मुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा
भारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील अजमेर येथे दहावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीचा या खेळामुळे बळी गेला असल्याचे बोलले जात आहे. या मुलीने फास लावून आत्महत्या केली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या आत्महत्येमागे मोमो चॅलेंज या खेळाचाच हात असल्याचा दावा केला आहे.
या मुलीच्या मैत्रिणीने मुलीच्या भावाला सांगितले, की ती मोमो चॅलेंजच्या शेवटच्या राऊंडमध्ये पोहचण्यासाठी अतिशय उत्सुक होती. तर या मुलीच्या भावानेही आपली बहीण घरी शाळेतही मोकळ्या वेळात मोमो चॅलेंज हा गेम खेळत असायची. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीने हाताची नसही कापून घेतली. या मुलीच्या इंटरनेट हिस्ट्रीची तपासणी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे चॅलेंज सध्या जगातील अमेरिका, अर्जेंटीना, फ्रान्स, मेक्सिको आणि जर्मनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरले आहे.