मराठा आरक्षणावर राज्यपालांची स्वाक्षरी
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देणार्या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करून मान्यतेची मोहर उमटवली. त्यामुळे आता मराठा आरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे. तसेच अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार आरक्षणासंबंधीची अधिसूचनाही तत्काळ जारी करणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ते राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. या विधेयकाला राज्यपालांनी तत्काळ मंजुरी दिली. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी करून मंजुरी दिल्याने याच आठवड्यात मराठा आरक्षण लागू होणार आहे.