सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (09:03 IST)

३१ देश ६०० सायकलवरून भ्रमण, जगात माणुसकी हा सर्वात मोठा धर्म - योगेश गुप्ता

विश्वातील ३१ देश ६०० दिवसात २४००० किमी सायकलवरून भ्रमण करतांना सर्व देशांतील सामान्यजनात धर्म, जात, पंथ, वर्ण व भाषा असा कोणताही भेदभाव नसून माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असल्याचे जाणवले व इतक्या प्रवासातील अनुभवानंतर स्वत:कडे बाहेरून बघू शकतो ह्या आध्यात्मिक स्थिती पर्यंत पोहचलो असल्याचे प्रतिपादन हि सफर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या नाशिककर योगेश गुप्ताने केले.
 
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्ट द्वारे संयुक्तरीत्या आयोजित सन्मान व संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्या या पूर्ण प्रवासाबाबत संवादक अपर्णा क्षेमकल्याणी यांनी योगेश गुप्ता यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.
 
देवळाली गावातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या योगेश गुप्ता शिक्षण व नोकरी करिता इंग्लड व नेदरलँड येथे गेले. पण नियमित काम सोडून काहीतरी वेगळ करण्याची व नाविन्याचा शोध घेण्याची इच्छा असल्याने जगात भटकंतीचा निर्णय घेतला. पण कोणतीही योजना करून प्रवास करण्यापेक्षा अनियमित भटकंती करून हे नाविन्य शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सायकलवर तंबू, स्लिपिंग बॅग, दोन जोडी कपडे व सायकल दुरुस्तीचे सामान एवढेच घेऊन खरे जीवन अनुभवण्याकरिता हायवेची निवड न करता आडवाटेचा मार्ग निवडला असे सांगताना योगेश गुप्ता म्हणाले की सर्वच ठिकाणी स्थानिकांचे खूप सहकार्य मिळाले तसेच आपुलकी व आवभगत यामुळे एक वेगळीच अनुभूती  मिळाली. कोणत्याही देशातील सामान्य नागरिकांना युद्ध नको  असल्याचे सांगताना अनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरुष समानता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
इराण मधील नागरिक अत्यंत स्वागतशील असून तेथे भेटलेल्या एकाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी मागणी घातल्याचेहि त्यांनी आवर्जून सांगितले. अनेक देशात आजही जुने हिंदी चित्रपट व गीते लोकप्रिय असल्याचे सांगत माध्यमातून दिल्या जाणाऱ्या देशातील हिंसाचार, बलात्कार, असुरक्षित वातावरण, कचरा यासारख्या बातम्यांमुळे भारताची प्रतिमा विदेशातील जनसामान्यात नकारात्मक होत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
 
वास्तू विशारद संजय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्याक्रमाची सुरुवात जयेश आपटे यांनी तयार केलेल्या फोटो डॉक्युमेंट्रीने झाली. त्यानंतर नाशिकारांच्या वतीने मानपत्र देऊन योगेश गुप्ता यांचा सन्मान त्याचे आई व वडील, पुरुषोत्तम गुप्ता व सौ सुशिला गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, निता नारंग, विनायक रानडे, जयेश आपटे व मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली होती.