1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (15:26 IST)

नॉन व्हेज पिझ्झा दिल्याबद्दल एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी

शाकाहारी लोकांना नॉन व्हेज चुकीने खाऊ घालणे कितपत महाग पडू शकतं हे या घटनेवरुन कळतं. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील एका महिलेने तिला नॉन व्हेज पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या रेस्तराँकडे तब्बल एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 
 
ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे तसचे महिलेने याप्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. गाझियाबाद येथील रहिवासी दिपाली त्यागी या शाकाहारी आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी २१ मार्च २०१९ रोजी एका अमेरिकी पिझ्झा रेस्तराँमधून व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा डिलिव्हरी झाल्यावर सगळे पिझ्झा खायला बसले तेव्हा त्यांना पिझ्झामध्ये मशरुमऐवजी मांस असल्याचं जाणवलं. याबाबत महिलेनं पिझ्झा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रारही केली मात्र कंपनीनं या बाबीकडे लक्ष दिलं नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसांनी पिझ्झा आउटलेटच्या व्यवस्थापकांचा दिपाली यांना फोन आला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोफत पिझ्झा देण्याची ऑफर दिली. परंतु या घटनेमुळे मानसिक त्रास वाढला आणि धार्मिक भावाना दुखावल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. या चुकीसाठी आता आयुष्यभर महागडे धार्मिक विधी करावे लागतील, असं सांगत ऑफर नाकारल्याचे महिलेच्या वकिलांनी सांगितले. 
 
दिपाली यांच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने पिझ्झा आउटलेटला तक्रारीवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.