मांजरांचे साम्राज्य असलेले बेट
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या काही अंतरावरून वाहणार्या नियाग्रा नदीच्या किनारी टोनावेन्डा नावाचे एक छोटेसे बेट आहे. सुमारे 85 एकरावर पसरलेल्या या बेटावर माणसांची संख्या फार जास्त नाही, पण तिथे मांजरे हजारोंच्या संख्येने फिरताना दिसतात. ही मांजरेच आज या बेटाची ओळख बनली असली तरी सर्वात पहिल्यांदा त्यांना कोण तिथे घेऊन गेले होते, हे कुणालाच माहीत नाही. या इवल्याशा बेटावर मांजरांची संख्या एवढी प्रचंड आहे की, तिथे येणार्या-जाणार्यांसाठी ती समस्या ठरत आहेत. या बेटावर राहणारा डॅनियल कुलिगन सांगतो की, या बेटावर मोकाट फिरणार्या बहुतांश मांजरी हिंस्त्र असून त्यांना रोखणे सोपे काम नाही. बरेचजण अन्य ठिकाणाहून आपली मांजरे इथे आणून सोडतात. डॅनियलने पुढाकार घेऊन गेल्या काही दिवसांपासून हे बेट मांजरमुक्त म्हणजेच भयमुक्त करण्यासाठी 'ऑपरेशन : आयलँड कॅट' नावाची मोहीम सुरू केली आहे.