ना समुद्राला, ना इतर नद्यांना मिळते ही 'लुनी नदी'
नद्या आपले जीवनस्रोत आहेत. प्राचीन काळच्या संस्कृती सर्वप्रथम नद्यांच्या किनारीच वसल्या, वाढल्या, संपन्न झाल्या. भारतातील बहुतेक मोठ्या नद्या समुद्रामध्ये किंवा महासागरांमध्ये विलीन होणार्या आहेत, तर लहान लहान नद्या, इतर नद्यांना जाऊन मिळणार्या आहेत. पण भारतामध्ये एक नदी अशीही आहे, जी ना सागरामध्ये विलीन होते, ना इतर कुठल्यानदीला जाऊन मिळते. ही नदी आहे राजस्थानातील 'लुनी' नामक नदी. अरवली पर्वतराजीतील नागा पर्वतातून उगम पावणारी ही लुनी नदी आहे. नागा पर्वत राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यामध्ये आहे. या पर्वतावर समुद्रसपाटीपासून 772 मीटरच्या उंचीवर लुनी नदीचा उगम आहे. या भागामध्ये लुनी नदीला 'सागरमती' नावाने ओळखले जाते. ही नदी अजमेर जिल्ह्यामध्ये उगम पावून, दक्षिण-पश्चिम दिशेला गुजरातकडे वळते. नागौर, पाली, जोधपूर, बाडमेर आणि जालोर जिल्ह्यांतून 495 किलोमीटरचा प्रवास करीत ही नदी कच्छच्या रणामध्ये येऊन थांबते. इथे रणामध्ये ही नदी सामावत असून पुढे अन्य कोणत्याही नदीला जाऊन ळित नाही.