शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (18:36 IST)

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना

मयांक भागवत
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप केलाय.
 
तर, "प्रत्येकवेळी तुम्ही तुमची बाजू मांडण्याची गरज नसते. वेळच ती गोष्ट योग्यवेळी सांगेल," अशा शब्दात सोनू सूदने इमकम टॅक्स विभागाच्या छापेमारीला प्रत्युत्तर दिलंय.
करचुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली इमकम टॅक्स विभागाने गेल्या आठवड्यात सोनू सूदच्या मुंबईतील घरावर आणि इतर ठिकाणी छापा मारला होता. तीन दिवसांच्या चौकशीनंतर इनकम टॅक्स विभागाने सोनू सूदने करचुकवेगिरी केल्याची माहिती जाहीर केली होती.
 
ऑगस्ट महिन्यात दिल्लीच्या आप सरकारने सोनू सूदची 'देश के मेंटॉर' या कार्यक्रमाचा ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर आयकर विभागाचा छापा पडल्याने विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
 
सोनू सूदवर इमकम टॅक्सचा छापा
सोनू सूदवर गेल्या आठवड्यात इमकम टॅक्स विभागाची पहिल्यांदा कारवाई झाली.
आयकर विभागाच्या मते, सोनूच्या स्वयंसेवी संस्थेने 2.1 कोटी रुपये परदेशातून क्राऊड फंडींगच्या माध्यमातून जमवले आहेत. हे परदेशी योगदान (विनिमय) कायद्याचं उल्लंघन आहे.
 
सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या संबंधित ठिकाणांवर टॅक्स चोरी करण्यात आल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा आयकर विभागाने केला.
 
सोनू सूदने आपलं अघोषित उत्पन्न बनावट स्त्रोतांमार्फत घेण्यात आलेल्या कर्जाच्या स्वरुपात दाखवलं होतं, असंही आयकर विभागाने म्हटलं.
 
सोनू सूदवर इमकम टॅक्स विभागाने केलेल्या कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते ट्विटवर म्हणाले, "सत्याच्या रस्त्यावर चालताना अनेक आव्हानं येतात. मात्र, विजय नेहमीच सत्याचा होतो. सोनू सूदसोबत भारतातील लाखो कुटुंबांचे आशिर्वाद आहेत. ज्यांना कठीण वेळी सोनूने मदत केली."
 
सोनू सूदच्या घरावरील कारवाई दरम्यान 1.8 कोटी रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून 11 लॉकर सिल करण्यात आले आहेत.
 
इमकम टॅक्सच्या कारवाईवर सोनूचं प्रत्युत्तर
आयकर विभागाच्या कारवाईवर सोमवारी 20 सप्टेंबरला सोनू सूदने आपली प्रतिक्रिया दिली.
ट्विटरवर तो म्हणाला, "प्रत्येकवेळी तुम्ही तुमची बाजू मांडण्याची गरज नसते. वेळच ती गोष्ट योग्यवेळी सांगेल."
 
तो पुढे म्हणतो, "मी माझं आयुष्य भारतीयांच्या सेवेसाठी खर्च करण्याची प्रतिज्ञा घेतलीय. माझ्या फाउंडेशनमध्ये येणारा पैन-पै कोणाचातरी जीव वाचवण्याची वाट पहातोय. मी गेल्याकाही दिवसांपासून काही पाहूण्यांच्या सेवेत होतो. त्यामुळे चार दिवसांपासून तुमच्या सेवेत नाहीये."
 
मी पुन्हा रूजू झालोय. माझा प्रवास असाच सुरू राहील, असं तो पुढे म्हणाला.
 
विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल
सोनू सूदवर करण्यात आलेल्या इनकम टॅक्स कारवाईनंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतील मदतीनंतर सोनू सूदवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी शिवसेना, इन्कम टॅक्सच्या छापेमारीनंतर त्याच्या पाठिशी उभी राहिलीये.
 
सामान्याच्या अग्रलेखात "सोनू सूदवर इन्कम टॅक्सचा सर्व्हे त्याला दिल्ली सरकारचा ब्रॅंड अॅम्बेसेडर बनवल्यानंतर करण्यात आला," असं लिहिण्यात आलंय.
 
"सोनू सूद आमचा असं म्हणत भाजपने त्याच्या कामाची प्रशंसा केली. पण, केजरीवाल सरकारच्या सामाजिक कार्यासाठी सोनू सूद ब्रॅंड अॅम्बेसेडर झाला आणि त्याच्यावर इन्कम टॅक्सची कारवाई सुरू झाली."
 
आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी म्हणाल्या, "सोनू सूदवर कारवाई करून भाजपने एक मेसेज दिलाय. देशासाठी जो काम करेल त्यावर कारवाई केली जाईल. सोनू सूदचा गुन्हा काय होता? त्याने गरीब मजूरांना लॉकडाऊनमध्ये मदत केली हा?"
 
विरोधकांच्या टीकेला भाजपने दुटप्पीपणा म्हटलंय. भाजपने प्रवक्ते राम कदम म्हणाले, "केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्सपासून ईडी, सीबीआयने कारावाई केली तर ते राजकारण. पण, यांचं सरकार असलेल्या यंत्रणांनी कारवाई केली तर ती मात्र ती पारदर्षी."
या सर्व पक्षांनी ठरवावं की देशात चुकीचं काही होत असेल तर चौकशी यंत्रणांनी कारवाई करायची का नाही? असा सवाल राम कदम यांनी विरोधकांना विचारला.
 
सोनू सूदची आपशी जवळीक?
सोनू सूदने 27 ऑगस्टला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.
 
केजरीवाल आणि सोनू सूद यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. यात दिल्ली सरकारने सोनू सूदला 'देश के मेंटॉर' या कार्यक्रमाचा ब्रॅंड अॅम्बेसेडर नियुक्त केलं.
 
सोनू सूद आपच्या नेत्यांसोबत व्यासपिठावर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
 
पंजाबमध्ये येत्या पाच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. सोनू सूदचा जन्म पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील. त्यामुळे तो आपमध्ये प्रवेश करणार, तो आपमध्ये आल्यास पंजाबमध्ये पक्षाची स्थिती चांगली होईल, अशी चर्चा रंगली होती.
 
पण, "आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही," असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. तर, सोनू सूदनेही राजकारणात येण्याची शक्यता फेटाळून लावली.
 
राज्यसभेची ऑफर होती-सोनू सूद
NDTV या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, "मी आपसोबत जात नाही. तुम्ही मला कोणत्याही राज्यात बोलवा. कर्नाटक-गुजरात... मी तात्काळ जाईन. मी सर्व राज्यांत काम केलंय. भाजप आणि कॉंग्रेसशासित राज्यांमध्येही."
सोनू सूदने त्याला दोन वेळा राज्यसभेची ऑफर दिल्याचा खुलासा केलाय.
 
तो म्हणाला, "दोन विविध पक्षांनी मला राज्यसभेची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारली. मी मानसिकरित्या तयार नाही."
 
कोरोना लॉकडाऊन काळात मजूरांची मदत
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आला कोरोना लॉकडाऊन काळात त्याने केलेल्या मदतीमुळे. लॉकडाऊनमुळे घाबरलेले हजारो गरीब मजूर वेगवेगळ्या शहरांमधून घराकडे पायी निघाले होते. प्रवासी मजूरांचे हाल झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.
 
त्याचवेळी सोनू सूदने हजारो बसेसच्या माध्यमातून गरीब मजूरांना आपल्या गावी पाठवण्यास सुरूवात केली. या मजूरांच्या हाल-अपेष्ठा न पाहिल्या गेल्यामुळे मी लोकांना मदत करण्यास सुरूवात केली, असं सोनू सूदने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
कोरोनाकाळतील मदतीमुळे सोनू सूद लोकांचा मसिहा बनला होता. रुग्णालयात बेड्स, वैद्यकीय उपचार, रॅमडेसिव्हिरसारखं इंजेक्शन, कोरोनाकाळात प्रवास अशा अनेक गोष्टींसाठी लोक सोशल मीडियावर सोनू सूदकडे मदत मागत होते.
त्यानंतर 2020 च्या मे महिन्यात सोनू सूदने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.
 
शिवसेनेची सोनू सूदवर टीका
 
त्यानंतर कोरोनाकाळातील मदतीवरून सोनू सूदवर सत्ताधारी शिवसेना नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेने सोनू सूद "भाजपने लिहीलेल्या राजकीय स्क्रिप्टवर अॅक्टिंग करतोय," अशी टीका केली.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमध्ये "महात्मा" सूद अशा मथळ्याखाली लेख लिहाला होता. सोनू सूदच्या अचानक चर्चेत येण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. सोनू सूदच्या मागे राजकीय दिग्दर्शक असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.
 
सोनू सूद भाजपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोट करण्यासाठी पैसे घेत असल्याच्या 2019 निवडणुकीमधील एका कथित स्टिंग ऑपरेशनचा हवालाही त्यांनी दिला होता.
 
त्यानंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती.