अरबी समुद्रात लुबान चक्रीवादळ
अरबी समुद्रातील पश्चिम भागात लुबान हे चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पुढील २४ तासांत ओडिशातील किनारी भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
अरबी समुद्रातील लुबान चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी ७ किलोमीटर वेगाने पश्चिम उत्तर दिशेकडे सरकले आहे. सध्या हे वादळ पश्चिम भागात घोंघावत आहे. पुढील पाच दिवसांत हे वादळ येमेन आणि ओमानच्या दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात पूर्व दिशेला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २४ तासांत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळाचे स्वरुप धारण करणार आहे. या संभाव्य वादळाला 'तितली' असे नाव देण्यात आले आहे. हे वादळ गुरुवारी ११ ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि आंध्र प्रदेश दरम्यानच्या गोपालपूर आणि कालिंगपट्टणम किनारपट्टीकडे सरकरण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या वादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.