पातळी गाठण्यासाठी पुन्हा शहरांचीच वाट पकडण्याची वेळ इथल्या लोकांवर येते.
 
मात्र, या मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत स्थलांतराचा मुद्दा किंवा त्यातील कारणांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही, पर्यायानं निवडणुकीचा तो मुद्दाच उरत नाही.
 
राजकीय समीकरणांमध्ये कोण कुणाच्या बाजूने आणि कोण कुणाच्या विरोधात हाच मुद्दा आजवरच्या बऱ्याच निवडणुकीत केंद्रस्थानी दिसून येतो.
 
सोयीसुविधांच्या अंगानं एक मुद्दा कायम समोर येतो तो मुंबई-गोवा महामार्गाचा. त्यापलीकडे रायगडमधील अनेक गावं आजही पाणी टंचाईग्रस्त आहेत, रस्त्यांची अवस्था फारशी बरी नाहीय, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये योग्य स्थितीत नाहीत, दहावीनंतरच्या शिक्षणासाठी फारशी सुविधा नाही, शिवाय रायगडला मोठी किनारपट्टी आहे. कोळी समाजाच्या प्रश्नांबाबत अधून-मधून आंदोलनं होतात. अशा बऱ्याच गोष्टी या मतदारसंघात दिसतात. मात्र, या मुद्द्यांऐवजी राजकीय पक्षांमधील वादांवर, मग त्यात विरोधात आणि बाजूने होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर, दरसाल येणारी निवडणूक निभावून जाते आणि मुद्दे नि समस्या तशाच धूळ खात पडलेल्या दिसतात.
 
जात आणि धर्माचा मुद्दा जसा महाराष्ट्रातील किंवा देशातील इतर ठिकाणी प्रभावशाली ठरतो, तसा तो इथेही ठरतो. कुणबी मतदारसंख्या लक्षणीय असलेल्या या मतदारसंघात अनंत गीते हे कुणबी समाजातून येत असल्यानं त्यांच्या मागे बराचसा कुणबी समाज उभा राहताना दिसून आलाय. मात्र, सुनील तटकरे यांच्या मागेही कुणबी समाज मोठ्या संख्येत दिसतो.
 
मुस्लीम मतंही लक्षणीय आहेत. हा मतदार सुनील तटकरेंच्या बाजूनं उभा राहिलेला बऱ्याचवेळा दिसून आलाय. मात्र, यावेळी सुनील तटकरेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं मुस्लीम मतदारांची भूमिका काय असेल, हे निकालावेळीच दिसून येईल.
 
आता 2024 च्या निवडणुकीत राजकीय समीकरणंही सर्वसामान्य मतदारांना गोंधळात टाकणारी असल्यानं निकाल कुणाच्या बाजूनं लागतो, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
 
Published By- Priya Dixit