साक्षी धोनीने स्वरक्षणासाठी मागितला बंदुकीचा परवाना
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनीने स्वरक्षणासाठी बंदुकीचा परवाना मागितला आहे. पती क्रिकेट दौऱ्यावर सतत बाहेर असतो. अशावेळी घरात मुलीसह एकटं राहण्यास भीती वाटते, असं साक्षीने परवाना मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात म्हटलं आहे. साक्षीने पिस्तुल आणि ०.३२ रिव्हॉल्वरसाठी अर्ज केला आहे.
महेंद्रसिंह धोनी सध्या कुटुंबासह रातू दलादिली येथील एका आलिशान घरात राहतो. धोनीचं हे घर शहरापासून थोड्या अंतरावर आहे. आजूबाजूला फारशी वर्दळ नसल्याने धोनीच्या घरात ७ शस्त्रधारी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. धोनी किंवा साक्षी जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना याबद्दल स्थानिक पोलीस ठाण्याला कळवावे लागते. धोनीला घराच्या सुरक्षेसाठी असे करावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.
याआधी नेमबाजीची शौक असलेल्या धोनीने ९ वर्षांपूर्वी एक पिस्तुल खरेदी केली होती. तर २००८ साली एका अज्ञात व्यक्तीने धोनीकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यासंबंधी डोरंडा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता.